चुका करणे समाजाची परंपरा आहे आणि नावे ठेवणे ही आजची प्रथा आहे. सर्वांना स्वातंत्र्य मिळालेले आहे, मग दुसऱ्यांवर बोट दाखविण्याचा हक्क तुमचा कसा आहे?
आज माणूस कितीही प्रगती करत उंच शिखरे गाठत असला तरी मनाने तो स्वार्थी, इर्षा बाळगणारा आणि दुसऱ्याला कमी लेखणारा प्राणी आहे असे म्हणणे आज चुकीचे ठरणार नाही. कारण जरी माणूस आज प्रगती करत विजय प्राप्त करत असला तरीही माणुसकीच्या मार्गावर त्याचा पराजयच होतो.
माणसे स्वतः चूक करतात, स्वतःकडे सर्व गोष्टी असून देखील दुसऱ्याला मदतीचा हात द्यायला मागे सरकतात. अशा माणसांसाठी आज 'चूक करणे' ही एक परंपरा बनलेली आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे हा अशा लोकांचा स्वभाव असतो. स्वतःकडे सर्व गोष्टी आहेत याचा त्यांना गर्व असतो? की दुसऱ्यांना कमी लेखून त्यांच्या पदरी श्रीमंतीचा वर्षाव होतो? हे मात्र कळत नाही.
स्वतः सर्व गोष्टी करता येतात, म्हणून दुसऱ्यांना कमी लेखणे आणि दुसऱ्यांनी शिखरे गाठल्यावर त्यांना नावे ठेवणे अशा विचारांची व स्वभावाची अनेक माणसे आज जगात भेटतात. काही माणसे स्वतः जी कार्ये करतात ती कार्ये दुसऱ्यांनी केल्यावर दुःखी होतात, तर काही माणसे स्वतःकडे जी गोष्ट होत नाही ती दुसऱ्या व्यक्तीने करून दाखविल्यावर नावे ठेवतात. आज लोकांना फक्त दुसऱ्यांची खोड काढणे हेच येत असते, अशी माणसे फक्त दुसऱ्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. अशा वृत्तीची माणसे स्वतः प्रगती करतात मात्र तीच प्रगती दुसऱ्याने केली की मनातून जळतात. आज या धावपळीच्या युगात अशी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात ज्यांना फक्त दुसऱ्यांना 'नावे ठेवण्यास' व दुसऱ्यांना 'कमी लेखण्यास' आनंद होत असतो.
दुसऱ्याने केलेल्या प्रगतीसाठी, तसेच त्याच्या वर्तनावरून त्याला नावे ठेवणे हा समाजाचा एक दृष्टिकोन बनलेला आहे. आज याच विचारातून मनुष्य जीवन जगतो. प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातील माणसांनी केलेली प्रगती मोलाची वाटते. त्या प्रगतीचा आनंद सर्वांनी लुटावा असे त्यांना वाटते. मात्र दुसऱ्याने केलेल्या प्रगतीतून मनुष्याला दुःख होते आणि समाजात प्रगतीचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीला नावे ठेवली जातात.
आजचे युग हे 'चूका करणे' आणि 'नावे ठेवणे' यावर चालते. चुका करणे ही तर आजच्या समाजाची परंपराच बनलेली आहे. कारण प्रत्येकाने केलेल्या चुकांवर आज पांघरूण घातले जाते. मग तो श्रीमंत माणूस का असेना, तो देखील स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालून समाजात आपले नाव कमावतो. तर दुसरीकडे 'नावे ठेवणे' ही प्रथा आज खूप गाजत आहे. दुसऱ्याने केलेल्या कार्यावर आज जग टीका करत आहे. दुसऱ्याने जरी काहीही वेगळी गोष्ट केली असेल तर समाज त्या व्यक्तीला नावे ठेवतो. स्वतःच्या चुका, स्वतः केलेली चुकीची कार्ये न पाहता दुसऱ्या व्यक्तीवर बोट दाखविले जाते. माणूस आज स्वतः पुरता विचार करतो. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या प्रगतीला तो नावे ठेवतो. दुसऱ्या व्यक्तीबाबत घृणा व्यक्त करतो.
अशा सगळ्या अर्थहीन विचारांतून आज जग चालत आहे. जे विचार नातीगोती तुडवतात आणि मनुष्याच्या जीवनावर घातक परिणाम करतात. त्यामुळे आज प्रत्येक व्यक्तीने हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे की, स्वतःच्या प्रगतीचा पुरस्कार जसा तुम्ही करता, तसाच दुसऱ्याच्या प्रगतीचा देखील पुरस्कार करा, कारण तुम्ही केलेल्या दुसऱ्याच्या कौतुकातूनच जगात माणुसकीचे मूल्य सकारात्मकतेने फुलू शकते. त्यामुळे दुसऱ्यांना समजून घ्या व स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या प्रगतीचा पुरस्कार करा!
- पूजा भिवा परब
पालये, पेडणे