अस्तनीतले निखारे

आपल्या मुलांशी सुसंवाद साधून भविष्याला नख लागू शकेल, अशा कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्यापासून त्यांना वेळीच परावृत्त करायला हवे. कारण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या, मैत्रीच्या जाळ्यात फसवून त्यांचा उपभोग घेण्याच्या प्रकरणात मोबाईल आणि सोशल मीडिया हे दोन घटक सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे पोलीस तपासातून दिसून आले आहे. हा क्षणिक सुखाचा भुलभुलैय्या मुलांना विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो, हे त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी शाळा, पालक-शिक्षक संघ आणि शैक्षणिक व्यवस्थेनेही पुढे यायला हवे. आगीचा भडका उडून त्याच्या झळांनी पोळून निघण्याआधी 'अस्तनीतले निखारे' वेळीच विझवलेले बरे!

Story: वर्तमान |
27th July, 12:26 am
अस्तनीतले निखारे

बेकायदेशीरपणे धर्मांतर करण्याचे भूत काहींच्या मानगुटावरून उतरताना दिसत नाही. याची दाेन उदाहरणे गेल्या काही दिवसांत बघायला मिळाली. उत्तर प्रदेश पोलिसांनी या संदर्भात सखोल तपास करून छंगूर बाबा म्हणजेच जलालुद्दिन याचे धर्मांतराचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. त्यानंतर गोव्यापर्यंत धागेदोरे पोहोचलेल्या आयेशा उर्फ एस. बी. कृष्णा हिच्यासह दहा जणांना धर्मांतर प्रकरणात अटक केली. या दोन प्रकरणांचा आढावा घेतला असता, हे केवळ एक हिमनगाचे टोक असल्याचे स्पष्टपणे जाणवते. छुप्या पद्धतीने धर्मांतराचे प्रकार गोव्यातही यापूर्वी घडलेले दिसून आले आहे. त्याहीपेक्षा एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक प्रकार अलीकडच्या काळात सुरू आहे, ज्याचा फारसा बोलबाला झालेला नाही. हा प्रकार नेमका काय आहे आणि त्यामागची 'मोडस ऑपरेंडी' कशी असते, याचा दोन उदाहरणांतून धांडोळा घेऊ...

प्रकरण क्रमांक १ : करोनादरम्यानचा काळ. सन २०२०. पौगंडावस्थेतील एक मुलगी पणजीतील सेंट्रल लायब्ररीत पुस्तक आणायला जाते असे सांगून बाहेर पडते. अनेक तास तिचा पत्ता लागत नाही. मोबाईल बंद. घरचे हैराण हाेतात. परिचितांकडे चौकशी करून शेवटी पोलिसांची मदत घेतात. पोलीस त्या मुलीची सोशल मीडिया हॅंडल आणि मोबाईलचा ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) काढतात. त्यानंतर तिचे एका युवकाशी सातत्याने चॅटिंग होत असल्याचे समोर येते. त्यातून त्या युवकाचा फोन ट्रेस केला असता, त्याचे लोकेशन बंगळुरू असल्याचे दिसून येते. पोलीस तिथपर्यंत पाेहोचतात आणि काही अघटीत घडायच्या आत त्या मुलाच्या नातेवाईकांच्या घरातून ​मुलीची सुटका करतात.

केवळ फोनवरील संभाषणातून एखाद्या अपरिचित युवकावर विश्वास ठेवून ही मुलगी घरच्या सर्वांना सोडून बंगळुरूपर्यंत गेली. किती मूर्ख असेल ना... असा विचार आपल्या मनात नक्की आला असेल. पण इथेच तर आपण चूक करतो. ती का आणि कशी, हे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू...

