नागपंचमी: मामा आणि भाचीची कथा

नागपंचमी, शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याचा एक पवित्र सण. नागाला ‘मामा’ मानून वारुळाची पूजा केली जाते. या सणामागे एक हृदयस्पर्शी लोककथा आहे, जी सृष्टीतील प्रत्येक घटक मानवाच्या खदुःखात कसे देवत्व जपतो हे दर्शवते. पूर्वी भाऊ नसलेल्या मुली हा उपवास धरत असत, कारण त्यांच्यासाठी नागच मामा किंवा भाऊ म्हणून त्यांच्या आयुष्यातील भावाची उणीव भरून काढत असे.

Story: भरजरी |
27th July, 12:09 am
नागपंचमी: मामा आणि भाचीची कथा

राई नावाचा एक गवळी असतो. त्याच्या सात सुनांपैकी सहा सुनांना भाऊ असल्यामुळे नागपंचमीच्या सणाला त्या माहेरी जातात. सातव्या सुनेला मात्र भाऊ किंवा वडील नसल्यामुळे तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीच नसते, त्यामुळे ती सासरीच राहते. सणासुदीच्या दिवशी माहेरचे कोणीही नसल्यामुळे तिला फार दुःख होते. मनातील दुःख हलके करण्यासाठी ती भांडी धुण्याच्या निमित्ताने नदीवर जाते. तिथे ती खूप रडते, कारण तिला कोणी आप्त नाही, माहेर नाही आणि ती अनाथ असल्याची जाणीव तिला होते.

राई बा गवळ्याच्यो सातजानी सुनो,

आलो गे नागाचा सण.

सई गे नारी काय माहेरा गेल्यो,

सातवी सुना काय घराशी राहिली.

आयदना घेऊन न्हयेर गेली,

न्हयेर जाऊन रडू लागली.

सई गे जावांचे बंधू गे येईले,

तेही गे सये गे माहेरा गेल्यो.

माजो शी कोणी बंधू नाही बाप,

मी तरी जाईन खुयाच्या माहेरी.

तिच्या रडण्याचा आवाज नागलोकात असलेल्या नागाच्या कानी पडतो. तो आपल्या पत्नीला सांगतो की हा रडण्याचा आवाज त्याच्या भाचीचा आहे. तिची आई दर नागपंचमीला त्याची पूजा करायची. आता तिची आई नाही, बाबा नाहीत, आणि तिला भाऊही नाही. त्यामुळे तिच्या नशिबी माहेरवासाचे सुख नाही. म्हणून तो तिला माहेरी (आपल्या घरी) घेऊन येण्याचे ठरवतो. नागीण आनंदाने या गोष्टीला मान्यता देते.

नाग ब्राह्मणाचे रूप घेऊन सुनेसमोर उभा राहतो आणि म्हणतो, "मुली, उठ, अशी रडू नकोस. मी तुला माहेरी न्यायला आलो आहे आणि तू अशी इथे नदीवर रडत बसली आहेस का? चल, उठ, ये माझ्याबरोबर." सुनेला आश्चर्य वाटते की हा अनोळखी ब्राह्मण तिला माहेरी न्यायला का आला आहे. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह ओळखून ब्राह्मणरूपी नाग तिला सांगतो, "मी तुझ्या आईचा दूरचा भाऊ आहे. या नात्याने मी तुझा मामा आहे. आज तुझ्या सहाही जावा माहेरी गेल्या आणि तू एकटीच घरी राहिलीस, म्हणून तुलासुद्धा माहेरी न्यावे म्हणून मी आलो आहे."

सातव्या सुनेला खूप आनंद होतो. ती आपल्या मामाला घेऊन घरी येते. सासू-सासऱ्यांनाही आनंद होतो. ते आनंदाने आपल्या धाकट्या सुनेला तिच्या मामासोबत माहेरी पाठवतात. पण जाताना ब्राह्मणरूपी नागाकडून वचन घेतात की, "आमच्या सुनेला सुखरूप परत आणा." अशाप्रकारे सातवी सून ब्राह्मणरूपी नागासोबत त्याच्या घरी जाऊ लागते. नाग नदीकाठची वाट धरतो आणि हळूहळू नदीत उतरतो. सुनेला आश्चर्य वाटते की, नदीतून जाणारी ही वाट कुठल्या गावी जात असेल? ती गुडघाभर पाण्यात पोहोचते आणि मामाला आवाज देते,

ढोपरभर पाणी काय जाता रे मामा,

सांग आम्ही खुय जातूय?

