हाताने जेवल्यामुळे न्यूयॉर्कचे महापौरपदाचे उमेदवार ट्रोल

Story: विश्वरंग |
01st July, 11:41 pm
हाताने जेवल्यामुळे न्यूयॉर्कचे महापौरपदाचे उमेदवार ट्रोल

भारतीय वंशाचे न्यूयॉर्कचे महापौर पदाचे उमेदवार जोहरान ममदानी सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत, ज्यात ते हाताने जेवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. गिल यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, "अमेरिकेतील सुसंस्कृत लोक असे जेवत नाहीत. जर तुम्ही पाश्चात्त्य पद्धती स्वीकारू शकत नसाल तर तुमच्या मागासलेल्या देशात परत जा." त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

गिल यांच्या टिप्पणीवर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने उपहासात्मकपणे विचारले की, "आपण आशियाई रेस्टॉरंटमध्ये चॉपस्टिक्सने जेवलो तरी तुम्हाला राग येतो का?" तर दुसऱ्याने अमेरिकन फास्ट फूड खाण्याच्या पद्धतींवरून त्यांना प्रत्युत्तर दिले. ममदानींनी व्हिडिओमध्ये पॅलेस्टिनी मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले होते की, "जेव्हा तुम्ही तिसऱ्या जगातील देशात वाढता, तेव्हा तुम्हाला पॅलेस्टिनी संघर्ष अधिक चांगल्या प्रकारे समजतो."

या वादाबरोबरच, काही लोकांनी ममदानींवर सांस्कृतिक दिखावा करत असल्याचा आरोपही केला आहे. एका वापरकर्त्याने ममदानींचा एक जुना फोटो शेअर केला, ज्यात ते चाकू-काट्याने जेवताना दिसत होते आणि यावरून कॅमेऱ्यासमोर हाताने जेवण्याचा त्यांचा दिखावा असल्याची टीका केली.

जोहरान ममदानी हे प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत, तर त्यांचे वडील महमूद कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. जोहरान यांचा जन्म युगांडात झाला असला तरी ते अमेरिकेत वाढले आणि त्यांना २०१८ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क टाऊनच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्रायमरी निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. ट्रम्प समर्थकांनी ममदानींवर 'कम्युनिस्ट' असल्याचा आणि 'न्यूयॉर्कसाठी धोका' असल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ममदानींनी हे आरोप फेटाळून लावले असून, ते मेहनती लोकांसाठी लढत असल्याचे म्हटले आहे.

हा वाद केवळ एका जेवणाच्या पद्धतीपुरता मर्यादित नसून, तो सांस्कृतिक ओळख, स्थलांतर आणि राजकीय दृष्टिकोन यांच्यातील संघर्षाला अधोरेखित करतो.



- गणेशप्रसाद गोगटे, गोवन वार्ता