आपली जीवनशैली दिवसेंदिवस बदलत चालली आहे. याला कारणीभूत कोण? कोणते बदल झाले? चांगले बदल की वाईट बदल? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे कोणाकडेच नाहीत. पण या बदलत्या युगात आपण माणुसकी कुठेतरी हरवत चाललो आहोत, हे मात्र नक्की.
लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच बदलत चालले आहेत. बदल हवाच आहे, नाहीतर आपण कुठेतरी मागे राहण्याची भीती आपल्याला सतावेल. माणूस म्हणून जगत असताना, माणसांसारखं वागणं मात्र आपण विसरून गेलो आहोत. आजकाल इतरांच्या जीवनात काय घडतंय ते बघायला वेळ आहे, पण स्वतः आपण कसे आहोत हे कोणीच बघत नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. सगळीकडे गारवा पसरलेला आहे. या दिवसात आपल्या सोबतीला असते ती म्हणजे छत्री. पण गंमत अशी की, पाऊस पडला की काही जणांना भिजत घरी जाणं परवडतं, पण ते आपली छत्री बॅगमधून बाहेर काढत नाहीत. छत्री सोबत आहे ही भावनाच त्यांच्या मनाला गारवा देते, पण ती वापरणं मात्र विसरून जातात. विद्यालयात येताना दररोज आपला डबा, पाण्याची बाटली घेऊन जाणं ही पूर्वीची गरज असायची. पण आता घरचा डबा न्यायला काहींना आवडत नाही. मग कुठेतरी बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊन पोट बिघडलं तरी चालेल, अशी मानसिकता झाली आहे. जी मुलं शाळेत येताना आनंदाने गप्पागोष्टी करायची, ती आता मान खाली घालून आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. आजूबाजूला काय चाललेलं आहे हे त्यांना माहीत पण नसतं. एकमेकांविषयीचा संवाद आता कुठेतरी हरवलेला आपल्याला पाहायला मिळतो. संवाद नसल्यामुळे मुलं एकमेकांचे विचार ऐकत नाहीत, कोण कसा आहे, त्याचा स्वभाव हे काही कळत नाही. बोलून ओळख होणे आणि नुसती मोबाईलवर एका मेसेजने ओळखणे यात खूप फरक आहे.
पूर्वी एखादा माणूस पाय घसरून पडला तर जवळची माणसं धावून यायची. "तुला लागलं नाही ना? तू कसा आहेस?" हे प्रश्न ऐकायला मिळायचे. पण आता मात्र एखादी व्यक्ती जमिनीवर पडली तर पहिला व्हिडिओ कोण काढणार आणि तो व्हायरल कोण करणार, याची काहींची तयारी असते. मी असं म्हणत नाही की हे सगळेच जण असे आहेत, पण बरेच जण मात्र असे आहेत.
बऱ्याच घरांचं वातावरण आता बदलत चाललं आहे. घरातली माणसंही एकमेकांशी बोलणं टाळतात. त्यांना बोलण्याऐवजी मोबाईलवर मेसेज पाठवणं फार सोयीचं वाटतं. एका घरात राहूनसुद्धा वेगळेपणाची भावना दिसून येते. एकत्र जेवण करण्याची पद्धतही हळूहळू बदलू लागली आहे. प्रत्येक जण आपल्या खोलीत जेवणं पसंत करतात. घर हॉटेलसारखं होत चाललं आहे. पूर्वी एकत्र जेवताना वेगवेगळ्या गोष्टींवर, विषयांवर चर्चा व्हायच्या. काही प्रश्न असले तर त्यांची उत्तरे थोरांकडून मिळायची. मन हलकं व्हायचं आणि आपल्या माणसांच्या मनात काय चाललेलं आहे हे पण कळायचं. पण आता त्यातही दुरावा जाणवतो. फक्त 'मी' चा विचार असतो. सामाजिक भानाच्या जाणिवेची कमतरता जाणवते. आपल्या गावातील सण, जत्रा एकत्र होऊन साजरे व्हायचे. आपल्या गावातील परंपरा जपणे आणि टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे हे समजणे आवश्यक आहे. काळानुसार बदला, नवीन गोष्टी शिका, इतरांना शिकवा. आपल्यातली मानवता जिवंत ठेवा, ती हरवू नका.