श्रावण आला की मांसाहारी जिभेचे चोचले पुरवायचं साधन म्हणजे सोयाबीन. आता खरंतर श्रावणाला सुरुवातच आहे, पण अस्सल गोवेकर श्रावणात शाकाहार करत असतील तर त्यांच्यासाठी काट्यांचे आणि हाडांचे नसले तरी प्रती चिकन असलेले सोया चंक्स नेहमीच मदतीला धावून येतात. चला तर पाहुयात आजची अशीच एक चमचमीत रेसिपी.
साहित्य :
एक कप सोया चंक्स
दोन मध्यम कांदे
दोन ते तीन टोमॅटो
दही
हळद
लाल तिखट
आलं लसूण पेस्ट
गरम मसाला
लसूण पाकळ्या
तेल धणे
तमालपत्र
आवश्यकतेनुसार पाणी
चवीनुसार मीठ
कृती :
प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात सोया चंक भिजत ठेवा आणि चांगले फुगल्यानंतर हाताने दाबून थंड पाण्यात टाका. मग त्यातून सोया चंक पुन्हा हाताने दाबून एका ताटात घ्या. नंतर त्यात दही, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धणेपूड, मीठ टाकून हे मिश्रण चांगले चंक्सला लावून चंक्स दहा मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवा.
गॅसवर एका कढईत मंद आचेवर तेल गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, धणे, लसूण यांची एकत्र केलेली प्युरी तेलात परतवून त्यात थोडी हळद, लाल तिखट टाकून चांगले पुन्हा एकदा परतवा.
आता यात मॅरिनेट केलेले सोया चंक्स घाला व या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण आणखीन पाच मिनिटे शिजू द्या. नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही सोया चंक्सची चमचमीत करी चपाती किंवा मलबार पराठ्यांसह सर्व्ह करा.
शिल्पा रामचंद्र, मांद्रे