प्रकरण क्रमांक २ : सन २०२३. गोव्यातील एका १८ वर्षीय युवतीची एका २१ वर्षीय युवकाशी सोशल मीडियावरून ओळख होते. हा युवक कर्नाटकमधील. ओळखीतून मैत्री घनिष्ट बनते. एके दिवशी युवकाकडून हॉटेलमध्ये पार्टीचे निमंत्रण दिले जाते. युवती होकार देते. सोबत आपल्या मैत्रिणीला घेऊन ती हॉटेलमध्ये दाखल होते. या दरम्यान दोघेही शारीरिक जवळीक साधून काही वेळ एकांतात व्यतित करतात. काही वेळानंतर युवक त्या युवतीला बाजारातून काही तरी आणण्यासाठी पाठवतो आणि तिच्या मैत्रिणीशी चर्चा करण्याच्या बहाण्याने ​हॉटेलमध्येच थांबतो. युवती निघून गेल्याची खात्री पटताच हा युवक तिच्या मैत्रिणीवर अतिप्रसंग करतो. यातून ती कोलमडते. तडक घरी ​जाऊन घडलेला प्रकार कथन करते. नंतर पोलीस केस होते. युवकाला अटक होते. आरोपपत्र, साक्षी, पुरावे असे सोपस्कार पार पडतात. आणि दोन वर्षांनंतर परवाच त्या युवकाला बलात्कारप्रकरणी १० वर्षांचा कारावास आणि एक लाखांचा दंडही ठोठावला गेला.

हा झाला बातमीतील घटनाक्रम. खरी कथा त्या पुढे आहे. हा २१ वर्षीय कर्नाटकी युवक विवाहित आहे. त्याला दोन वर्षांचे मूलही आहे. म्हणजे त्याचे लग्न १९ व्या वर्षी झाले असेल. ही माहिती लपवून त्याने गोव्यातील १८ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध प्रस्थापित केले, शिवाय तिच्या मैत्रिणीलाही आपल्या वासनेची शिकार बनविली. कुठून येते इतकी विकृती? कोणत्या गलिच्छ मानसिकतेत हे युवक सापडलेले असतात? त्याचबरोबर त्यांच्या षड्यंत्राला फशी पडणाऱ्या सुशिक्षित युवती कोणत्या मनोवस्थेत असतील? या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कारण वानगीदाखल दिलेली ही केवळ दोन उदाहरणे आहेत. असे अनेक प्रकार राजरोस घडत असतात. ते उघडकीस येत नाहीत इतकेच. ते का उघडकीस येत नाहीत, याची कारणेही शोधण्याची गरज आहे. कारण ती शोधली, तरच अशा प्रकरांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकेल.

पहिली गोष्ट म्हणजे, आपला समाज मुलीची किंवा महिलेची अब्रू लुटली गेल्यानंतर कायदेशीर मार्गाने न्यायाची लढाई लढण्याऐवजी आपली अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी फारच तळमळीने वागतो. त्यासाठी गुप्तता बाळगून कायदा यंत्रणेला मिनतवाऱ्या करून प्रकरण फाईलबंद करण्याकडे जास्त लोकांचा कल असतो. खरे तर अब्रू कोणाचीच लुटली जाता नये. मात्र तसा प्रकार घडला, तर संबंधिताला कायद्याच्या चौकटीत शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करायला हवा. मात्र त्या बाबतीत अनेक जण हार मानतात. याला कारण सामाजिक मानसिकता तर आहेच, पण कायद्याच्या आणि न्यायाच्या प्रदीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियाही तेवढ्याच जबाबदार आहेत. न्यायासाठी दोन किंवा अधिक वर्षे झुंज द्यावी लागत असेल, तर कोण त्या भानगडीत पडणार? एका बाजूला रोजच्या जगण्याची​ शर्यत सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला सहनशीलतेची सत्त्वपरीक्षा पाहणारी व्यवस्था जीव नकोसा करते. या कात्रीत सापडलेले पालक माघारीचा मार्ग पत्करतात आणि आरोपींचे फावते. यातून अशा प्रकारांना पायबंद घालण्याची संधी गमावली जाते. त्यामुळे आरोपींना शिक्षा होऊन अशा प्रकारांबाबत जनजागृती होण्याऐवजी असे प्रकार पडद्यामागे राहतात. अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना मग मोकळे रान मिळते. या सर्व कंगोऱ्यांचा विचार करून अशा प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करणे आवश्यक आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे, मुलीची किंवा युवतीची ओळख जाहीर करणे अयोग्य आहे, ते बंधन पाळायलाच हवे. मात्र विशिष्ट धार्मिक उन्मादी उद्देशाने असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत असेल, तर किमान संबंधितांच्या धार्मिक पार्श्वभूमीसह मोडस ऑपरेंडीचीही जाहीर वाच्यता व्हायला हवी. तरच युवा पिढी आणि पालकांमध्ये प्रबोधन घडवता येईल. त्याचबरोबर पीडितेच्या पालकांचे समुपदेशन करून ही विषवल्ली उखडून टाकण्यासाठी त्यांची मदत पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने घ्यायला हवी. न्यायाचा लढा लढण्यासाठी आवश्यक पाठबळ मोफत उपलब्ध करून द्यायला हवे. केवळ दोन-चार गल्लाभरू चित्रपट काढून हे प्रकार थांबणारे नाहीत. छुप्या पद्धतीने चालणारे धर्मांतर हे मोठे आव्हान आहेच, त्याहीपेक्षा मुलींचा ब्रेनवॉश करून त्यांना लैंगिक विकृतीच्या मार्गावर आणण्याचे षड्यंत्र रचणारी मानसिकता ठेचून काढायला हवी. एखादा छंगूर बाबा, आयेशा किंवा कोणा विकृताच्या भूलथापांना बळी पडण्याआधी आपल्या आसपासच्या माणसांना सतर्क करण्याची नितांत गरज आहे. आगीचा भडका उडून त्याच्या झळांनी पोळून निघण्याआधी 'अस्तनीतले निखारे' वेळीच विझवलेले बरे! 

