गौरवशाली गोवा क्रांतिदिन

आजही सारी स्मारके गोवा मुक्तीदिन आणि क्रांतिदिन वगळता उपेक्षितपणाची वेदना सोसत कशीबशी उभी आहेत. त्यांचे क्रांतिकार्य नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव आहे.


17th June, 11:37 pm

१ ८ जून हा दिवस गोवा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत शेकडो वर्षे खितपत पडलेल्या इथल्या भूमीपुत्रांत स्वातंत्र्याप्रती जागवलेला स्फुल्लींग प्रामुख्याने कारणाभूत ठरला. नागरी स्वातंत्र्याअभावी तळमळणाऱ्या गोमंतकीयांच्या रंध्रारंध्रात डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढण्यासाठी जे रणशिंग फुंकले. जर्मनीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना झालेले मित्र सासष्टीतल्या असोळण्याचे डॉ. ज्युलिआव मिनेझिस यांच्या विनंतीवरून विश्रांतीसाठी आलेल्या लोहियांनी गोमंतकीय जनतेची पोर्तुगीजांनी जी गळचेपी केली होती, नागरी स्वातंत्र्याची त्यांना जी मुभा दिली नव्हती ते सारे अनुभवल्यानंतर त्यांच्या विरोधात बुलंदपणे आवाज उठविण्यासाठी मडगाव येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. लोहियांनी सभेत भाषण करण्यापूर्वीच त्यांना पोर्तुगीजांनी अटक करून नेले असले तरी त्या मंगळवाराने गोमंतकीयांच्या मुक्ती लढ्याला दिशा देण्यात आणि त्यांच्यातली ऊर्जा जागविण्यात महत्त्वाचे योगदान केले होते आणि त्यासाठी कविवर्य बा. भ. बोरकरांनी सरकारी नोकरीचा त्याग करून गोवा मुक्ती लढ्यात स्वतःला झोकून दिले.

१८ जून १९४६ हा दिवस गुलामगिरीत शेकडो वर्षे खितपत पडलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी कारणीभूत ठरला. डॉ. लोहियांना आपले भाषण उपस्थित जनसतेसमोर करता आले नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाने इथल्या लोकमनाला जागवले. त्यांना स्वराज्याची जाणीव निर्माण करून दिली. गोव्याची भूमी भारताचा अविभाज्य घटक असताना आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी बहुतांश जनतेच्या वाट्याला स्वराज्याची मधुर फळे आलेली असताना गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगरहवेली इथल्या जनतेवर पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत खितपत पडण्याची पाळी आली. १८ जून १९४६ रोजी कॅप्टन फोर्तुनाटो मिरांडा यांच्या जमावबंदीच्या आदेशाला लोहिया आणि त्यांच्या शब्दांखातर मडगावात दाखल झालेल्या जनतेने आव्हान दिले. गोव्यातल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला चालना देताना त्यांनी गोवेकरांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देताना सांगितले होते. तुमच्या मुक्तीसाठी दिल्लीकडे पाहू नका, अथवा संयुक्त राष्ट्रसंघाकडे. तुमचे स्वातंत्र्य तुमच्याजवळ आहे. त्यांच्याच शब्दांनी गोव्यातल्या लोकमनाला चेतवले. १९२८ साली त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी गोवा राष्ट्रीय काँग्रेस स्थापना करून, पोर्तुगीजांच्या गुलामगिरीविरुद्ध इथल्या जनतेला लढण्यास प्रवृत्त केले. १९४६ साली कुन्हांना आठ वर्षांची सजा भोगण्यासाठी पोर्तुगालला पाठवले. परंतु ही शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी त्यांची मुक्तता झाली. गोव्यात येण्यास बंदी असताना ४ सप्टेंबर १९५३ रोजी ते भारतात परतले आणि गोवा अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष या नात्याने भारतीयांनी गोवा मुक्तीलढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले.

सरकारच्या दडपशाहीला न जुमानता १९५४ साली १८ जून रोजी क्रांतिदिन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार पत्रके वाटली, भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावला. गोवा राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त सत्याग्रहाचे आयोजन केले. या साऱ्या चळवळीमुळे परिस्थितीत कायापालट होऊ लागला. सत्याग्रहींनी प्रारंभी दादरा त्यानंतर नगरहवेली मुक्त केली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी गोव्यात सत्याग्रही चळवळीला गती लाभली. अँथनी डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पोळेला, मार्क फर्नांडिसच्या नेतृत्वाखाली पार्से, आल्फ्रेड आफोन्स यांच्या नेतृत्वाखाली तेरेखोलला सत्याग्रह झाले. त्यानंतर १९५५ साली म्हापसा, पेडणे, पीर्ण, कायसुव, शिवोली, पणजी आणि काणकोण येथे सत्याग्रह झाले. आझाद गोमंतक दलाने पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र लढण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने आपल्या सैनिकांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त केले. १८ फेब्रुवारी १९५५ रोजी अस्नोडा-मयते येथील बाळा राया मापारी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. 

