दादांची मुलाखत घेणं हा माझ्यासाठी आकाशवाणीने दिलेला एक बहुमान होता. ही मुलाखत अविस्मरणीय होती. माझ्यातील मुलाखतकाराला या अनुभवाने प्रचंड बळ मिळालं.
आकाशवाणीच्या सेवेत मी पूर्ण वेळ रूजू होण्याआधीची ही गोष्ट. आकाशवाणीवर वेगवेगळे प्रोग्राम करायला आम्हाला अधूनमधून सांगावा यायचाच. युववाणी या युवकांच्या कार्यक्रमात त्यावेळी आम्ही सहभागी होत असू.
एक दिवस मला बा. द. सातोस्कर यांची मुलाखत घ्यायला बोलावलं. ‘माझे युवावस्थेतले दिवस’ या विषयावर काही सेलिब्रिटीजना बोलते करण्याची ही सिरीयल युववाणीत सुरू केली होती. बा. द. सातोस्कर हे गोमंतकचे प्रथम संपादक, इतिहास संशोधक व स्वातंत्र्यसैनिक.
दादा सातोस्कर हे फार मोठे प्रस्थ. त्यांचं कार्य व साहित्य यावर थोडा अभ्यास करावा लागला. मी त्यावेळी गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागात संशोधन सहाय्यक म्हणून सेवेत होतो. दादांची काही पुस्तके तिथेच आमच्या टेबलावर असायची. इतर संदर्भ वाचून प्रश्नावली तयार केली.
सातोस्करांचं वय झालं होतं, जे जाणवत होतं. बोलताना मध्येच त्यांना स्मृती दगा देत होती. मुलाखत कोंकणीत. रेकॉर्डिंग सुरू झालं. युवावस्थेतील अनेक प्रसंग बोलण्यासाठी मी त्यांना प्रवृत्त केलं. त्या काळातील आनंदाचा क्षण यावर ते बोलले. युवावस्थेतील एखादी अविस्मरणीय घटना किंवा प्रसंग सांगा असा माझा प्रश्न होता. दादांनी मुंबईच्या रेल्वेतील एक प्रसंग वर्णन करायला सुरुवात केली. उत्तर देताना मध्येच त्यांना ब्लँक व्हायला झालं. त्यांनी मला विचारलं – तुझा नेमका प्रश्न काय होता? नंतर ते पुढं बोलू लागले. त्यांनी सांगितलेली माहिती मला आता आठवत नाही. पण एक तरूण मुलगी आपल्याजवळ येऊन बसली. ट्रेन चालू होती... साधारण अशीच काही तरी घटना होती.
गोवा मुक्ती लढ्यात दादांचा सक्रीय सहभाग होता. त्यावर प्रश्न झाले. तरूणपणी ते मुंबईत होते. साहित्यिक पत्रकार असल्याने त्यांनी गोवा मुक्ती लढ्याविषयीची छापील पत्रके मुंबईतील इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांना पाठवायला सुरुवात केली होती. विसावा मासिक ते काढत होते. आमचें गोंय मासिकाचं संपादन ते करत. या विषयावर मी प्रश्न विचारले. दूधसागर हे त्यांचं मासिक मुक्ती चळवळीत मूल्यवान योगदान देणारं ठरलं. त्याच्यावर दादांना मी प्रश्न विचारले. मुंबईत त्यांनी अनेक वृत्तपत्रात, मासिकात गोवा मुक्ती आंदोलनाच्या ताज्या घटनांचा ऊहापोह करणारे लेख स्तंभ लिहिले. या मुद्द्यांवर सातोस्करांनी छान उत्तरे दिली.
दादांची मुलाखत घेणं हा त्या वयावर माझ्यासाठी आकाशवाणीने दिलेला एक बहुमान होता. ही मुलाखत अविस्मरणीय होती. माझ्यातील मुलाखतकाराला या अनुभवाने प्रचंड बळ मिळालं.
रेकॉर्डिंग झाल्यावर आम्ही खाली आलो. दादा म्हणाले – तू लिहितोस. छान उत्तम. पण फार मोठी गोष्ट नाही रे बाळ. तुमच्या घराण्यात आलेला वारसा हा. कृष्ण जगन्नाथ थळी हे मुंबईत माझे मित्र होते. ते जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकले होते. कवी होते. त्यांनी अभंग रचनाही केल्या आहेत. संत कृष्णंभट्ट बांदकर यांचे ते शिष्य.
दादांनी मुलाखतीनंतर कृष्ण थळींचे अनेक गुण मला सांगितले. मला जुजबी माहिती होती. पण आमच्याच घरातील पूर्वज एवढे मोठे सृजनशील कार्य करत होते, ते बा. द. सातोस्कर यांचे मित्र होते हे त्यांच्याच तोंडून ऐकताना अभिमान वाटला. मी मुंबईच्या मित्रांना कृष्ण थळी यांचं पुस्तक कुठून तरी मिळवून पाठवा असा आग्रह धरला. फार दिवसांनी एका मित्राने पुस्तक पाठवलं. कितीतरी वर्षं जुनं असं हे पुस्तक. तो ठेवा म्हणा वा ऐवज, माझ्या खास कपाटात आहे. त्यात बांदकर यांनी कृष्ण थळी यांना आपले सगळे अभंग छापण्याची अनुमती दिली होती तो संदर्भ आहे. त्यांच्या डोंगरी येथील भेटीचं वर्णन व बहुमूल्य आध्यात्मिक माहिती आहे.
हो, दादा सातोस्कर यांच्या मुलाखतीला हे पुस्तक प्राप्त करून आनंद मिळवण्याचं श्रेय जातं.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)