उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पणजी : गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने खुल्या जागेत आयोजित संगीत कार्यक्रमांतील ध्वनीप्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेली अवमान याचिका निकाली काढताना, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (जीएसपीसीबी) कडक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, अशा ठिकाणी संगीत वाजवणाऱ्या सर्व कार्यक्रमस्थळी आता ठळकपणे आवाज मर्यादेचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आयोजक व नागरिक यांना कायदेशीर मर्यादांची जाणीव राहील, असा हेतू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आता न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, ठरवलेल्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारही त्यांना देण्यात आला आहे.
गोव्यातील पर्यटन व नाईटलाइफ क्षेत्रात वाढत्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी व पर्यावरण-संवेदनशील भागांमध्ये आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.