स्पर्धा परीक्षांमधील 'चालू घडामोडी (करंट अफेअर्स)' हा विषय अनेकदा उमेदवारांसाठी एक आव्हान असतो. मागील एका वर्षातील घडामोडी लक्षात ठेवणे, त्यातही देश-विदेशातील माहितीचा अफाट पसारा पाहता, काय वाचावे आणि काय सोडून द्यावे, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यावर कोणताही रामबाण उपाय नसला तरी, काही प्रभावी टिप्स नक्कीच मदत करू शकतात.
भारतातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी 'करंट अफेअर्स' अर्थात चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा विषय आहे. 'चालू' म्हणजे मागील १ वर्षातील फक्त घडामोडी. आता त्यातही काय काय लक्षात ठेवायचे हा प्रश्नच पडतो. मुलांसमोर या जगात तब्बल २०० पेक्षा जास्त देश आहेत. जवळपास प्रत्येक देशाचे सरकार, भाषा, चलन, वेगवेगळे प्रत्येक खंडातील वेगवेगळ्या संघटना, त्यांची धोरणे सर्व काही अवाक्याच्या बाहेरचेच. कारण प्रत्येक देशामध्ये रोज काही ना काही घडतच असते. देश पातळीवरील घटना वेगवेगळ्या, त्यात त्यांच्या त्यांच्या राज्यातील, राज्य सरकारांमधील, कॉर्पोरेशन्समधील, विविध सरकारांच्या वेगवेगळ्या कथा! काय काय लक्षात ठेवणार? आता भारताचेच उदाहरण घ्या. केंद्र सरकार, २९ राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा परिषदा, म्युनिसिपालिटी, नगरपरिषदा, पंचायती सुमारे हजारो ठिकाणी हजारो गोष्टी होत असतात. भारतातील महामंडळे, विविध शासकीय योजना, न्यायालये, स्वायत्त संस्था, त्यांचे पदाधिकारी, विविध बँका व पतसंस्था, या सर्व ठिकाणांचे प्रमुख अध्यक्ष व तत्सम पदाधिकारी! काय काय लक्षात ठेवणार? या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी अडचणीत येतो आणि अगदी खरंच सांगायचे तर यावर काहीही रामबाण उपाय नाही. या विषयात हमखास गुण मिळतील याची आशा करायची नाही. प्रयत्न जरूर करा, पण आशा ठेवू नका की यातीलच काही प्रश्न आपल्याला परीक्षेत येतील. सर्वसाधारणपणे, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकलेले आहेत, त्यांच्याशी जेव्हा वार्तालाप करण्याचा योग आला, तेव्हा ढोबळमानाने काही टिप्स नक्कीच मिळाल्या. त्या पुढीलप्रमाणे देत आहे. याचा विद्यार्थ्यांनी नक्की विचार करावा, परंतु स्वतःचा अभ्यास व त्याची पद्धत चालू ठेवावी.
अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
१. स्वतंत्र वही: 'करंट अफेअर्स' या नावाची एक स्वतंत्र वही करावी.
२. दृष्टिकोन बदला: परीक्षेसाठी वाचायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहे, ही भावना मनातून काढून टाकावी. त्याऐवजी, स्वतःच्या आनंदासाठी लक्षात ठेवत आहोत, असे लक्षात आणावे. आनंदासाठी केले की तणाव राहत नाही, त्यामुळे आपोआप लक्षात राहते.
३. जागतिक माहिती: त्या वहीत देश, भाषा, राजकीय पक्ष, पंतप्रधान/अध्यक्ष यांची नावे लिहून काढावीत. प्रथम, विदेशातील जे जे आठवतील ते लिहून काढावे.
४. क्रीडा: जगातील निवडक दहा क्रीडा प्रकारांमधील विजेते लिहून काढावेत.
५. मुख्य पुरस्कार: मुख्य पुरस्कार विजेते लिहून काढावेत.
