गोवा मुक्तीनंतर सरकारने असे झुलते पूल म्हणजे अप्रगतीचे लक्षण मानून सिमेंट काँक्रिटच्या पुलांची उभारणी करण्याला प्राधान्य दिले आणि त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार पदपूल, पुलांची उभारणी केली.
आज मानवी जीवनात विलक्षण बदल घडून आलेले आहेत. औद्योगिक क्रांतीमुळे लाभलेल्या लोह, पोलाद आणि अॅल्युमिनियमसारख्या धातूंमुळे पक्क्या बांधकामाच्या इमारती आणि आवश्यक बांधकामांची निर्मिती करून साधन-सुविधेचा लाभ घेणे शक्य झाले आहे. पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या नद्यांमुळे जी गावे इतर गावांहून तुटायची, तेथे जाणे सोपे व्हावे म्हणून मानवी समाजाने निसर्गातल्या नानाविध घटकांचा कल्पकतेने उपयोग करून साकवांची (पूल) निर्मिती केली आणि असे साकव गावागावांना जोडण्याचे कार्य पूर्वीच्या काळी करत आले आहेत. कधी महाकाय दगडांचा वापर करून तर कधी इमारती लाकडांचा, त्याचप्रमाणे वेलींचा वापर करून निर्माण केलेले साकव या दृष्टीने महत्त्वाचे योगदान द्यायचे. रामायण महाकाव्यात लंकेत जाण्यासाठी मध्ये असलेल्या समुद्राला ओलांडण्यासाठी हनुमान आणि वानरसेनेने सेतू उभारल्याचा उल्लेख आढळतो, जो 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यातूनही आढळतो. नदी, सागर यामुळे दुरावलेल्या गावांत जाण्यासाठी जलमार्गाचा वापर प्रामुख्याने प्रारंभी होत असला, तरी साकवाद्वारे दोन तीर ओलांडण्यासाठी साकव हा महत्त्वाचा दुवा होता. आदिम काळात वावरणारा मानवी समाज निसर्गातल्या विविध घटकांचा वापर करून असे साकव तयार करत असल्याचा इतिहासात उल्लेख आहेत. ख्रिस्तपूर्व दोनशे वर्षांपूर्वी रोममधील लोकांनी तिवर नदीवर पदपूल उभारल्याचे उल्लेख आढळतात. ख्रिस्तपूर्व ६२ मध्ये पोन्ते फेब्रिस्तियो पदपूल उभारण्यात आला होता.
भारतात दऱ्याखोऱ्यांत वावरणाऱ्या आदिवासी आणि जंगलनिवासी समाजाने वृक्षवेलींचे विविध घटक अत्यंत कल्पकतेने उपयोगात आणून पदपुलांची निर्मिती शेकडो वर्षांपूर्वीपासून केली होती. मिझोराम, नागालँड, मेघालय आदी पूर्वेकडील दुर्गम गावांत जाण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे किंवा धातूच्या तारांचे पूल नसल्याने तिथल्या लोकांना नैसर्गिक घटकांचा वापर करून साकव तयार करण्याशिवाय अन्य पर्याय आजच्या काळातही उपलब्ध नसल्याने आजही त्यांच्याकडे ही परंपरा उपयोगात असलेली दृष्टीस पडते. मेघालयातल्या खासी आणि जयंती या आदिवासी समाजाने शिलॉंगच्या पठारावर जाण्यासाठी रबराच्या झाडाच्या मुळांचा वापर करून ५० मीटर लांबी आणि दीड मीटर रुंदी असलेला साकव तयार केला आहे. हा साकव आज देशविदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. वडाच्या पारंब्या, रबरासारख्या झाडांची पाळेमुळे, सुपारीचे खांब यांचा नियोजनबद्ध वापर करून साकव बनविण्याची कला देशभर प्रचलित आहे. गोव्यासारखे राज्य आज पर्यटकांचे आकर्षण बिंदू ठरले असून, पर्यटकांच्या सोयीसाठी या छोट्या राज्यात देशाच्या अन्य प्रांतांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे नदी-नाल्यांच्या जाळ्यांनी विखुरलेल्या गोव्यात एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी या पुलांचा आधार महत्त्वाचा ठरला आहे. परंतु एकेकाळी पावसात दुरावणाऱ्या गावांना जोडण्यासाठी लोकसहभागाच्या सामूहिक शक्तीद्वारे उभारला जाणारा साकव केवळ ये-जा करण्यासाठी दुवा नसायचा, तर त्याच्याशी त्यांचे भावनिक ऋणानुबंध जोडले जायचे. मान्सूनचा पाऊस सुरू झाला म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत विखुरलेल्या गावांत जाण्यासाठी साकव आधार असायचा. उन्हाळा सुरू झाला