गोव्याच्या हौशी रंगभूमीचे विविधांगी पैलू

गोव्यातील हौशी रंगभूमीचा इतिहास, तिचा लहान मुलांवर आणि एकूणच समाजमनावर होणारा परिणाम; नाटकांच्या तालमींपासून ते सादरीकरणापर्यंतचे बदल, स्त्री कलाकारांची भूमिका आणि आजच्या हौशी रंगभूमीसमोरील आव्हाने.

Story: रंगमंच |
27th July, 12:08 am
गोव्याच्या  हौशी रंगभूमीचे  विविधांगी पैलू

नाटकांचा समाजावर इतका खोलवर परिणाम होत असे की, नाटक संपल्यावर आणि नाटकानंतरही महिनाभर त्याविषयी गावात चर्चा रंगायची. नाटक निश्चित झाल्यावर नाटकाचा खर्डा (script) कलाकारांना दिला जात असे, ज्यामुळे त्यांना आपले संवाद (भाषण) चांगल्या प्रकारे पाठांतर करता येत. तालमी (येसाय) तीन-तीन महिने चालायच्या, त्यामुळे नाटकही दर्जेदार होत असे. एखाद्या नवख्या युवकाला नायकाची (हिरोचा) भूमिका दिली तर, "त्याच्याकडून ही भूमिका होईल का? देवच जाणे! तो बिचारा नवीनच आहे आणि त्याला नायकाचा भाग दिलाय," अशी चर्चा असायची. तर एखाद्या सडपातळ माणसाला भीमाची भूमिका दिली तर, "तो मेल्या असा शिरपूट (बारीक) कसा? भीमाचा भाग होईल का त्याच्याकडून?" असा प्रश्न मस्करीने उपस्थित केला जात असे. एखादी विनोदी भूमिका करणाऱ्या कलाकाराची महिनाभर टिंगल उडवली जात असे. नायिकेसोबत काम करणाऱ्याला "जोडी चांगली दिसतेय रे..." अशी थट्टा-मस्करी केली जात असे. ही थट्टा-मस्करी लहान मुलांकडूनही केली जात असे. विशेष म्हणजे, नवीन भूमिका करणाऱ्या कलाकारांचे रंगमंचावरील स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने व्हायचे आणि ते कलाकार आपल्या सहकलाकारांना मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड करत असत. हा प्रकार अजूनही गोव्यातील काही ग्रामीण भागात चालू आहे.

लहान मुलांवरील नाटकांचा प्रभाव

गावातील लहान मुलांवर त्या नाटकांचा इतका प्रभाव असायचा की, नाटकाच्या तालमी सुरू झाल्यापासून नाटक संपेपर्यंत मुले अवतीभोवती असायची. नाटक झाल्यानंतरही महिनाभर या मुलांवर नाटकाचा प्रभाव असायचा. लहान मुले आपल्या घराच्या पडवीत, खोपीत, मांडवात, मळावर खेळताना या नाटकातले काही भाग आपल्या भाषेत सादर करायची. एखादे नाटकातले पद आवडले तर ते महिनाभर त्यांच्या तोंडात घोळायचे. शिवाजी, संभाजी यांसारख्या भूमिका पाहून लढाईसाठी चक्क माडाच्या पिराड्यांपासून (झाडांच्या पानांच्या देठांपासून) तलवारी बनवायची. रंगभूषा करताना लाल दगडापासून रंग तयार करून तोंडाला फासायचे. वेशभूषेसाठी घरातील महिलांचे कापड किंवा साडीचा वापर करायचे. मुकुट किंवा टोपी बनवण्यासाठी पुट्ट्यांचा (पुठ्ठ्यांचा), पताकांच्या (पताका, पताका-कागद) कागदाचा वापर करायचे. अशा या प्रभावाच्या वातावरणातूनच हौशी रंगभूमीमुळे गोव्यात अनेक रंगकर्मी निर्माण झाले आणि याच हौशी रंगभूमीने महाराष्ट्रातील व्यावसायिक रंगभूमीला मास्टर दत्ताराम, काशिनाथ शिरोडकर यांसारखे दिग्गज नाट्य कलाकार दिले, हे विशेष.

दिग्गज दिग्दर्शक

सूर्या विष्णू वाघ, तातोबा वेलिंकर, मास्टर दत्ताराम, मास्टर गंगाराम, नरहरी वळवईकर, काशिनाथ शिरोडकर असे दिग्गज नाट्यदिग्दर्शक गोव्याला लाभले होते. यांपैकी सूर्या विष्णू वाघ व तातोबा वेलिंगकर यांनी गोव्यातच राहून नाट्य कलेची सेवा केली. जाणकार कलाकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूर्या विष्णू वाघ हे ऐतिहासिक व पौराणिक नाटकांचे दिग्दर्शन करत होते, तर तातोबा वेलिंगकर हे सामाजिक व पौराणिक नाटकांचे दिग्दर्शन करत होते. रहदारीचे साधन नसतानाही या दोन्ही नाट्य दिग्दर्शकांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नाटके शिकवली. काही ठिकाणी ते दहा-पंधरा दिवस वास्तव करून रहायचे. याशिवाय त्या-त्या भागात लहान-सहान दिग्दर्शक असायचे.

नटी (स्त्री कलाकार) शोधणे

हल्लीच्यासारखे त्यावेळी प्रत्येक घरात टेलिफोन किंवा मोबाईलही नव्हते. त्यामुळे स्त्री कलाकार शोधायला संपूर्ण गोवाभर फिरावे लागत होते. यासाठी एक-दोन दिवस वायाही जायचे. ती कुणाकडे राहते याबद्दल मोठे कुतूहल असायचे. तिला आणून परत माघारी पाठवेपर्यंतचा काळ खूप मजेशीर असायचा. ज्याच्याकडे ती राहायची त्याचा तर तोराच वेगळा असायचा. नटी आली रे आली की, गावातील उतावीळ पोरांचा तिला पाहण्यासाठी गराडा असायचा. ज्या ठिकाणी नाटक असायचे, त्या ठिकाणी बाजूच्या गावातील तरुण नाटक पाहण्यासाठी मुद्दाम जात होते व तिला पाहून आपल्या नाटकासाठी ‘बुक’ करायचे. मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, तिने नाटकात अभिनय कसाही करू दे, पण ती दिसायला सुंदर दिसली पाहिजे असा काही कलाकारांचा अट्टाहास असायचा. त्यावेळी एकदा आणलेली स्त्री कलाकार त्या नाट्यसंस्थेत किमान सात-आठ वर्षे काम करायची. वर उल्लेख केलेल्या स्त्री कलाकार सोडून १९८० सालानंतरही मोजक्याच स्त्री कलाकारांनी हौशी रंगमंचावर पदार्पण केले होते. त्यामुळे स्त्री कलाकारांची कमतरता भासत होती. यामुळे कधी-कधी नाटकातील नायकापेक्षा १०-१५ वर्षे वयाने मोठ्या असलेल्या स्त्री कलाकाराबरोबर त्याला काम करावे लागत होते.

नाटके 'पावणी'वर घेण्याची परंपरा

गोव्यातील पेडणे व इतर ठिकाणी नाटके 'पावणी'वर घेण्याची (ठेका घेणे) परंपरा होती. आजही ही परंपरा फोंड्यातील आडपई व इतर ठिकाणी आहे. उत्सव संपल्यानंतर देवस्थानाची सार्वजनिक बैठक व्हायची आणि यावेळी पुढील वर्षाच्या नाटकांची 'पावणी' केली जात होती. ही 'पावणी' गावातील एखादा हौशी तरुण घ्यायचा. यातून पैसा कमावण्याचा अजिबात हेतू नसायचा. उलट स्वतःच्या खिशातून पैसे खर्च होण्याची शक्यता असूनही, केवळ नाटक करण्याच्या हौसेपायी तो 'पावणी' करायचा. (क्रमश:)


उमेश नाईक,
कुळे
(लेखक ‘गोवन वार्ता’चे धारबांदोडा प्रतिनिधी आहेत.)