गोवा लिबरेशन आर्मीने गोळीबार, बॉम्ब स्फोटांद्वारे पोर्तुगीजांना अद्दल घडविण्याचे ठरवून त्याप्रमाणे त्यांची बऱ्याच ठिकाणी दाणादाण उडवली. शिरगावच्या खाणीवर सशस्त्र हल्ला चढवून गोवा लिबरेशन आर्मीने आपल्या शौर्याची चुणूक मडगाव, कुंकळ्ळी, शिरगाव येथे यशस्वी झाली. गोवा विमोचन सहाय्यक समितीने २५ जून १९५५ रोजी १४७ सत्याग्रहींचा जथ्था सावंतवाडीमार्गे गोव्याला पाठवला. त्यावेळी निःशस्त्ररित्या गोव्याच्या हद्दीत शिरलेल्या सत्याग्रहींवर पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार केले. त्यात मयुरेचे अमीरचंद्र गुप्तावर पोर्तुगीजांचा कहर झाला. गोवा मुक्तीसाठी पहिला सत्याग्रही किरणपाणी येथे बळी गेला. ३ ऑगस्ट १९५५ रोजी बाबुराव केशव थोरात आणि नित्यानंद सहा पत्रादेवीमार्गे गोव्यात शिरताना मृत्युमुखी पडले. कृष्णा शेट व सखाराम शिरोडकर सारखे गोव्याचे निर्भयी सुपुत्र पोर्तुगीजांच्या कौर्याची शिकार झाले. १२७ सत्याग्रहींचा जथा घेऊन तेरेखोल येथील किल्ल्यावर तिरंगा ध्वज हाती घेऊन फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुळशीदास हिरवेंना गोळी घालून ठार केले. त्यांच्या हातातला तिरंगा हाती घेऊन शेषनाथ वाडेकर पुढे सरसावले. परंतु त्यांच्यावरही पोर्तुगीजांनी गोळीबार केला.

१४ ऑगस्ट १९५५ रोजी शेकडो सत्याग्रही पत्रादेवीमार्गे गोव्यात प्रवेश करण्यासाठी सिद्ध झाले. पंजाबमधील कर्नालसिंग बनिपाल आणि महाराष्ट्रातील मधुकर चौधरी यावेळी पोर्तुगीजांच्या कौर्याची शिकार झाले. त्यानंतर उज्जैनचे राजाभाऊ महाकाल यांना हौतात्म्य प्राप्त झाले. यावेळी सहोदरादेवी यांनी निर्भयतेने अत्याचाराचा सामना केला. गोवा मुक्तीसाठी लक्ष्मण वेलिंगकर, तुळशीदास कामत, केदार अणवेकर, सगुण मापारी, के. व्ही. पाठक, एच. यमगट्टी, अमृत व्यास, बाबुलाल सेंडिया, बाळा देसाई, बापू गवस, पुरुषोत्तम केरकर, डेरा बागू, कृष्णा परब, प्रभाकर वेर्णेकर, परशुराम आचार्य, रोहिदास मापारी, बाळा परब, केशव टेंगसे, फटबा नाईक, बाळकृष्ण भोसले, कृष्णा रायकर, सुरेश केरकर, कामिलो परैरा, विनायक सप्ते, अर्जुन पिरणकर, रामचंद्र नेवगी, काशिनाथ शिरोडकर, या साऱ्यांनी गोवा मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले. 

१८ जून १९४६ रोजी लोहियांच्या आगमनाने गोवा मुक्ती लढ्याच्या पर्वाला खऱ्यारितीने प्रारंभ झाला. त्यानंतर १९५४ ते १९६१ पर्यंत तळहाती शीर घेऊन स्वातंत्र्यसेनानी लढले. या साऱ्या क्रांतिकार्याची आणि हौतात्म्यांची भारत सरकारला दखल घेऊन शेवटी विजय ऑपरेशनच्या सैनिकी कारवाई‌द्वारे गोवा मुक्ती स्वप्न पूर्ण करावे लागले. 

आज गोवा मुक्त होऊन तर ६३ वर्षे कधीच उलटली आहे. १९८७ साली गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला. सरकारने पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारक उभारले. शहिदांच्या स्मरणार्थ स्तंभ उभारले. परंतु आजही सारी स्मारके गोवा मुक्तीदिन, क्रांतिदिन वगळता उपेक्षितपणाची वेदना सोसत कशीबशी उभी आहेत. त्यांचे क्रांतिकार्य नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गोव्याचे अस्तित्व, अस्मिता राखणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५