परीक्षेतील गुणांवरून कोकणीचे ज्ञान असल्याचे झाले सिद्ध
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : साहाय्यक सरकारी वकील (एपीपी) पदासाठी अर्ज भरताना चूक केेलेल्या उमेदवाराला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. गोवा लोकसेवा आयोगाने अर्ज फेटाळलेल्या उमेदवाराला अॅडमिट कार्ड देऊन परीक्षेेेला बसू देण्याचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अर्जासह दाखल केलेल्या गुणपत्रिकेचा लाभ याचिकादाला झाला.
गोवा लोकसेवा आयोगाने साहाय्यक सरकारी वकीलसाठीची १४ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या पदांसाठीची लेखी परीक्षा २९ जून रोजी होणार आहे. या पदासाठी कोकणीचे ज्ञान सक्तीचे असते, तर मराठीचे ज्ञान ऐच्छिक असते. याचिकादार आफ्रीन हरीहर हिने अर्ज भरताना कोकणीच्या ज्ञानाच्या तक्यात नोट नो म्हणून टिक मार्क केले होते. कोकणीचे ज्ञान नसल्याने तिचा अर्ज गोवा लोकसेवा आयोगाने फेटाळला होता. अर्ज केलेल्या अन्य उमेदवारांना परीक्षेविषयी माहिती आली. याचिकादाराला माहिती आली नाही म्हणून तिने आयोगाशी संपर्क साधला. कोकणीचे ज्ञान नसल्याने अर्ज फेटाळला असल्याची माहिती तिला मिळाली. कोकणीतील गुणांचा विचार करून अर्ज ग्राह्य धरण्याची विनंती तिने आयोगाला केली. आयोगाने तिची मागणी फेटाळली. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
दहावी, बारावीच्या परीक्षेत कोकणीत चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे कोकणीचे ज्ञान याचिकादाराला असल्याचे सिद्ध होते, असा दावा याचिकादाराच्या वकिलाने केला. कोकणीचे ज्ञान सक्तीचे आहे. अर्ज भरताना कोकणीचे ज्ञान नाही, असे याचिकादाराने स्पष्ट केले होते. याचिकादार अर्जात कोकणीचे ज्ञान नसल्याचे सांगतो, तेव्हा अर्ज ग्राह्य धरता येत नाही, असा दावा गोवा लोकसेवा आयोगाच्या वकिलांनी केला.
न्यायालयाचा निकाल
अर्जासोबत याचिकादाराने गुणपत्रिका सादर केली आहे. दहावी, बारावीला कोकणीत तिला चांगले गुण मिळाले आहेत. त्यावरून याचिकादाराला कोकणीचे ज्ञान असल्याचे सिद्ध होते. अर्ज भरताना याचिकादाराकडू चूक झाली असली तरी कोकणीचे ज्ञान असल्याचे गुणपत्रिकेवरून स्पष्ट होते. याचिकादाराला परीक्षेचे अॅडमिट कार्ड द्यावे, असा आदेश न्यायाधीश निवेदिता मेहता आणि भारती डांगरे यांच्या पीठाने दिला.