जाता ते जाव गे, तिच्या मागे शी येय.

मामा तिला सांगतो की, पाणी कितीही वाढले तरी तू माझ्यासोबत ये. पाणी हळूहळू तिच्या गळ्यापर्यंत पोहोचते, पण तरीही मामा मागे येण्यास सांगत असल्यामुळे ती त्याच्या मागे मागे जाते. बघता बघता ते दोघे नागलोकात पोहोचतात. ही गोष्ट सुनेसाठी अनपेक्षित असते. नागलोकी पोहोचताच ब्राह्मणरूपी नाग आपल्या मूळ रूपात येतो आणि सुनेला सांगतो, "तुझी आई मला भाऊ म्हणायची. दर नागपंचमीच्या दिवशी माझी पूजा करायची. या नात्याने मी तुझा मामा आहे. तुला माहेरी न्यायला कोणीही नसल्यामुळे मी तुझा मामा तुला न्यायला आलो. तुला हवे तितके दिवस तू माझ्या घरी राहा. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तुला घरी पुन्हा पोहोचवेन. इथे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे तू घाबरू नकोस."

इतक्यात सर्व नागांना कळते की त्यांच्या नागलोकात माणूस आला आहे. त्यामुळे तिच्यावर हल्ला करण्यासाठी सगळे साप येतात, तेव्हा नाग त्यांना बजावून सांगतो, "माझ्या भाचीच्या केसाला जरी धक्का लागला, तरी मी कोणालाही सोडणार नाही." तेव्हापासून कोणीही सुनेच्या वाटेला जात नाही. मामा आपल्या भाचीला घेऊन घरी जातो. तिथे तिची मामी नागीण पंचारतीने ओवाळून आपल्या भाचीचे स्वागत करते. नाग-नागिणीच्या प्रेमामुळे सून आपल्या या मामाच्या घरी छान रमते.

तेव्हा नागीण गरोदर असते. ही त्यांची भाची या कठीण काळात नागिणीची खूप सेवा करते. नागिणीला प्रसववेदना सुरू होताच भाची हातामध्ये लामण दिवा पेटवून नागिणीच्या बाजूला बसते. नागिण दोन नागांना जन्म देते. नुकतेच जन्मलेले वळवळणारे नाग पाहून मात्र भाचीला शिसारी येते. ती घाबरते, त्यामुळे तिच्या हातातून धरलेला लामन दिवा निसटतो.

पाच गे वातीचो दिवो गे घरीलो,

भाचेच्या हाती काय दिवो सो दिलो.

नागाचे काय बाळ जन्मलो,

बाळाक बघून हात थरथरलो.

दिवो सो काय हातान निसटलो.

पण लामन दिवा हातातून निसटला तो नागिणीच्या एका बाळाच्या शेपटीवर पडतो, त्यामुळे त्याची शेपटी तुटते. आपल्या भाचीची घाबरलेली अवस्था पाहून नाग तिला पुन्हा सासरी पोहोचवतो.

इकडे नागलोकात नागाची दोन्ही बाळं वाढू लागतात. एकाचे नाव ठेवले पांडोबा आणि शेपटी तुटलेल्या बाळाचे नाव ठेवले लांडोबा. पण ज्या सापांची शान शेपटी असते, तीच शेपटी नसल्यामुळे लांडोबाला खेळताना त्याचे मित्र चिडवू लागतात. शेपटी नसलेला साप म्हणून हिणवू लागतात. या गोष्टीचा पांडोबा आणि लांडोबा दोघांनाही खूप राग येई. ते रागाने येऊन आईला विचारतात की त्यांची शेपटी कशी तुटली? पण नागिणीने त्यांना हे गुपित सांगितलेले नसते. अशाप्रकारे वर्ष उलटून जाते. दुसऱ्या वर्षीचा नागपंचमीचा सण येतो. आता लांडोबा आणि पांडोबा मोठे झाले होते. दोघांनाही आता समज आल्यामुळे नागिणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पण या गोष्टीचा लांडोबा आणि पांडोबा या दोघांनाही खूप राग आला. दोघांनीही शेपटी तुटलेल्या प्रसंगाचा सूड घ्यायचे ठरवले.

