श्रावण महिना म्हणजे निसर्गाची हिरवीगार उधळण, जिथे इंद्रधनूचे गोफ विणले जातात आणि वातावरण मंगलमय होते. हा केवळ पावसाळ्याचा एक महिना नसून, धार्मिक सण-उत्सव, व्रतवैकल्ये आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक पैलू याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देतात, विशेषतः गोव्यासारख्या निसर्गरम्य प्रदेशात.
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस. श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. डोंगर, माळराने हिरवीगार होऊन विविध रंगांची फुले उमलतात. नद्या आणि जलाशय पावसाच्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहतात. कधी एकदम कडक ऊन पडते, तर कधी पावसाच्या सरी. अधूनमधून दिसणाऱ्या इंद्रधनुष्यामुळे तर वातावरण अधिकच रंगून जाते. प्राणी, पक्षी व इतर वन्यजीवही या मनमोहक वातावरणात अगदी खुलून जातात. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे म्हटले जाते.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणाऱ्या ह्या महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे, देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर व्रतवैकल्ये, उपवास, साधना केली व भगवान शंकर यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या या कडक व्रतांमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला. त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
आषाढी अमावस्येला दीपपूजन केल्यानंतर व्रतवैकल्यांना सुरुवात होते. श्रावणातील सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असून, या दिवशी उपवास, पूजा-अर्चा केली जाते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे पहिले पाच वर्ष व्रत करतात. काही महिला हे व्रत आयुष्यभर करतात. श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. वन्यसृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमा हे सण साजरे केले जातात. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. एकंदरीत, श्रावण महिना हा निसर्गाच्या सान्निध्यात व धार्मिकतेत एकरूप होण्याचा काळ आहे.
आरोग्याच्या दृष्टीने श्रावण
श्रावण महिना हा प्राण्यांच्या प्रजननाचा काळ. या काळात कीटक, प्राणी व इतर वन्यजीव प्रजनन करतात. मासे, मांस खाल्ल्यास आपल्या हार्मोन्समध्येही बदल होऊ शकतो. या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. श्रावण महिन्यात मांसाहार न करणे, हे निसर्गाच्या नियमांनुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरणासोबतच आरोग्याचेही रक्षण होते. त्यामुळे या महिन्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात अनेक जलजन्य रोग होण्याची शक्यता असते व मांसाहारामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तसेच, पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मानवी पचनसंस्थेची क्षमता मंदावते व मांसाहार पचायला वेळ लागतो. पचनक्षमता कमजोर झाल्यामुळे या दिवसात हलक्या आहाराला प्राधान्य दिले जाते.
गोव्यातील श्रावण
पश्चिम घाटाच्या रांगेत ओवलेल्या गोवा राज्याला भारतातील निसर्गरम्य प्रदेश म्हणून ओळखले जाते. मांस-मच्छीशिवाय जेवण न रुचणाऱ्या मांसाहारी गोवेकराला श्रावण मासात आधार मिळतो तो डोंगरकपारीत उगवणाऱ्या रुचकर अळंबी व पौष्टिक रानभाज्यांचा. गोव्याचा मेरुमणी, सह्याद्री श्रावणात एकदम खुलून जातो. पेडणे ते काणकोणपर्यंत पसरलेल्या या डोंगराळ भागात श्रावण महिन्यात विविध वन्यजीवांचे दर्शन होते. चोहीकडे बहरलेली वनस्पती, रंगबेरंगी फुले, दुधाळ धबधबे व धार्मिक वातावरण श्रावण मास अधिक खुलवतो.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)