नवी दिल्ली : वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीला एकमेकांप्रती क्षमाशील राहण्याचा सल्ला दिला आहे. परस्पर मतभेद बाजूला ठेवून भविष्यात एक नवी सुरुवात करा, असा सल्ला देत न्यायालयाने सौहार्दपूर्ण तोडग्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात पती भारतीय वायुदलात फायटर पायलट असून युक्तिवादात त्यांनी २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्यात सहभागी राहिल्याचा उल्लेख केला आहे. तर पत्नी आयआयएममधून पदवीधर असून व्यावसायिकदृष्ट्या उच्च शिक्षित आहे.
न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह व न्यायमूर्ती अतुल चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, एकमेकांना क्षमा करा, मतभेद विसरा आणि जीवनात पुढे जा. सूडाच्या भावनेत जगण्यात काही अर्थ नाही. तुम्ही दोघेही तरुण आहात आणि संपूर्ण जीवन समोर आहे.
पतीकडून पत्नीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला रद्द करण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. पतीने आरोप केला होता की, पत्नी आणि सासरच्यांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. या प्रकरणात पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही परस्पर समजुतीने प्रश्न सोडवण्याचे आवाहन करत, न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा सौहार्दपूर्ण मार्ग शोधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.