उच्च न्यायालयाचा केंद्र सरकार, यूआयडीएआयला आदेश
पणजी : ड्रग्ज डिलर संशयित यानिव्ह बेनाईम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाकडे आधार कार्ड सापडले होते. आधार कार्ड कोणत्या आधारावर आणि कोणत्या अधिकृत नोंदणी संस्थेद्वारे प्राप्त झाले, याची माहिती असलेली फाईल न्यायालयासमोर सादर करा, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) यांना दिला आहे.
इस्रायली नागरिक अटाला हा ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, एएनसीच्या पथकाने ४ एप्रिलच्या मध्यरात्री ११.२५ ते ५ एप्रिलच्या पहाटे ३.३० च्या दरम्यान शिवोलीतील अटालाच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून ७.५० लाखांचे ५० ग्रॅम कोकेन व १.२० लाखांचा १२० ग्रॅम चरस असा एकूण ८.७० लाखांचा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर यांनी अटालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.
याच दरम्यान अटालाची एएनसीने अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे आधार कार्ड सापडले होते. तसेच तो बेकायदेशीर वास्तव करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार, एएनसीच्या तक्रारीवरून हणजूण पोलिसांनी अटाला तसेच तो राहत असलेल्या घर मालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.
दरम्यान, हणजूण पोलिसांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) कडे संपर्क साधून आधार कार्ड संबंधात माहिती मागवली होती. ही माहिती देण्यास यूआयडीएआयने नकार दिला आहे. त्यानंतर हणजूण पोलिसांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून माहिती सादर केली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, आधार कार्ड कोणत्या आधारावर आणि कोणत्या अधिकृत नोंदणी संस्थेद्वारे प्राप्त झाले, त्याची माहिती असलेली फाईल १९ जून रोजी सादर करा, असा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) यांना दिला आहे. याशिवाय संबंधित फाईलची एक प्रत न्यायालयात बंद लिफाफात देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.
अटालाकडून ८.७० लाखांचा ड्रग्ज केला होता जप्त
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) ४ एप्रिलच्या मध्यरात्री शिवोलीतील अटालाच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून ७.५० लाखांचे ५० ग्रॅम कोकेन व १.२० लाखांचा १२० ग्रॅम चरस असा एकूण ८.७० लाखांचा अमली पदार्थ जप्त केला होता.