मुलांवर लक्ष ठेवणे नितांत गरजेचे...

आपली मुले शाळेत जातात, तिथे ती काय करतात? शाळाबाह्य कृतींच्या नावाखाली काय चालते? मुलांची संगत कोणत्या प्रकारच्या मुलांशी आहे? त्यांच्या मोबाईलमध्ये कोणत्या गोष्टी सातत्याने बघितल्या जातात? आपले मूल ड्रग्जच्या, जुगाराच्या नादी​ तर लागले नाही ना? अशा नानाविध प्रश्नांचे निरसन पालकांनी वेळोवेळी करायला हवे. मुलांशी सुसंवाद साधून भविष्याला नख लागू शकेल, अशा कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्यापासून त्यांना वेळीच परावृत्त करायला हवे. कारण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या, मैत्रीच्या जाळ्यात फसवून त्यांचा उपभोग घेण्याच्या प्रकरणात मोबाईल आणि सोशल मीडिया हे दोन घटक सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे पोलीस तपासातून दिसून आले आहे. हा क्षणिक सुखाचा भुलभुलैय्या मुलांना विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो, हे त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी शाळा, पालक-शिक्षक संघ आणि शैक्षणिक व्यवस्थेनेही पुढे यायला हवे. सायबर पोलीस, एनजीओ आदींची मदत घेऊन सातत्याने जागृती शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे. काही धार्मिक संघटना ‘लव्ह जिहाद’सारख्या गोष्टींबाबत सातत्याने आवाज उठवत असतात. यात काही तरी तथ्य असल्याशिवाय अशी आंदोलने चालत नाहीत, हे सर्वांनीच ध्यानी घ्यायला हवे. प्रबाेधनापुरत्या अशा संघटनांचीही मदत घेण्यात काहीच गैर नाही.

अल्लड वय सॉफ्ट टार्गेट 

पौगंडावस्थेतील किंवा किशोरावस्थेतील मुले, मुली फारच संवेदनशील असतात. शरीरात होणारे बदल त्यांना घरातील इतरांपासून वेगळे व्हायला भाग पाडतात. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी ओढ लागते. त्यात सोशल मीडियावरील सेमी पॉर्न कंटेट भर टाकतो. मग अशी मुले तासनतास सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकतात. त्यातून परिचित-अपरिचित व्यक्तींशी ओळख होते, विचारांची देवाणघेवाण होते. आपल्या मनातील नाजूक भावनांना पलीकडून प्रतिसाद मिळू लागला की मुली वाहावत जातात. या संवादाची परिणती शरीरसंबंधात होते. मग ते सहमतीचे असो वा जबरदस्तीचे. मुलगी गायब झाली की, बहुतेक प्रकरणांमध्ये पोलीस तपासात 'अपहरण' हा एकमेव तक्रारीचा सूर पालक लावतात. लैंगिक शोषणाचा मुद्दा स्वतःच्या मर्जीने बाजूला सारून आपली मान सोडवून घेण्याकडे कल असतो, असे तपास यंत्रणेतील सूत्रे सांगतात. त्यामुळे पोलिसांनाही मर्यादा पडतात. ही मनोवृत्ती बदलून आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत सर्व घटकांनी काम करायला हवे. त्यासाठी तपासाच्या प्राथमिक पातळीवरच पालकांच्या मनात विश्वासाचे वातावरण तयार करणे आवश्यक आहे.


सचिन खुटवळकर 

(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)