काँग्रेसला अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव मंजूर होणार नाही, पण सर्वांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी काँग्रेस आग्रही असू शकते. एकदा चर्चा सुरू झाली की असे अनेक प्रस्ताव चर्चेला येऊ शकतात. त्यानंतर विरोधकांच्या एकजुटीबाबत निर्णय होतील. हे सगळे सुरू होण्यासाठी विजयने केलेली सुरुवात महत्त्वाची आहे.
वि विधानसभेच्या २०२७ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. हे वर्षे सरत आले की खऱ्या अर्थाने २०२६ हे संपूर्ण वर्ष निवडणुकीचे वर्ष असेल. २०१२ पासून भाजप सलगपणे गोव्यात सत्तेत आहे. पंधरा वर्षांची सत्ता उलटवून लावण्यासाठी पुन्हा २०२७ मध्ये भाजपविरोधी शक्ती एकत्र येऊन प्रयत्न करतील, त्यासाठीच काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप यांनी तयारी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी असे काही पक्षही या स्पर्धेत असतील आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स सारखा प्रादेशिक पक्षही आपली शक्ती पुन्हा एकदा तपासणार
आहे.
निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू असताना २०२७ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधकांची मोट बांधून क्रांती घडविण्यासाठी तयारीला लागल्याचे विधान गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केले आहे. आपल्या वाढदिवसाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना व्यासपीठावर आणताना त्यांनी तिथे भाजपच्याही काही नेत्यांना भाषण करण्यास भाग पाडले. या सगळ्या राजकारणात विजयच्या प्रस्तावाला काँग्रेसने तयारी दर्शवली, तर २०२७ मध्ये क्रांतीसाठी मोठी संधी आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही. पण, त्यासाठी काही गोष्टींचा शिष्टाचार विरोधी पक्षांतील नेत्यांना मान्य करावा लागेल. त्यासाठी एकमेकांसमोर नमते घेऊन सर्वांना एकत्र घेऊन जावे लागेल. काँग्रेसचे आमदार, आपचे आमदार किंवा गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीचे आमदार एकत्रित रहायला तयार आहेत, असे सध्यातरी दिसत नाही. विधानसभा अधिवेशनाच्या काळात काहीवेळा ते एकत्र येतात. त्यात एखादा आमदार सर्वांवर भारी पडतो, असे दिसल्यानंतर चार पक्षांच्या आमदारांची तोंडे चार दिशांना होतात. जसे दिल्लीत इंडि आघाडी स्थापन केल्यानंतर त्यात फूट पडली, तसाच प्रकार गोव्यात होऊ शकतो. इंडि आघाडी तयार होतानाही फूट पडली आणि नंतर पुढे वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुकांतही त्यांच्यातील मोठा कोण, यावरून मतभेद दिसले. नितीश कुमार सारखा नेता जो इंडि आघाडीच्या बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता, तोच शेवटी एनडीएसोबत गेला. आपली संधी पाहून नेते भूमिका बदलत आले. गोव्यातही तेच होणार नाही, याची हमी कोणी
देऊ शकत नाही.
२०१७ मध्ये काँग्रेसच्या हाती असलेली सत्ता विजय सरदेसाई आणि इतरांनी मिळून भाजपच्या पदरात टाकली. त्यामुळे, आपल्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या फुटीर आमदारांसारखेच इतर जे कधीकाळी घटक पक्ष होते, त्यांनाही जवळ करताना काँग्रेस दहावेळा विचार करेल. २०१७ असो किंवा २०२२, काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांनीही पक्षाची साथ दिली नाही. सत्तेत राहणे, आपली कामे साध्य करून घेणे आणि मंत्रिपद मिळवणे हेच आजकालच्या नेत्यांचे प्रधान्यक्रम. त्यामुळे, युती तोडणे यात काहीही नवे नाही किंवा राजकारण्यांसाठी त्यात शरमेचेही
काही राहिलेले नाही. महाराष्ट्रा सारख्या राज्यात समविचारी पक्षांची युती कशाप्रकारे तुटते आणि ते एकमेकांचे कट्टर शत्रू कसे होतात, ते सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता घटक पक्ष म्हणून एकत्र येऊन निवडणुकीनंतर फुटण्याची भीती मनात ठेवण्यापेक्षा एका पक्षात राहून, अर्थात एका पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून भाजपला टक्कर देता येईल का, त्याबाबत विचार व्हायला हवा. सध्या काँग्रेसचा रोख त्याच दिशेने आहे. काँग्रेसला कोणाशी युती करण्यात रस नाही. ज्यांना यायचे आहे त्यांनी पक्षात यावे, असे काँग्रेसने सध्यातरी ठरवले आहे. राजकारणाची ही बाजू पाहता विजय सरदेसाई यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सुरू
केलेली तयारी तेव्हाच फळास येईल, जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सरदेसाई यांनी मांडलेला प्रस्ताव पुढे नेण्यासाठी विचाराची पहिली फेरी पूर्ण करतील. जे २०१७ मध्ये घडले त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी विजय सरदेसाई देत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर इतर समविचारी पक्षांनी विचार करण्यास हरकत नाही.
काँग्रेसला अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव मंजूर होणार नाही, पण सर्वांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी काँग्रेस आग्रही असू शकते. एकदा चर्चा सुरू झाली की असे अनेक प्रस्ताव चर्चेला येऊ शकतात. त्यानंतर विरोधकांच्या एकजुटीबाबत निर्णय होतील. हे सगळे सुरू होण्यासाठी विजयने केलेली सुरुवात महत्त्वाची
आहे.