तसे गोवा सरकारने हिंसक कुत्र्यांना पाळण्यास बंदी घातलेली आहे आणि आता म्हणतात वाघ पाळा. म्हणजे कुत्रा भयानक व वाघ नाजूक. चला तर "माझा वाघ, माझी शान!" लवकरच करू. शेवटी आपण एकच म्हणू शकतो – घरात वाघ असल्यास, आम्हाला भिवपाची गरज आसा!!!

राजकारण्यांचे विचार सामान्य बुद्धीच्या पलीकडचे असतात, हे गोव्याचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी (प्राणीप्रेमीही) मंत्री रवी नाईक यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे! त्यांनी नुकतेच लोकांनी वाघ व बिबट्यांना खायला द्यावे म्हणून सांगितलं. हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, कारण हा विचार कल्पनाशक्तीच्याही पलीकडचा आहे. त्यातही जर वाघ, बिबट्या घरी पाळा म्हटलेलं तर असंच होणार जणू उद्यापासून चंद्रावर राहायला जा!
त्यांच्या या वक्तव्यावर काही विचार करूया. त्यांचे म्हणणे आहे की जंगली जनावरे आता माणसाळली आहेत. हे खरे असले तरी, काही माणसे मात्र जनावरांप्रमाणे वागताना दिसतात. आज फोन स्मार्ट झालेत, शहरे स्मार्ट झाली आहेत (कदाचित), पण माणूस मात्र आळशी आणि मूर्ख होत चालला आहे.
जर रवी नाईक यांच्या प्रेरणेने एखाद्या किंवा सर्व गोमंतकीयांनी खरोखरच वाघ, सिंह किंवा रेड्यांना खायला देण्यास किंवा पाळायला सुरुवात केली, तर पहिली समस्या काय येईल? पिंजरा! वाघासाठी लागणारा पिंजरा विकत घ्यायला घरांमध्ये किंवा फ्लॅटमध्ये जागा पुरेल का? आणि समजा पुरलीच, तर तो पिंजरा रोज उघडणार व बंद करणार कोण? रवी नाईकांना मदतीला बोलवावे लागेल! एक मात्र नक्की, अलार्म लावण्याची गरज भासणार नाही, कारण डरकाळीनेच जाग येणार. पण त्याआधी भीतीमुळे झोप येईल की नाही, हा मोठा प्रश्न आहे! घरात जास्त समस्या नसतील, पण फ्लॅटमध्ये राहत असल्यास प्रत्येक सोसायटीत नवीन नियम बनवावे लागतील. रोजच्या समस्यांमध्ये या नवीन समस्यांची भर पडेल. जर बिबट्या स्विमिंग पूल आणि जिमचा वापर करू लागला, तर माणसे कुठे जाणार? अशा वेळी आत्माराम तुकाराम भिडे आणि पोपटलाल यांचा या प्राणी पाळण्यावर नक्कीच विरोध असणार!
जर शेजारच्या मांजर किंवा कोंबड्यांवर वाघाने ताव मारला, तर जबाबदार कोण? (मांजरावर ताव नाही मारणार म्हणे, ती वाघाची मावशी ना!) दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, प्राणीमित्रांचे काम कमी होईल, कारण जंगली जनावरे घरीच असल्यामुळे ती जास्त संकटात सापडणार नाहीत. साप वगैरे पोसला, तर दाराच्या मागे पॅन्ट किंवा बेल्ट लटकवतात तसा तो आरामात राहील. नागपंचमीची तर चिंताच नाही, कारण घरोघरी ‘पर्सनल नागोबा’ असणार, जो दूध पिणारही!
सकाळी मॉर्निग वॉकला निघाला, तर लोकांना कशाची भीती वाटेल? कुणी जर आपल्या घरी वाघ किंवा बिबट्या पोसलेला नसेल, तरीसुद्धा त्यांना घरी भीती असणारच ना! (कुणाची ती तुम्हीच ठरवा!) आजकाल निळा ड्रम बघून भीती वाटते. अशाने एक म्हणता येईल - "पूरे पुरुष समाज में डर का माहौल है!" आणखी एक गंमत म्हणजे रस्त्यावर कुणी 'वाघ' आडनावाचे वाघाला घेऊन वॉकिंगला गेले, तर परमिंदरप्रमाणे होणार, "मैं भी परमिंदर, ये भी परमिंदर, मी पण वाघ, हा पण वाघ!" टायगर श्रॉफ वाघाला घेऊन निघाले, तर दोघांमध्ये वाघ कोण यावर युद्ध होणार! तसेच बिबटे, वाघ एकमेकांच्या मतदारसंघात जायला लागल्यास वेगळेच प्रॉब्लेम्स होणार. मग पक्ष बदलणार की प्रजाती बदलणार हा प्रश्न पडेल!
रवी नाईक यांना कदाचित घरातील भांडणे मिटवायची आहेत, कारण ज्या घरात वाघ आणि बिबटे असतील, तिथे आपोआप शांती येणार. भांडणं होतीलच कशी? बिबट्यासमोर कोणी आवाज काढण्याची हिंमत करेल का? मला वाटते, रवी नाईक यांना कदाचित वाघ-बिबट्यांसारख्या 'पाळीव' प्राण्यांचा एक नवीन उद्योग सुरू करायचा असावा. जर 'हर घर वाघ' ही योजना असेल, तर जास्त काळजी करण्याची गरज नाही! कारण जो पर्यंत वाघ तुमच्या घरी येणार, तो पर्यंत तुम्ही आणखी कुणाच्या घरी पोहोचलेले असू शकता.
एक चांगले होणार ते म्हणजे गाडी-स्कूटरची गरज भासणार नाही. बिनधास्त वाघोबावर बसून कामाला जायचं. फक्त सर्वांना आपापले वाघ, बिबटे वगैरे बांधून ठेवावे लागतील, कारण त्यांच्यात युद्ध झाले तर!? तसेच वाघांना नावे पण द्यावी लागतील. कुत्र्याला शेरू नाव ठेवले जाते तेव्हा वाघाला काय ठेवणार, कुतू? तरी मी काय म्हणतो, आधी सर्व मंत्री, आमदारांनी आपापल्या घरी वाघ, बिबटा, रेडा पाळावा आणि तो कसा सांभाळला जातो हे आम्हाला दाखवावे. म्हणजे मग आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 'गो-टायगर' आणि 'गो-लेपर्ड' मोहीम सुरू करू. पण रवी नाईक त्यांना काय खायला घालणार हा पण प्रश्न आहे. कारण ते तर 'चाय पिया, सामोशा खाया' वाले आहेत. हो, अळंबी पण खा असेही म्हटले आहे. मध्ये त्यांनी म्हटलेले, 'सुदिन अंडा खाता है!' पण मला वाटते वाघ पाळला तर टायगर बिस्कीट देणे अधिक चांगले ठरणार. पण बिस्कीट हे विष आहे, बिस्कीट - 'विष की कीट' असे पुकी बाबा म्हणतात, म्हणजेच आपले अनिरुद्धाचार्य महाराज! मग रवी नाईक आणि पुकी बाबांचे चांगलेच वाजणार. पुकी बाबांनी दुसरा जन्म घेतला तरी रवींची हिंदी समजणार नाही. वृंदावन सोडून पुकी बाबांना झरेश्वरच्या पुढे आश्रम करावा लागणार. तिथे पुकी बाबा म्हणणार – “आपके चरणों में हमारा कोटि कोटि प्रणाम.”
कधी 'रवि'वारी संध्याकाळी जर रवी नाईक सिंहाला घेऊन चहा-सामोशा खायला बसले असल्यास, ते त्यांना अक्षय कुमारप्रमाणे म्हणणार, "बेटा एक शेर सुनाओ, और ज़ोर से..." तेव्हा शेर ऐवजी सिंहाच्या तोंडातून कदाचित चहा-सामोशाचा ढेकर येणार. त्यात आपल्या प्रमोद काकांनी म्हटले आहे, आमचे बजेट चतुर्थीच्या माटोळीप्रमाणे आहे. आता त्यांनी बजेटमध्ये वाघ, गळ्याचा पट्टा, पिंजरा यासाठी पण काही रुपयांचे नियोजन केलेले असेल, तर ठीक. नाही तर तात्पुरते आम्हाला वाघ, सिंह, रेड्यांना पार्किंग लॉटमध्ये ठेवावे लागणार. ‘फोर व्हीलर पार्किंग' ऐवजी 'फॉर वाघ पार्किंग' असे लिहायला पडणार. चतुर्थीपर्यंत सर्वांनी रेडे, वाघ पाळण्यास घेतले, तर आणखी त्रास, त्यांनी उडी मारून माटोळी खाली टाकली तर? तसेच गणपतीचा उंदीर मामा त्यांना बघून लपणार किंवा पळून जाणार. आता रेडे, वाघ यांना खूश करण्याच्या नादात मूषक नाराज होणार, त्याचे काय?!
वाघाला कोणती भाषा शिकवावी हा पण मोठा प्रश्न असणार. तेव्हा मला वाटते सर्व वाघांना एक एक मोबाईल द्यावा. पाहिजे ती भाषा शिकू देत! मग माझेही एक काम वाढणार, वाघांची हिंदी सुधारायची, पण त्यातही रिस्क आहेच की! 'रागाने वाघाने' मला खाऊन टाकले तर? आता श्रावण जरी असला, तरी त्यांचा श्रावण नसतो ना!
सध्या मला वाटते घरात असलेल्या मांजरी आणि कुत्री सांभाळणंच जास्त महत्त्वाचे तसेच रस्त्यावरच्या प्राण्यांनाही खायला द्यावं. कारण त्यांना सांभाळायला आम्हाला सरकारी मदतीची नाही, तर फक्त मायेची गरज आहे! तसे गोवा सरकारने हिंसक कुत्र्यांना पाळण्यास बंदी घातलेली आहे आणि आता म्हणतात वाघ पाळा. म्हणजे कुत्रा भयानक व वाघ नाजूक. चला तर "माझा वाघ, माझी शान!" लवकरच करू. शेवटी आपण एकच म्हणू शकतो – घरात वाघ असल्यास, आम्हाला भिवपाची गरज आसा!!!

आदित्य सिनाय भांगी
पणजी