६. आंतरराष्ट्रीय गट: देशांचे विविध गट जसे की ब्रिक्स (BRICS), सार्क (SAARC), युरोपियन युनियन (EU), जी-२० (G-20) यांचे देश व राष्ट्रप्रमुख लिहून काढावे.
७. आंतरराष्ट्रीय संस्था व भारतातील महत्त्वाचे पदाधिकारी: आंतरराष्ट्रीय संघटना जसे की वर्ल्ड बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), युनेस्को (UNESCO), संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या संघटनांचे प्रमुख व मागील परिषदांचे अध्यक्ष, जागतिक अणुऊर्जा संघटनेची माहिती लिहून काढावी. मग भारताचा वेगळा भाग करावा. त्यात मंत्रिमंडळे व मंत्री यांची केंद्र सरकारमधील नावे व पोर्टफोलिओ (पदे) लिहून काढावे. राज्य सरकार - गटबंधन - मुख्यमंत्री यांची नावे लिहावी. आरबीआय (RBI), स्टेट बँक (State Bank), निवडणूक आयोग (Election Commission), अल्पसंख्याक आयोग (Minority Commission), महिला आयोग (Women's Commission), नीती आयोग (NITI Aayog), कॅग (CAG), सरन्यायाधीश इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती काढून चिटकवावी.
८. पुनरावृत्ती: वरील सर्व माहिती रोज न चुकता ३० मिनिटे मोठ्याने पाठ करावी. ७ दिवसांत नावे तोंडपाठ होतात. सुरुवातीला मोठ्याने वाचणे हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो ते आपल्या कानाने ऐकले पाहिजे हे कायम लक्षात ठेवा.
९. चर्चा गट: चालू घडामोडी या विषयाच्या चर्चेसाठी एक खास मित्र निवडावा व त्याच्याशी फक्त याच विषयावर गप्पा माराव्यात. जरी त्याला कळले नाही तरी त्याला एक्सप्लेन करत राहावे. याने फायदा होतो.
१०. मासिके व वृत्तपत्रे: 'रीडर्स डायजेस्ट' (Reader's Digest), कॉम्पिटिटिव्ह रिव्ह्यू (Competitive Review), द हिंदू पेपर (The Hindu Paper) ऑनलाईन सबस्क्राईब करावे.
११. डिजिटल संसाधने: मोबाईलवर चॅट जीपीटी (ChatGPT) तसेच यूट्यूबवर शेकडो चॅनलवर 'करंट अफेअर्स'वर प्रश्न आणि उत्तरे असतात. दिवसातून फक्त किमान ३० मिनिटे काढावीत.
१२. अभ्यासपुस्तके व शिकवणे: अरिहंत पब्लिकेशन (Arihant Publication) ची चालू घडामोडीवरील पुस्तके बघून, इतर मित्र-मैत्रिणींना स्वतःच एक्सप्लेन करा, याचा प्रचंड फायदा होतो.
आता एक महत्त्वाचे: तेवढे सर्व करून सुद्धा यातील एकही प्रश्न आला नाही तर निराश होऊ नका. हा अगदी जुगार आहे. कुठे ना कुठे, कोणत्यातरी परीक्षेत यातील सर्व येणारच हे कायम लक्षात ठेवा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटनुसार उद्याच्या मंडळीमध्ये तुमची ऊठबस होणार आहे. तिथे विद्वान म्हणून तुम्ही गणले जाणार हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक कर्माचे फळ हे मिळतेच. याच्यावरच पुढे चांगल्या नोकऱ्या, संधी, ग्रुप डिस्कशन (Group Discussion) आणि कोणत्याही मुलाखतीसाठी (Interview) फायदा होतो. 'करंट अफेअर्स' हा विषय आवड म्हणून घ्या. मग बघा, हमखास मार्क्स पडणार.
अॅड. शैलेश कुलकर्णी
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)