सालेलीत बुरखाधारी चोरांनी महिलेवर चाकूहल्ला केल्याने लोक धास्तावले

अडीच लाखांचे दागिने लंपास; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
सालेलीत बुरखाधारी चोरांनी महिलेवर चाकूहल्ला केल्याने लोक धास्तावले

वाळपई : सालेली येथे बुरखाधारी दोघांनी घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला करत सोन्याचे दागिने लुटल्याने ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी यु्द्धपातळीवर तपास सुरू केला असला, तरी अद्याप आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही.
रविवारी सकाळी दोन बुरखाधारी संशयित दुचाकीवरून आले आणि त्यांनी वैशाली पेडणेकर यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. घरातील सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे सालेलीसारख्या ग्रामीण भागातही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, जिथे अनेकदा पुरुष कामावर गेल्यानंतर महिला एकट्याच घरात असतात. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या चोऱ्या वाढू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत.
पोलिसांसमोर आव्हान
- या घटनेबाबत वैशाली पेडणेकर यांचे पती साईनाथ पेडणेकर यांनी होंडा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकाचा वापर केला, परंतु अजूनही संशयितांना ताब्यात घेता आलेले नाही.
- ज्या पद्धतीने बुरखाधारी संशयितांनी हा हल्ला केला आहे, त्यावरून या प्रकरणात स्थानिकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ही घटना केवळ नागरिकांसाठीच नाही, तर पोलिसांसाठीही एक आव्हान बनली आहे. यामुळे सालेली गावाबरोबरच होंडा आणि मोर्ले परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा