छापे टाकून त्रास देण्याचा एफडीएचा हेतू नाही : आरोग्यमंत्री राणे

अन्नाच्या गुणवत्तेवर भर : निकृष्ट अन्नाची तक्रार करण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st August, 12:05 am
छापे टाकून त्रास देण्याचा एफडीएचा हेतू नाही : आरोग्यमंत्री राणे

पणजी : राज्यात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) खाते अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहे. मात्र केवळ छापे टाकून कोणालाही त्रास द्यायचा हेतू नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सभागृहात मांडले. जर कुणाला निकृष्ट अन्न दिले गेले, तर त्यांनी एफडीएकडे तक्रार करावी, असेही आवाहन त्यांनी केले.कुडतारीचे आमदार अालेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला की, एफडीएकडून अलीकडे सातत्याने छापे टाकले जात आहेत. पण, चांगल्या अन्नाची हमी कुठे आहे? त्यांनी टोमॅटो सॉस, चिकन नगेट्स आणि चीजसारख्या पदार्थांमध्ये पदार्थ कमी आणि भेसळ अधिक असल्याचे नमूद केले. रेजिनाल्ड म्हणाले, अन्नाच्या गुणवत्तेतील घट आणि त्याचा कॅन्सरसारख्या आजारांशी संबंध दर्शवणारे अहवाल समोर येत आहेत.
यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, आमचा उद्देश त्रास देण्याचा नाही. आम्ही छापे टाकत आहोत, पण त्या फक्त चौकशीसाठी आहेत. जर कुठे वाईट पदार्थ आढळले, तर संबंधित विक्रेत्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतरच पुढील कारवाई होते. काही ठिकाणी कारवाईमुळे कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या फळांची विक्री कमी झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. एफडीएच्या अधिकार व कर्तव्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
एफडीएच्या नवीन संचालकाने रुजू झाल्यानंतर किती कारवाई झाली याची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने निरीक्षण सुरू आहे. याशिवाय, अन्न सुरक्षा क्षेत्राचे क्लस्टर तयार करून देखरेख आणखी बळकट करण्यात आली आहे.
आम्ही यावर लक्ष ठेवणे सुरू ठेवले आहे. नवीन एफडीए संचालकांना नियुक्त केल्यापासून किती लोकांवर कारवाई झाली आहे याची यादी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही क्लस्टर तयार केले आहेत. आम्हाला विभागाकडून अन्नाबाबत माहिती मिळते, असेही मंत्री राणे म्हणाले.

ज्यांना चांगले अन्न मिळत नाही, त्यांनी तक्रार करावी. आम्ही कारवाई करत राहू. आमचा त्रास देण्याचा हेतू नाही, तर जनतेला सुरक्षित अन्न मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. - विश्वजित राणे, आरोग्य मंत्री

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारले की, जे विक्रेते वारंवार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्यासारखी कठोर कारवाई का केली जात नाही? यावर उत्तर देताना राणे यांनी सांगितले की, बांबोळी इस्पितळाच्या बाहेर विकल्या जाणाऱ्या अन्नगाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.