शिक्षण : गोवा विद्यापीठाला नॅकची ‘A+’ ग्रेड

विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच मिळाला हा मान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th July, 02:25 pm
शिक्षण : गोवा विद्यापीठाला नॅकची ‘A+’ ग्रेड

पणजी : गोवा विद्यापीठाने राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेच्या (NAAC) नव्या अ‍ॅक्रिडिटेशन सायकलमध्ये A+ ग्रेड मिळवत ऐतिहासिक यश मिळवले आहे. विद्यापीठाला यावेळी ३.३ असा सीजीपीए प्राप्त झाला असून, ही मान्यता २०३० पर्यंत वैध राहणार आहे. यापूर्वी विद्यापीठाला B+ रेटिंग होते.

विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जा, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या बाबतीत उल्लेखनीय प्रगती झाल्याचे यामधून अधोरेखित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाच्या या यशाचे अभिनंदन करताना म्हटले की, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच मिळालेली ही मान्यता राज्याच्या शिक्षणक्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक आहे.

याआधी २०१४ ते २०१९ या कालावधीत विद्यापीठाला A ग्रेड (सीजीपीए ३.०१  ते ३.२५) मिळाली होती. मात्र, २०२२ ते २०२७ साठी विद्यापीठाला B++ ग्रेड दिली गेली होती. यंदा मिळालेली A+ ग्रेड ही त्या तुलनेत मोठी प्रगती मानली जात आहे.

नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत ७० टक्के गुण शुद्ध संख्यात्मक निकषांवर आधारित असतात, जसे की शिक्षकांचे शैक्षणिक पात्रता, कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या, रिक्त पदांची स्थिती इत्यादी. उर्वरित ३० टक्के मूल्यांकन नॅकच्या तज्ज्ञ समितीच्या प्रत्यक्ष भेटीनंतर केले जाते.

ही ग्रेड मिळाल्याने गोवा विद्यापीठ आता देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत अग्रक्रमावर पोहोचले आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, निधी संधी, तसेच विद्यार्थ्यांच्या विनिमय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाला अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने हे यश संस्थेच्या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले असून, भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


नॅक मानांकन समितीला योग्य प्रकारे माहितीचे सादरीकरण केल्याने यश
A+ मानांकनामुळे प्लेसमेंटसह विद्यापीठाला संशोधनासाठी अधिक निधी मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या पाच वर्षातील विद्यापीठाची कामगिरी व साधनसुविधांची माहिती योग्य प्रकारे नॅक मानांकन समितीला पटवून देण्यात यश आल्यानेच A+ मानांकन मिळविण्यात विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. २०१९ साली कामगिरी व साधनसुविधांचे सादरीकरण अनेक कारणामुळे नॅक समिती समोर योग्य प्रकारे विद्यापीठाला करता आले नव्हते. मागच्या वेळची उणिव यावेळी भरून काढण्यात यश आल्यानेच A+ मानांकन मिळविणे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलसचिव सुंदर धुरी यानी व्यक्त केली.

हेही वाचा