आग्रा : अवैध धर्मांतरण रॅकेटचा तपास करत असलेल्या आग्रा पोलिसांनी आता इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील तब्बल १०० ‘रिवर्ट आयडी’वर लक्ष केंद्रीत केले आहे. धर्मांतरण झाल्यानंतर युवक-युवतींचे सोशल मीडियावर खास ग्रुप्समध्ये समावेश केला जात होता आणि त्यांच्या आयडींना ‘रिवर्ट’ टॅग देऊन नव्या ओळखी दिल्या जात होत्या.
या आयडींमधून सध्या कोणतेही कमेंट्स अथवा पोस्ट होत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी सुरू केली आहे. काही आयडी परदेशातून तयार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, यामध्ये दुबई आणि कॅनडातून फंडिंग झाल्याचेही संकेत मिळाले आहेत.
१० आरोपी पोलीस कोठडीत, आणखी साक्ष्य गोळा करण्याचे काम सुरू
धर्मांतरण प्रकरणातील १० आरोपी सध्या २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. यामध्ये अयेशा उर्फ एसबी कृष्णा, शेखर राय उर्फ अली हसन, ओसामा, रहमान कुरेशी, अबू तालिब, अबू रहमान, मोहम्मद अली, जुनैद कुरेशी, मुस्तफा आणि रीत बानिक उर्फ इब्राहिम यांचा समावेश आहे. या रॅकेटच्या माध्यमातून विविध राज्यांतून तरुणींना फसवून धर्मांतर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ पेक्षा अधिक पीडित युवतींची सुटका केली असून, येत्या काही दिवसांत अजून काही जणांची सुटका केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
एक हजारहून अधिक नंबर, लॅपटॉप व सोशल मीडिया खात्यांची छाननी
आरोपींच्या मोबाईलमधून एक हजारहून अधिक फोन नंबर मिळाले असून, त्यांच्या तपशीलांची चौकशी सुरू आहे. ‘रिवर्ट मुस्लिम ग्रुप’शी संबंधित आयडी व त्यातील सदस्यांची माहिती घेण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची मदत घेण्यात येत आहे. आरोपींचे लॅपटॉप तपासण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. दरम्यान पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक आरोपीविरुद्ध ठोस साक्ष्य गोळा करण्यावर भर देण्यात येत आहे. परदेशातून डॉलर व क्रिप्टो करन्सीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले असून, सखोल तपास सुरू आहे.