जपान, अमेरिका, पेरू, इक्वेडोर, न्यूझीलंड अलर्ट मोडवर!
मॉस्को : रशियाच्या कमचटका द्वीपकल्पात बुधवारी सकाळी ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या १२ हून अधिक देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा भूकंप सकाळी ४:५४ वाजता झाला. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (युएसजीएस) या भूकंपाला आधुनिक इतिहासातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप घोषित केले आहे.
या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १९.३ किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे रशियाच्या कमचटका परिसरातील कुरिल बेटांवर चार मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे अनेक घरांचे आणि शासकीय इमारतींचे नुकसान झाले. एक शाळाही या लाटांमुळे धोकादायक स्थितीत आली असून, अनेक घरांच्या छप्परांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
भूकंपानंतर जपान, अमेरिका, चीन, न्यूझीलंड, पेरू, इक्वाडोर, कॅनडा, फिलीपिन्स, मेक्सिको, इंडोनेशिया, तैवान आणि प्रशांत महासागरातील काही बेटांमध्ये त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोरच्या किनारपट्टीवरील गालापागोस बेटांवरही धोका असल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
जपानमध्ये सुमारे २० लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही भागांत ३० ते ५० सेंटीमीटर उंच लाटा किनाऱ्यांवर आदळल्या आहेत. टोकियोजवळील सेंडाई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला असून, फेरी सेवा देखील तात्पुरती थांबवण्यात आली आहे. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आला आहे. रशियातील कमचटका प्रदेशाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोदोव यांनी या भूकंपाला दशकांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आपत्ती निवारण कार्य सुरु असून, नागरिकांचे जीव वाचवण्यावर प्रशासनाचा भर आहे.
त्सुनामी लाटांची शक्यता असलेले देश:
३ मीटरपर्यंत लाटांचा धोका: चिली, कोस्टा रिका, फ्रेंच पोलिनेशिया, गुआम, हवाई, जपान
१ मीटर लाटांचा इशारा: ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, मेक्सिको, न्यूजीलंड, तैवान, टोंगा
१ फूट लाटा अपेक्षित: चीन, ब्रुनेई, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम
या भूकंपाची तीव्रता पाहता तो जगाच्या इतिहासातील ६ वा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. १९५२ साली याच कमचटका परिसरात ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, यामुळे हवाईमध्ये मोठा विध्वंस केला होता.
इतिहासातील आतापर्यंतचे १० सर्वात मोठे भूकंप
(रिश्टर स्केल तीव्रतेनुसार)
९.५ तीव्रता – बिओबियो, चिली – २२ मे १९६०
९.२ तीव्रता – अलास्का, अमेरिका – २७ मार्च १९६४
९.१ तीव्रता – सुमात्रा, इंडोनेशिया – २६ डिसेंबर २००४
९.१ तीव्रता – तोहोकू, जपान – ११ मार्च २०११
९.० तीव्रता – कामचटका, रशिया – ४ नोव्हेंबर १९५२
८.८ तीव्रता – बायोबियो, चिली – २७ फेब्रुवारी २०११
८.८ तीव्रता – एस्मेराल्डास, इक्वाडोर – ३१ जानेवारी १९०६
८.७ तीव्रता – अलास्का, अमेरिका – ४ फेब्रुवारी १९६५
८.६ तीव्रता – अरुणाचल प्रदेश, भारत – १५ ऑगस्ट १९५०
८.६ तीव्रता – सुमात्रा, इंडोनेशिया – ११ एप्रिल २०१२
स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्सुनामीचे लाटांचे खरे स्वरूप काही वेळानंतरच स्पष्ट होईल, त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून बचावकार्य सुरु आहे. रशियन सरकारकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.