वाहने आडवी घालून खंडणीची मागणी; डिचोली पोलिसांकडून दोन जण ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 11:54 pm
वाहने आडवी घालून खंडणीची मागणी; डिचोली पोलिसांकडून दोन जण ताब्यात

डिचोली : साखळीहून मोपाच्या दिशेने जात असताना आधार हॉस्पिटलजवळ तीन जणांनी वाहने आडवी घालून धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना नुकतीच घडली. यावेळी तक्रारदाराने प्रसंगावधान राखून पोलिसांना तत्काळ माहिती दिल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. डिचोली पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी केरी-सत्तरी येथील मुआज शेख याने डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुआज शेख आपल्या काकांसह टोयोटा इनोव्हा कारमधून साखळीहून मोपाकडे निघाले होते. आधार हॉस्पिटलजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक एक वाहन आडवे लावण्यात आले. त्यानंतर त्या वाहनातून उतरलेल्या तीन जणांनी त्यांना धमकावत दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी सुझुकी स्विफ्ट (क्रमांक जीए-०९-ए-०६३३), सुझुकी वॅगन-आर व काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी करून मार्ग अडवला. त्या वाहनांमधून उतरलेले संशयित तक्रारदाराच्या काकांकडे गेले आणि त्यांना धमकावत १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

परंतु तक्रारदाराने ११२ वर फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा वरील आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

डिचोली पोलीस ठाण्यात कलम ६१(२), १२६(२), ३०८(५) कलम ६२ बीएनएस २०२३, व गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणी डिचोली पोलिसांनी सलमान खान (जुने गोवा), मकसूद खान (फोंडा) यांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. डिचोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा