हळदोणात बसला धडक दिल्याने अल्पवयीन दुचाकीस्वार ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st June, 12:22 am
हळदोणात बसला धडक दिल्याने अल्पवयीन दुचाकीस्वार ठार

म्हापसा : हळदोणा येथे झालेल्या अपघातात मोहन रवींद्र यादव (रा. कालवी व मूळ उत्तर प्रदेश) या १६ वर्षीय अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शाळेच्या बसला दुचाकीची जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

हा अपघात गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ७.१५ वा. सुमारास हळदोणा येथील भगवती मंदिराजवळ घडला होता. दुचाकीस्वार जी.ए. ०३ एजी ५१०३ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा स्कुटरवरून कालवीच्या दिशेने जात होता. तर, हळदोणातील एका शाळेची जी.ए. ०७ एस ०१९३ क्रमांकाची बस घेऊन चालक जगन्नाथ गोवेकर हे विद्यार्थ्यांना आणायला विरुद्ध दिशेने जात होते.

घटनास्थळी भरधाव दुचाकीने बसला समोरून धडक दिली. या अपघातानंतर मोहन यादव हा रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रूग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले.

अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस उपनिरीक्षक अभिजित देसाई व हवालदार प्रितम दाभोळकर यांनी केला.

दरम्यान, मोहन हा उत्तरप्रदेशमधून कालवी- हळदोणा येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आला होता. तो चालवत असलेली दुचाकी देखील सदर नातेवाईकांचीच आहे. यामुळे पोलिसांकडून सदर दुचाकी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा