रस्त्यांवरील भटक्या गुरांचा प्रश्न तीन महिन्यांत तडीस लावला जाईल : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st July, 02:59 pm
रस्त्यांवरील भटक्या गुरांचा प्रश्न तीन महिन्यांत तडीस लावला जाईल : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : गोव्यात रस्त्यांवर भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असून, हा गंभीर प्रश्न येत्या तीन महिन्यांत सोडवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. पंचायतींनी गोशाळांशी समन्वय साधावा आणि स्थानिक आमदारांनी या कामात पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी शून्यप्रहराच्या वेळी हा मुद्दा उपस्थित केला. अनेक वेळा हा विषय सभागृहात उपस्थित केला जातो, मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रस्त्यांवर भटकणाऱ्या जनावरांमुळे रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘सरकारकडे गोशाळांची सुविधा असूनही काहीजण मुद्दाम जनावरे रस्त्यावर सोडतात. त्याच जनावरांना जेव्हा कोणी गोशाळेत ठेवण्यासाठी घेऊन जातात, वादाचे प्रकार उद्भवतात.  हे प्रकार थांबवण्यासाठी पंचायतांनी गोशाळांशी करार करावेत आणि आमदारांनी त्या प्रक्रियेत पुढाकार घ्यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दक्षिण गोव्यात भटक्या जनावरांची संख्या अधिक असून, दोन ते तीन महिन्यांत त्यांना एकत्र करून गोशाळांमध्ये ठेवण्याचे काम केले जाईल. संबंधित पंचायतींनी आधीच गोशाळांशी करार केल्यास, कोणताही त्रास उद्भवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा