ऋषभ पंत, ओली पोप यांची शतके : भारताकडे २६२ धावांची आघाडी
लीड्स : भारताने पहिल्या कसोटीत चांगली सुरूवात करत धावांचा डोंगर उभारला. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर भारताने लीड्स कसोटीत ४७१ धावा केल्या. मात्र इंग्लंडने भारताला चोख प्रत्युत्तर दिले. दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद २०९ धावा केल्या होत्या. ओली पोपने शतक तर बेन डकेटने अर्धशतक झळकावले.पोप हा नाबाद १०० धावांवर खेळत असून भारत २६२ धावांनी आघाडीवर आहे.
लंच ब्रेकपूर्वी भारताने ७ बाद ४५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्याच षटकात बुमराह झेलबाद झाला. यानंतर जोश टंगने पहिल्या चेंडूवर जडेजाला क्लीन बोल्ड केले. तर षटकातील अखेरच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाला क्लीन बोल्ड करत भारताला सर्वबाद केले. यासह जोश टंगने ४ विकेट्स घेत झटपट भारताचा डाव आटोपला.शनिवारी टीम इंडियाने ४१ धावांत ७ विकेट गमावल्या. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ३ बाद ३५९ धावांवरून सुरुवात करणाऱ्या ऋषभ पंतने सकाळच्या सत्रात भारताला झटपट धावा करून दिल्या आणि आपले शतकही झळकावले. परंतु लागोपाठ विकेट्स गमावल्यानंतर भारताचा डाव कोसळला.
भारतीय कर्णधार शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, तो १४७ धावा करून बाद झाला. ऋषभ पंतने १३४ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्सने ४-४
विकेट घेतल्या. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी १-१ विकेट घेतली.
शुभमन गिलने पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून शतकी खेळी करण्याचा कारनामा केला. तो पहिल्या दिवशी नाबाद १२७ धावांवर माघारी परतला. तर ऋषभ पंत ६५ धावांची खेळी करत नाबाद परतला.
पंतने मोडला धोनीचा रेकॉर्ड
ऋषभ पंत आयपीएल २०२५ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. शेवटच्या सामन्यातील शतकी खेळी वगळली, तर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करताच त्याने पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने एमएस धोनीला मागे सोडले आहे. एमएस धोनीच्या नावे ६ शतके आहेत.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर झॅक क्रॉली केवळ ४ धावा करून बुमराहचा शिकार ठरला. त्याचा झेल करुण नायरने पकडला. मात्र त्यानंतर बेन डकेट आणि ओपी पाेप यांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून १२५ धावांची भागिदारी रचली. ६२ या धावसंख्येवर डकेटचा बुमराहने त्रिफळा उडवला. त्यानंतर पोप आणि रुटने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. दाेघांनी मिळून ८० धावांची भागिदारी रचली. मात्र रुट बुमराहचाच शिकार ठरला. त्याने ५८ चेंडूत २८ धावा केल्या. दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद २०९ धावा केल्या होत्या. पोप १०० धावांवर नाबाद असून हॅरी ब्रुक ० धावसंख्येवर मैदानात आहे. भारताकडून तीनही बळी बुमराहने घेतले. इतर कोणताही गोलंदाज फलंदाजांवर प्रभाव पाडू शकला नाही.
ऋषभ पंतचा विक्रम
ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३००० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंतने ७६ व्या डावात हा कारनामा केला आहे. या डावात ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट अव्वल स्थानी आहे. त्याने हा कारनामा ६३ व्या डावात केला होता. या रेकॉर्डसह त्याने एमएस धोनीचा आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तो परदेशात फलंदाजी करताना आशियातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. एमएस धोनीने १७६१ धावा केल्या होत्या. आता ऋषभ पंत १७४६ धावांवर पोहोचला आहे. याआधी हा रेकॉर्ड एमएस धोनी, फारुख इंजिनियर आणि सय्यद किरमानी या भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांच्या नावावर होता.
गिलला दंड ठोठावला जाणार
कर्णधार शुभमन गिल मोठ्या अडचणीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याच्यावर मोठी कारवाई करू शकते, कारण गिलने आयसीसीचा एक मोठा नियम मोडला आहे. यासाठी त्याला मोठा दंडही होऊ शकतो. गिल पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना काळे पायमोजे घालून उतरला होता. पण हे आयसीसीच्या नियमाबाहेर आहे. गिलवर दंड आकारण्याचा निर्णय सामनाधिकारी घेतील. जर हेडिंग्ले कसोटी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि खेळाडूने जाणूनबुजून लेव्हल १ चा गुन्हा केल्याचे मानले, तर शुभमन गिलला त्याच्या सामन्याच्या फीच्या सुमारे १० ते २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते.
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ४७१
इंग्लंड : पहिला डाव : ३ बाद २०९