ईराणी टोळीतील दोघा चोरांना मेरशीत अटक

म्हापसा व पर्वरीत सोनसाखळ्या हिसकावण्याचा प्रयत्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th July, 05:10 pm
ईराणी टोळीतील दोघा चोरांना मेरशीत अटक

म्हापसाः गोव्यात हल्लीच्या काळात सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचा चोरीचा सुळसुळाट घातलेल्या ईराणी टोळीतील दोघा चोरांना गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे. शेळपे-म्हापसा आणि सुकूर- पर्वरी येथे सोनसाखळ्या हिसकावण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघाही दुचाकीस्वार चोरांना मेरशी येथे जुने गोवे पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली. संशयित आरोपी हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते.

या टोळीने गोव्यातील महिला तसेच वृध्द नागरिकांना आपले लक्ष्य बनवले होते. गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याबरोबरच तोतया पोलीसांच्या आधारे संशयितांनी नागरिकांची लुबाडणूक केलेली असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

 आज सकाळी ८.३० च्या सुमारास शेळपे म्हापसा येथे पहिली घटना घडली. त्यानंतर दुसरी घटना सकाळी ९.४५ च्या दरम्यान सुकूर पर्वरी येथे घडली. संशयित चोरांनी दोन्ही वृध्द महिलांना आपले लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला. म्हापशात सोनसाखळी चोरण्याचा संशयिताचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर संशयितांनी तिथून पळ काढला. सुकूर येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात संशयित यशस्वी ठरले. मात्र ही सोनसाखळी बनावट होती.

दोघांनाही अटक

या घटनेनंतर सदर महिलेने आरडाओरड केली असता जवळील एका व्यक्तीने चोरांच्या दुचाकीचा क्रमांक नोंद केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राज्यभरातील पोलिसांना सतर्क केले. संशयित चोर पणजीच्या दिशेने गेल्याचे समजताच पर्वरी पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मेरशी येथे पोहोचताच पोलीस पथकाला पाहून संशयितांनी दुचाकी टाकून पळ ठोकली. त्यातील एका संशयिताला पोलिसांनी लगेच पकडले. तर दुसर्‍याला पकडण्यासाठी जुने गोवे व पर्वरी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.

हेही वाचा