पेडणे अग्निशामक दलाकडून परिस्थितीवर नियंत्रण
पेडणे : पेडणे तुये येथील औद्योगिक वसाहतीतील एका आईस फॅक्टरीत अमोनिया वायूची गळती झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजता पेडणे अगिशमन दलाला याबाबत माहिती मिळताच अवघ्या ८ मिनिटांत त्यांनी नियोजन स्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
तुये येथे अमोनिया वायूची गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार आणि प्रशांत धारगळकर यांचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिसरातील लोकांना सावध केले. वायू गळती मोठ्या प्रमाणात चालू होती. जवानांनी पाण्याचे फवारे मारून वायू गळती थांबवली.
खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या सर्व लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित अंतरावर पाठविण्यात आले होते.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवले. ही फॅक्टरी समीर रेडकर व अरविंद तुर्ग यांच्या मालकीची आहे. या संपूर्ण मोहिमेत अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार, प्रशांत धारगळकर, प्रशांत सावळ देसाई, उमेश वरक, राजेंद्र खरात, मनोज साळगावकर, विष्णुदत्त परब, रजत नाईक, कृष्णा नाईक, मयूर नाईक, सर्वेश पार्सेकर आणि विराज किनळेकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
आईस क्यूब फॅक्टरीत साडेतीनशे लिटर अमोनिया गॅस असल्याची माहिती अधिकारी नामदेव परवार यांनी दिली. म्हापसा येथून एक अग्निशामक बंब मागवण्यात आला होता.