जूनच्या अखेरच्या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर, सस्पेन्स, कॉमेडी आणि हॉररने भरलेले नवे चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘रेड २’, ‘स्क्विड गेम ३’, ‘पंचायत ४’ सारख्या वेबसीरीजचा समावेश आहे.
स्क्विड गेम सीजन २ । नेटफ्लिक्स
कोरियन थ्रिलर 'स्क्विड गेम' आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा बहुचर्चित शो २७ जून रोजी नेटफ्लिक्सवर दुपारी १२.३१ वाजता स्ट्रीम केला जाणार आहे. या सिझनचे दिग्दर्शन ह्वांग डोंग-ह्युक यांनी केले आहे.
रेड २ । नेटफ्लिक्स
अजय देवगण आणि रितेश देशमुख अभिनीत ‘रेड २’ ही थ्रिलर फिल्म चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता२७ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. हा चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
मिस्ट्री । जीओहाॅटस्टार
राम कपूर आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिकेत असलेली नवी वेबसीरीज ‘मिस्त्री’ ही २७ जूनपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. ही मालिका लोकप्रिय इंटरनॅशनल शो ‘मोंक’चा भारतीय अवतार आहे.
पंचायत सीजन ४ । प्राईम व्हिडिओ
‘पंचायत’ ही लोकप्रिया वेबसीरीज तिच्या चौथ्या सिझनसह २४ जूनपासून प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. या सिझनमध्ये फुलेरा गावात प्रधान निवडणुकीची रंगतदार लढत पाहायला मिळेल. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक आणि चंदन रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
विराटपलेम : पीसी मीना रिपोर्टिंग । झी ५
२७ जूनपासून झी ५ वर प्रदर्शित होणारी ही नवीन तेलुगु सीरीज एका रहस्यमय गावाची कथा सांगते, जिथे नवविवाहित महिलांचे विचित्र पद्धतीने मृत्यू होत आहेत. गावातील लोक यामागे जुना शाप असल्याचे मानतात. परंतु सत्याचा शोध घेण्याची जबाबदारी एका प्रामाणिक महिला पोलीस 'पीसी मीना'वर आहे.
स्मोक । अॅपल टिव्ही +
‘स्मोक’ ही एक थरारक वेबसीरीज असून ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा एका आग लावणाऱ्या गुन्हेगार जॉन लिओनार्ड ऑरच्या गुन्ह्यांवर आधारित आहे. या मालिकेत एक तपास अधिकारी आणि एक गुप्तहेर एकत्र येऊन अमेरिकेच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागात सक्रिय असलेल्या दोन सिरीयल आग लावणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतात. मात्र तपासाच्या ओघात ते दोघे एका घातक खेळात अडकतात, जो गुन्हेगारांनी रचलेला असतो.
क्लीनर । लायन्स गेट प्ले
‘क्लीनर’ ही एक हाय-वोल्टेज अॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटाची कथा एका माजी सैनिकाभोवती फिरते, जो साफसफाईचे करण्याचे काम करतो. एके दिवशी एक ऊर्जा कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात, एका उंच टॉवरमध्ये, काही कट्टरपंथी कार्यकर्ते ३०० जणांना बंदी बनवतात. हे पाहून हा माजी सैनिक त्या सर्वांची सुटका करण्याच्या मोहिमेवर निघतो. त्यानंतर जो अॅक्शन आणि थ्रिलचा खेळ सुरू होतो, तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत स्क्रीनला चिकटवून ठेवतो.