मध्यपूर्व आशिया : अभेद्य 'आयर्न डोमला' तडे..इस्रायलमध्ये हाहाकार!

इराणने इस्रायलवर डागली तब्बल १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th June, 11:07 am
मध्यपूर्व आशिया : अभेद्य 'आयर्न डोमला' तडे..इस्रायलमध्ये हाहाकार!

तेल अवीव : इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार )  उत्तररात्री मोठा प्रतिहल्ला चढवत तब्बल १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलकडे डागली. यामुळे तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये स्फोट झाले असून, जेरूसलेमच्या आकाशात रात्रभर सायरन आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचे आवाज घुमत होते.



इराणने यावेळी इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड कॉर्प्सच्या माध्यमातून हल्ल्याची जबाबदारी घेतली. इराणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवमध्ये एका ५० मजली इमारतीवर क्षेपणास्त्र आपटल्यामुळे जबरदस्त स्फोट झाला आणि धुराचे प्रचंड लोट आकाशात उडाले.




तेल अवीवमध्ये सर्वाधिक हानी

या हल्ल्यांमध्ये तेल अवीवमधील रमत गन भागात किमान ९ इमारती नष्ट झाल्या असून, शेकडो इमारतींना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचले आहे. जाफा आणि डॅन तेल अवीवसह महानगर परिसरातील इतर भागांतही आग लागल्याच्या घटना घडल्या. रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू असून, इचिलोव्ह रुग्णालयात सात जणांवर उपचार झाले आहेत. इस्रायलने आपल्या 'आयर्न डोम' हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने अनेक क्षेपणास्त्रांचा प्रतिकार केला असला, तरी काही क्षेपणास्त्रे थेट शहरांमध्ये आपटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. जेरूशलेम, हाइफा, बीरशेबा, गॅलिलीचा उत्तरेचा भाग आणि इतर ठिकाणीही क्षेपणास्त्र हल्ल्यांची माहिती आहे.




सुरक्षा कारणास्तव माहिती प्रसारणावर बंदी

इस्रायल सरकारने सध्या अधिकृत मृतांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. तसेच, हल्ल्यांनंतरच्या परिसरातील छायाचित्रे आणि व्हिडीओ सार्वजनिक न करण्याचे आदेश दिले आहेत. शत्रू देश या माहितीचा गैरफायदा घेऊ शकतो, असा सरकारचा दावा आहे.



इराणमधील हल्ल्यात ७८ मृत, ३५० जखमी

या संघर्षाची सुरुवात इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी झाली होती, ज्यात इराणमधील ७८ जण ठार आणि ३५० हून अधिक जखमी झाले होते. इराणने हा हल्ला युद्ध छेडण्यासारखा मानून, केवळ २४ तासांत मोठा प्रतिहल्ला केला. येत्या काळात मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता असून, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

हेही वाचा