सुडाच्या भावनेने लांडोबा आणि पांडोबा यांनी राई गवळ्याच्या घराची वाट धरली. दुपारच्या आतच ते राई गवळ्याच्या घरी पोहोचले. दोघेही तिन्हीसांजेची वाट बघू लागले. तिन्ही सांजा झाल्या, काळोख झाला की हळूच घरात जायचे आणि आपली शेपटी तुटलेल्या सुनेचा चावा घेऊन सूड घ्यायचा असे दोघांनी ठरवले. म्हणून उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने दोन्ही नाग दबा धरून बसले. संध्याकाळ झाली तशी सातव्या सुनेची लगबग सुरू झाली.

नागाच्या सणाला भयन उठली,

पाटाळ काढली नागाची नकशी.

पाच गे वातीचो दिवो पेटयलो,

थयनी ठेविला दूध नी ल्हायो,

थय काय ठेवीला गंध नि धूप.

भयण भावाची वाट बघत,

केंना गे माझे भाऊ येतले?

दूध नि ल्हायो काय खाऊन जातले?

तिने तिन्हीसांजेच्या कातर वेळेला चुली जवळ एक पाट ठेवला. त्या पाटाभोवती सुंदर नक्षीदार रांगोळी काढली. बाजूला केळीचा द्रोण करून त्यात लाह्या ठेवल्या, दूध ठेवले. पाटावर दोन नागांची चित्रे काढली. धूप, अगरबत्ती लावून सुगंधाचा घमघमाट केला. नंतर उंबरठ्यावर येऊन बसली, आपल्या दोन्ही भावांची, लांडोबाची आणि पांडोबाची वाट बघत. कारण आज नागपंचमी असल्यामुळे त्यांची अगोदर पूजा करायची आणि नंतर त्यांच्याबरोबर आपल्या माहेरी जायचे असा तिचा मानस होता.

उंबरठ्यावर बसून ती स्वतःशीच बोलू लागली, "माझे लांडोबा आणि पांडोबा भाऊ आता मोठे झाले असतील. आता ते किती मोठे झाले असतील? कसे दिसत असतील? यावर्षी तेच मला माहेरी न्यायला येतील. कधी बरे येतील? त्यांच्यासाठी मी दूध आणि लाह्या ठेवल्या आहेत. त्या कधी येऊन खातील? आता संध्याकाळ सरत आली. एव्हाना यायला हवे होते."

हे ऐकून लांडोबा आणि पांडोबा यांना आपल्या कुविचारांचा पश्चाताप झाला. ही आपली बहीण त्यांच्यावर एवढे प्रेम करते. तिच्या हातून नकळत घडलेल्या चुकीसाठी ते तिचा जीव घ्यायला आले होते. आज जर ती आपल्या मनातील या गोष्टी उंबरठ्यावर बसून बोलली नसती, तर कदाचित त्यांनी तिला दंश करून मारूनही टाकले असते. दोन्ही नागांना आपली चूक समजली. दुसऱ्या क्षणात ते दोघे तिच्यासमोर प्रकट झाले.

आपल्या लांडोबा आणि पांडोबा या दोन्ही भावांना बघून राई गवळ्याच्या सुनेला खूप आनंद झाला. तिने दोघांनाही पाटावर बसवले. दोघांनाही पंचारतीने ओवाळले, नैवेद्य म्हणून दूध आणि लाह्या दिल्या. दोघांचे मनोभावे पूजन केले. ती पूजा स्वीकारून दोन्ही भाऊ परतीच्या वाटेला लागले. जाताना तिच्यासाठी आशीर्वाद म्हणून पाटावर नवरत्नाचा हार ठेवून गेले.

भाऊ नसलेली मुलगी ही गोष्ट ऐकून नागावर अपार श्रद्धा ठेवून त्याच्यामध्ये आपला भाऊ बघायची. या श्रद्धेपोटी ती नागपंचमीचा उपवास धरून वारुळाची पूजा करायची. ही कथा नुसती लोककथा जरी असली, तरी विशेष गोष्ट अशी की भाऊ नसलेल्या मुलीला नाग हा भावाच्या रूपात दिसतो आणि तिच्या मनात असलेली ही उणीव कुठे ना कुठे थोडीशी का होईना हलकी होत जाते. तिच्या भाऊ नसण्याची पोकळी नागपंचमीच्याच दिवशी भरून जाते.


गाैतमी चाेर्लेकर गावस