साखळी-दत्तवाडीतील प्राचीन मूर्तींची विल्हेवाट

डिचोली पोलिसांकडून माजी मुखत्यार, महाजनाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th June, 12:30 am
साखळी-दत्तवाडीतील प्राचीन मूर्तींची विल्हेवाट

 म्हापसा : साखळी येथील सुप्रसिद्ध श्री संस्थान दत्तवाडी मंदिरातील अत्यंत प्राचीन देवी अन्नपूर्णा, भगवान गणपती व भगवान मारूती यांच्या मूर्तींची विल्हेवाट लावल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी मंदिराचे माजी मुखत्यार आणि महाजन यांना अटक केली आहे.      

अटक केलेल्यांमध्ये देवस्थानचे माजी अॅटर्नी (मुखत्यार) संशयित श्याम बालाजी बोडके (६५, रा. शेळपे-म्हापसा) व महाजन दीपेश दत्ताराम कामत (५०, रा. चिमुळवाडा, लामगाव-डिचोली) यांचा समावेश आहे.      

याप्रकरणी डिचोलीचे मामलेदार तथा देवालये प्रशासक दत्तप्रसाद तोरसकर यांनी डिचोली पोलिसांत तक्रार गुदरली आहे. हा प्रकार गेल्या २५ मे रोजी घडला आहे. या प्रकरणी देवस्थानच्या विद्यमान समितीने फिर्यादी डिचोली तालुका देवालये प्रशासकांकडे केली होती.      

संशयित आरोपींनी त्यांच्या समान हेतूने आणि अप्रामाणिकपणे मंदिरातील देवी अन्नपूर्णा, भगवान गणपती व भगवान मारूती अशा तीन पवित्र आणि प्रचंड प्राचीन असलेल्या मूर्ती चोरल्या. नंतर जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण हेतूने सदर तिन्ही मूर्तींची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावली. या मूर्ती संशयितांनी परस्पररीत्या विकल्या असाव्यात, असा अंदाज तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. तसेच या कृत्यातून संशयितांनी संस्थानचे इतर महाजनांच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे, असा दावा देखील फिर्यादींनी केलेला आहे. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल, कार जप्त

 याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिंतेच्या ३०५, २९९ व ३(५) कलमांन्वये चोरी आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून संशयितांना अटक केली. तसेच या मूर्तींची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली संशयित दीपेश कामत यांच्या मालकीची जीए ०४ ई २९२९ क्रमांकाची रेनॉल्ट डस्टर ही कारगाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.