भारताची जंगले आहेत जगातील ७५ टक्के वाघांचा अधिवास.
मुंबई : जगभरात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात असून सध्या देशात ३१०० हून अधिक वाघ असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशिया, चीन, बांगलादेश, थायलंड यासारख्या देशांना मागे टाकत ‘वाघांचा जागतिक गड’ म्हणून आपली ओळख पक्की केली आहे. हे यश केवळ प्राणीसंवर्धनाच्या दृष्टीने नव्हे, तर पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरत आहे.
गेल्या काही दशकांमध्ये जगभरात वाघांची संख्या चिंताजनकरीत्या घटल्यामुळे ही प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर होती. मात्र भारताने राबवलेल्या योजनांमुळे आणि सर्वांगीण प्रयत्नांमुळे आज ही संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. २००६ साली भारतात फक्त १४११ वाघ होते. आज ही संख्या ३१०० च्या पुढे गेली आहे, जी संपूर्ण जगातील वाघांच्या सुमारे ७५ टक्के इतकी आहे.
रशियात सुमारे ७५० अमूर प्रजातीचे वाघ आहेत, तर चीनमध्ये केवळ २० हून थोडेसे जास्त जंगलातील वाघ शिल्लक आहेत. त्यामुळे वाघांच्या संवर्धनात भारताची भरारी इतर देशांच्या तुलनेत मोठी मानली जात आहे. या यशामागे प्रामुख्याने पाच कारणे ठळकपणे समोर येतात. १९७३ साली सुरु करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत देशभरात ५४ वाघ संवर्धन प्रकल्प राबवले गेले आहेत. वाघांच्या अधिवासांचे जतन, अत्याधुनिक गणना पद्धती (कैमेरा ट्रॅप, डीएनए विश्लेषण), तसेच वाढत्या अर्थसाहाय्यामुळे ही योजना अधिक प्रभावी ठरली.
दुसरीकडे, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत वाघांच्या शिकारीवर पूर्णतः बंदी असून शिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाते. नेशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीसारख्या संस्थांनीही निरीक्षण आणि अंमलबजावणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. शिवाय, व्याघ्रसंवर्धनासाठी स्थानिक समुदायांना जोडले गेले. पर्यटनातून रोजगाराच्या संधी, नुकसानभरपाई योजना आणि जनजागृती मोहिमांमुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. जंगलतोड व खाणकामावर मर्यादा, तसेच सुरक्षित ‘टायगर कॉरिडॉर’मुळे वाघांच्या अधिवासात सुधारणा झाली आहे. तसेच अवैध शिकारी व व्यापार रोखण्यासाठी वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो सक्रिय आहे.
२०१० मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रत्येक देशाने आपापल्या वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. भारताने तो संकल्प पूर्ण करत एक ऐतिहासिक उदाहरण जगासमोर ठेवले आहे. भारताचे हे यश केवळ सरकारी धोरणांमुळे नाही, तर विज्ञान, कायदा, समाज आणि स्थानिक सहभागाचा संगम म्हणून पाहिले जात आहे. ही कामगिरी पर्यावरण जपण्यासाठी आणि संकटग्रस्त प्रजाती वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर एक प्रेरणा ठरत आहे.