मृत्यूचा वाढता विळखा...

अर्थात हे आजार पूर्वी नव्हते अशातील भाग नाही. मात्र सध्या या आजारांचे आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
27th July, 12:18 am
मृत्यूचा वाढता विळखा...

राज्यात गेल्या काही वर्षात बदलेल्या जीवनशैलीशी संबधित आजारांत झपाट्याने वाढ होत आहे. घरातील वा कामावरील तणाव, सकस आहाराचा अभाव, फास्ट किंवा जंक फूड खाण्याचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनता, व्यायाम न करणे किंवा काहीच शारीरिक हालचाली न करणे अशा विविध गोष्टी आजारात वाढ करत आहेत. 

बदललेल्या जीवशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदय विकार, लठ्ठपणा, व्यंधत्व, पक्षाघात, अशा एक ना अनेक आजारांचा समावेश आहे. सांख्यिकी खात्यातर्फे दरवर्षी राज्यात झालेले जन्म तसेच मृत्यूंची आकडेवारी जारी करण्यात येते. यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूच्या वैद्यकीय कारणांची देखील नोंद करण्यात येते. खात्याच्या मागील दहा वर्षांची आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. 

खात्याच्या मागील दहा वर्षांच्या अहवालांनुसार गोव्यात कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत ५६.६१ टक्क्यांनी, मधुमेहाने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत तब्बल १२५. ७० टक्क्यांनी तर हृदय विकाराने आणि हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या २२.५८ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यात वरील कालावधीत विविध वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूमध्ये हृदय विकाराने आणि हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर कर्करोग, मधुमेह, क्रॉनिक लिव्हर डिझिज यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. राज्यात २०१५ ते २०२४ या दहा वर्षांच्या हृदयविकाराने ४४ हजार १०१ व्यक्तिंचा मृत्यू झाला होता. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ३६७ तर दिवसाला १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षात हृदय विकाराने मृत्यू झालेल्यांपैकी ५३ टक्के पुरुष तर ४७ टक्के महिला होत्या. 

हृदयविकारानंतर कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दहा वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगाने वर्षाला सरासरी ११०७ म्हणजेच दिवसाला सरासरी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. वरील कालावधीत मधुमेहाने (डायबेटीस मलायटस) दिवसाला सरासरी २ जणांचा मृत्यू झाला आहे. क्रॉनिक लिव्हर डिझिज आणि सिऱ्होसिसमुळे महिन्याला सरासरी ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सेरेब्रोव्हास्क्यूलर पॅरॅलीसिसमुळे (स्ट्रोक) झालेल्या मृत्युंमध्ये १०.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थात हे आजार पूर्वी नव्हते अशातील भाग नाही. मात्र सध्या या आजारांचे आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वरील आकडेवारी भीती घालण्यासाठी देण्यात आलेली नाही.

गोव्यात या आजारांमुळे इतके मृत्यू कसे होऊ शकतात अशी शंका उपस्थित करण्याऐवजी वरील आकडेवारीवर विचार करणे आवश्यक आहे. 

सरकारने काही महिन्यांपूर्वी टाटा मेमोरियल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार असंसर्गजन्य आजाराबाबत वीस वर्षांचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि दीर्घकालीन श्वसन रोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांची कारणे शोधण्यासाठी राज्यातील १ लाख लोकांचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासात पुढील वीस वर्षे लोकांची अनुवांशिकता, जीवनशैली यांचा अभ्यास होईल. तसेच या लोकांवर असणाऱ्या पर्यावरणीय प्रभावचे विश्लेषण देखील करण्यात येणार आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. असे असले तरी लोकांनी केवळ सरकारच्या अभ्यासावर अवलंबून न राहता आपल्या जीवनशैलीत, आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे आहे.


पिनाक कल्लोळी

(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)