म्हणजे गावात साकव उभारण्याची तयारी सुरू व्हायची. साकवासाठी लागणारे खांब, काठ्या, वेली गोळा करून गावातले अनेक समाजातले लोक "एकमेका सहाय्य करू" या ध्येयाने साकवाची उभारणी करायचे. पोर्तुगीज सरकारने आपल्या राजवटीत महत्त्वाच्या गावांना, शहरांना जोडण्यासाठी पक्क्या पुलांची अल्प प्रमाणात उभारणी केल्याने सत्तरी, सांगे, केपे, धारबांदोडा या तालुक्यांतील लोकांना पाऊस येण्यापूर्वी साकवाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. पायी चालणाऱ्या व्यक्तींना अशा साकवांचा आधार होता. सह्याद्रीतल्या बऱ्याच गावांत मान्सूनचा पाऊस एकदा सुरू झाला की, तो धुवाँधारपणे इतका कोसळायचा की, ही गावे बेटासारखी अन्य लोकसंपर्कापासून तुटायची. त्यासाठी जेथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असायची, अशा गावांतले लोक प्रमुख गावकरी मंडळाने निश्चित केलेल्या दिवशी एकत्र येऊन साकवाच्या उभारणीचे कार्य करायचे. साकव निर्मितीचे कार्य समस्त गावाचे असल्याने, त्यात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत हा भेदाभेद कामापुरता विसरून एकत्र यायचे. गावातल्या मोठ्या नदीवर साकवाची उभारणी करणे हे काम सहजसोपे नसायचे. त्यासाठी दोन तिरांना जोडण्यासाठी इमारती लाकडाची आवश्यकता असायची. माडत, किंदळ, सागवान अशा सरळसोट वृक्षांची निवड करून तो तोडला जायचा आणि सामूहिकपणे जेथे साकवाची उभारणी केली जाणार, तेथे आणला जायचा. व्यवस्थितपणे त्याच्या फांद्यांची छाटणी करून, जे दोन खांब आडवे नदीपात्रावर घातले जाणार, त्याच्यावर दिण्या झुडपाच्या काठ्या वेलींद्वारे किंवा झाडांच्या सालीपासून काढलेल्या दोऱ्यांनी बांधल्या जायच्या. अशा साकवावरून ये-जा करताना दुतर्फा आधारासाठी बेतकाठी किंवा बांबूचा उपयोग केला जायचा. काही ठिकाणी आधारासाठी जंगलात त्याकाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पालकोण्याच्या रानटी वेलीचा वापर केला जायचा.
गोवा मुक्तीनंतर सरकारने असे झुलते पूल म्हणजे अप्रगतीचे लक्षण मानून सिमेंट काँक्रिटच्या पुलांची उभारणी करण्याला प्राधान्य दिले आणि त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार पदपूल आणि पुलांची उभारणी केली. सिमेंट काँक्रिटच्या अशा पुलांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांतून दुर्गम गणल्या गेलेल्या गावी जाणे शक्य झाले. पक्क्या पुलावरून वाहने नेता येत असल्याने आजारी रुग्णांना, गरोदर महिलांना सहजपणे ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पक्क्या पुलाच्या उभारणीमुळे मानवी जीवनातल्या बऱ्याच गैरसोयी आणि समस्यांचे निर्मूलन करणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे वृक्षाचे सरळसोट खांब दोन काठांवर भरभक्कमपणे उभ्या असलेल्या झाडांच्या आधारे आडवे करून, मेहनतीने साकवाची निर्मिती करण्याची परंपरा इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहे. परंतु सत्तरीत म्हादई नदीच्या काठावर वसलेल्या कडवळ गावात ये-जा करण्यासाठी तिथल्या कुटुंबांना साकवाचाच आधार आजही महत्त्वाचा आहे. खानापूर तालुक्यातल्या कृष्णापुराच्या कर्नाटकी गावात जाण्यासाठी आजही ३-४ ठिकाणी सामूहिकरित्या साकव घातले जातात. झाडाचे खांब, रानातल्या झुडुपांच्या काठ्या, वेली, दोरखंड, बांबू, पोफळीचे खांब यांचा वापर करून साकव उभारण्याची पारंपरिक कलाही आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. असे असले तरी, सत्तरी, सांगेच्या काही भागांत ये-जा करण्यासाठी साकवांचा वापर आजही केला जातो, याची प्रचिती येते.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५