कृष्णा नदीला पूर; बेळगाव जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती

कोयना धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th July, 04:02 pm
कृष्णा नदीला पूर; बेळगाव जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती

बेळगाव : महाराष्ट्राने सोमवारी रात्री कृष्णा नदीत तब्बल १ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने चिकोडी, अथणी आणि रायबाग तालुक्यांतील नऊ पूल पाण्याखाली गेले आहेत.

कुडची–मांजरी या जिल्ह्यातील उंच पुलालाही पाणी लागले असून, सांगली व मिरजकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पर्जन्य क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा विसर्ग करण्यात आला. याआधी दररोज सुमारे ३०,००० क्यूसेक पाणी सोडले जात होते, मात्र सोमवारी रात्री हा विसर्ग तिप्पट करण्यात आला. कोयना धरण भरत आले असून, कर्नाटक प्रशासनाशी समन्वय साधून पाणी सोडण्यात आले.

या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरग्रस्त भागात पोलीस बंदोबस्त तैनात असून, नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीमेवरील गावांवर या परिस्थितीचा मोठा परिणाम होत असून, नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आणि वाहतूक ठप्प झाली आहे. या भागातील पिकांवरही आता संकट निर्माण झाले आहे.


हेही वाचा