वेळेत उत्तर देत टाळली शिस्तपालन कारवाई
म्हापसा : पंचायत खात्याशी संबंधित विधानसभेतील एलएक्यू प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बार्देश तालुक्यातील चार पंचायत सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यानंतर त्यांनी ४८ तासांच्या आत सदर प्रश्नांचे उत्तर सादर करत तात्पुरती शिस्तपालन कारवाई टाळली आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान विचारण्यात आलेल्या एलएक्यू क्रमांक १२९ ई व ६ ब यासंदर्भातील उत्तर वेळेत न सादर केल्यामुळे हळदोणा, कळंगुट, सडये-शिवोली व रेईश मागुश या ग्रामपंचायतींचे सचिव गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांच्या रडारवर आले. सचिव प्रमोद नाईक, अर्जुन वेळीप, दिप्ती मांद्रेकर आणि पीटर मार्टीन यांना २४ जुलै रोजी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती.
सरकारने निर्धारित केलेल्या नियमांनुसार एलएक्यू उत्तर सादर न केल्यास सीसीएस (वर्तणूक) नियमांतर्गत शिस्तपालनाची शिफारस केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसीत देण्यात आला होता. त्यानुसार संबंधित सचिवांनी ४८ तासांच्या आत उत्तर आणि आपली बाजू मांडत उत्तर सादर केल्यामुळे पुढील कारवाई सध्या तरी टळली आहे.