डॉ. प्रमोद सावंत यांनी एकहाती सत्ता राखली

मनोहर पर्रीकर राजकीय रंगमंचावर नसताना भाजपा प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरा जात होता. मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत व‌ गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे ही राम-लक्ष्मणाची जोडी जोरात कामाला लागली होती.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
27th July, 12:23 am
डॉ. प्रमोद सावंत यांनी  एकहाती सत्ता राखली

करोना नियंत्रणात येईपर्यंत जवळजवळ दोन वर्षे वाया गेली तेवढ्यात निवडणूक जवळ येऊन ठेपली. मनोहर पर्रीकर राजकीय रंगमंचावर नसताना भाजपा प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरा जात होता. मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत व‌  गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे ही राम-लक्ष्मणाची जोडी जोरात कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आशीर्वादाने निवडून येऊ शकणारे उमेदवार निश्चित करण्यात आले. साळगाव मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांना वगळून डॉ. सावंत सरकारमध्ये मंत्री असलेले गोवा फाॅरवर्ड पार्टीचे आमदार जयेश साळगावकर यांना साळगावची उमेदवारी देण्यात आली. पेडणे व मये मतदारसंघात विद्यमान आमदारांना डावलून प्रवीण आर्लेकर व प्रेमेंद्र शेट हे उमेदवार निवडण्यात आले. मगो पक्ष सोडून भाजपात आलेले बाबू आजगावकर यांना मडगावमधून उमेदवारी देण्यात आली. मगो पक्षाचा त्याग करून बाबू बरोबर भाजपात आलेले दीपक पाऊसकर यांना डावलून गणेश गांवकर यांना तिकीट लाभले. विश्वजीत राणे यांनी भाजपा श्रेष्ठीवर दडपण आणून आपली पत्नी डॉ. देविया राणे यांच्यासाठी पर्ये मतदारसंघाची उमेदवारी मिळवली. कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांना आपली पत्नी दिलायला लोबो यांच्यासाठी शिवोलीचे तिकीट हवे होते. पर्येतून विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ. देविया राणे आणि ताळगावमधून बाबुशची पत्नी जेनिफर यांना तिकीट देणाऱ्या भाजपा श्रेष्ठींनी दिलायला लोबो यांना तिकीट नाकारल्याने मायकलचे पित्त खवळले. त्यांनी भाजपाचा राजीनामा देऊन स्वतः ला  कळंगूट व पत्नी दिलायला लोबो यांना शिवोलीतून काँग्रेसचे तिकीट मिळविले. म्हापशात सुधीर कांदोळकर व साळगांवमधून केदार नाईक  यांना मायकलच्या शिफारशीवरुन काँग्रेसने तिकीट दिले. आपले चार उमेदवार निवडून येतील व आपणच  मुख्यमंत्री बनणार असा मायकलचा डाव होता. मायकलचे तीन उमेदवार निवडून आले पण म्हापशात विजय भिके यांनी घात केला.  म्हापशातून काँग्रेस तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल ५ वर्षे प्रयत्न चालविले होते. यंदा तिकीट मलाच असे वाटत असतानाच अकस्मात मायकलने सुधीर कांदोळकर यांचे घोडे पुढे दामटले होते. त्यामुळे विजय भिके यांनी सुधीरला अपशकून केला. ते निवडून आले असते तर २०२७! मध्येही तेच उमेदवार झाले असते. ते पडले त्यामुळे आता २०२७ मध्ये तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न तरी करता येतील.

संपूर्ण देशात करोना महामारी चालू असताना २०२१ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर गोवा भर "नवी सकाळ"चे भले मोठे फलक झळकले. सोबत पश्चिम बंगालच्या ममतादीदींची छबी होती. २०२२ मध्ये गोवा काबीज करण्याचा चंग ममतादीदींनी बांधला होता. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो त्यांच्या गळाला लागले होते. पश्चिम बंगालमधून त्यांना लगेच राज्यसभेवर निवडून आणले.  गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो पश्चिम बंगालमधून राज्यसभेत पोहचले. ममतादीदींचे सगळे आदेश मानले असते तर आजही फालेरो  राज्यसभा सदस्य असते. फालेरो ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसच्या कळपात आल्याने गोव्यातील विशेषतः सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्याक नेते टीएमसीकडे आकर्षित होतील असा ममता बॅनर्जी यांचा होरा होता. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. पश्चिम बंगालच्या टीएमसी ऐवजी गोव्यातील अल्पसंख्याक लोकांना दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीबद्दल अधिक आकर्षण होते.  सासष्टी तालुक्यातील सुशिक्षित लोकांनी केजरीवाल यांना आदर्श मानून त्या पक्षाच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत आणखी एक वेगळा प्रयोग केला.  गोव्यात भंडारी समाज हा सर्वात मोठा समाज असल्याने आम आदमी पार्टीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री भंडारी समाजाचाच अशी घोषणा केली. आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अॅड अमित पालेकर हे मुख्यमंत्री बनतील अशी घोषणाही करण्यात आली. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी गोव्यात आले तेव्हा त्यांनी गोवा भंडारी समाज कार्यालयात जाऊन भंडारी समाजाच्या नेत्यांची भेट घेतली. आम आदमी पार्टीला गोव्यात बहुमत मिळाले तर पार्टीचे प्रमुख भंडारी बांधव अॅड अमित पालेकर यांना मुख्यमंत्री केले जाईल असे स्पष्ट आश्वासन भंडारी समाज नेत्यांना दिले. आपल्या समाजाचा मुख्यमंत्री होणार म्हणून गोव्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले भंडारी बांधव आम आदमी पार्टी उमेदवारांनाच मतदान करतील अशी केजरीवाल यांची अपेक्षा होती. निदान भंडारी समाजाच्या नेत्यांनी तसे जाहीर आवाहन करावे अशी केजरीवाल यांची अपेक्षा असावी.  मात्र भंडारी समाज नेत्यांनी तसे करणे टाळले. भाजपा, काँग्रेस, मगो, गोवा फाॅरवर्ड, आरजी या सगळ्याच पक्षांनी भंडारी नेत्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भंडारी मतदारांनी भंडारी उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन भंडारी समाजाने केले होते पण  त्या आवाहनाला भंडारी बांधवांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. भंडारी समाजाचे फक्त ४ उमेदवार निवडून आले. अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाज नेत्यांची भेट घेतल्याने भंडारी समाजाचे तीन प्रमुख नेते अडचणीत आले आहेत. इडीने या प्रमुख नेत्यांना चौकशीसाठी बोलावले होते. आम आदमी पार्टी नेत्यांच्या भेटीमुळे ही नसती आफत आली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार साळगावकर यांना भाजपने पळविल्याने विजय सरदेसाई बरेच नाराज झाले होते. शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांना परत तिकीट द्यायची नव्हती. अशा परिस्थितीत फातोर्डामधून निवडून यायचे असल्यास काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज होती. काँग्रेसने फातोर्डा मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला असता तर विजय सरदेसाई यांचा मोरया झाला असता. त्यामुळे गरज म्हणून विजय सरदेसाई यांनी काँग्रेसबरोबर युती केली.

मायकल लोबो यांनी बंड केल्याने भाजपावर संकट कोसळले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही अपक्ष बनून निवडणूक आखाड्यात उडी मारल्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीचा बादशहा बाबुश मोन्सेरात या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुदध बंड पुकारून आपली राजकीय  अपरिपक्वता सिद्ध केली.

लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर किंवा मायकल लोबो यांच्या बंडाची पर्वा न करता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निवडणुकीला सामोरे गेले आणि भाजपा २० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. मायकल लोबो यांनी बंड करून भाजपाच्या ३ जागा हिरावून घेऊनही भाजपाने २० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या होत्या. मगो व आम आदमी पार्टीला प्रत्येकी २ जागा मिळाल्या होत्या. विजय सरदेसाई यांनी काँग्रेसच्या आधाराने आपली जागा राखली होती. नव्यानेच निवडणूक आखाड्यात उतरलेल्या आरजी पार्टीने सांत आंद्रे काबीज करून सर्वांनाच धक्का दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांनी एकहाती सत्ता राखली होती. 


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)