‘विठ्ठल विठ्ठल जय हरी’च्या घोषात आपण तर त्या वारकर्यांच्या वारीत सामील झालो नाही ना? असा क्षणभर भास होऊन जातो. पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठलाच्या प्रती असलेला भक्ती आणि श्रद्धेचा प्रवास.
आपले जीवन हे क्षणभंगुर आहे आणि या जगात शाश्वत फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे विठ्ठल भक्ती! विठ्ठल भक्तीच्या प्रेमात एकदा पडल्यावर विठ्ठलाप्रती असणारी ही भक्तीच आपले अवघे विश्व व्यापून राहते. अथांगाशी संग करताना मनी हा विठ्ठल हा भाव विसावतो आणि आपले मन हे विठ्ठलाच्या भक्तीत दंग होते. तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पंढरीची वाट चालताना आपण विठ्ठलमय होऊन जातो आणि मग नयनी विठ्ठल, मनी विठ्ठल, ध्यानी विठ्ठल, मुखी विठ्ठल नाम घेताना विठ्ठल विठ्ठल जय हरीचा जयघोष सुरू होतो.
‘चंद्रभागेच्या तीरी... उभा मंदिरी...
तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी !...’
दत्ता पाटील यांनी लिहिलेले हे भक्तीगीत प्रल्हाद शिंदे यांच्या दमदार आवाजात डोळे मिटून ऐकताना आपल्याला साक्षात चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरातील देवळात कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठूराया दिसल्याशिवाय रहात नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरीच्या घोषात आपण तर त्या वारकर्यांच्या वारीत सामील झालो नाही ना? असा क्षणभर भास होऊन जातो. पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठलाच्या प्रती असलेला भक्ती आणि श्रद्धेचा प्रवास.
विठ्ठल म्हणजे भक्तांच्या मनातील परमेश्वर, विठ्ठल म्हणजे भक्तांचा आधारस्तंभ, विठ्ठल म्हणजे श्रद्धेचे प्रतीक, विठ्ठल म्हणजे भक्तांच्या अंतरंगात वसणारा देव, विठ्ठलाचे दर्शन म्हणजे मनाचं समाधान, विठ्ठल म्हणजेच भक्ती, विठ्ठल म्हणजेच भक्तीच्या प्रेमाचे स्वरूप, विठ्ठल म्हणजे आईचे प्रेम, विठ्ठल म्हणजे बापाची माया, विठ्ठल म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि भक्तीचे प्रतीक म्हणजेच विठ्ठल एकूण काय तर अवघे विश्व म्हणजेच विठ्ठल आणि या विठ्ठलाच्या भक्तीत विठ्ठल नाव घेताना अवघा परिसर दुमदुमून जातो.
“ दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी !...
विठ्ठल विठ्ठल जय हरी !...”
विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाताना त्याच्या दर्शनाची आस अशी लागून राहते की आपल्याला प्रत्येक गोष्टीत विठ्ठलाचे रूप दिसत राहते.
“ जगी प्रकटला तो जगजेठी, आला पुंडलिका भेटी
पाहुनी सेवा खरी, थांबला हरी, तो पहा विटेवरी !
विठ्ठल विठ्ठल जय हरी !...”
एका आख्यायिकेनुसार पुंडलिक हा विठ्ठलाचा परम भक्त होता. पंढरपुरात असताना स्वत:च्या आई वडिलांची सेवा करत असताना अचानक तिथे विठ्ठल आला. परंतु पुंडलिकाने आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने प्रत्यक्ष विठ्ठल आपल्या भेटीस आला तरी आई वडिलांच्या सेवेत खंड पडू दिला नाही आणि विठ्ठलाला उभे राहण्यासाठी जवळच असलेली एक वीट दिली आणि उभे राहण्यास सांगितले. पुंडलिकाची आपल्या आई बाबांप्रती असलेली ही श्रद्धा पाहून विठ्ठलही विस्मयचकीत झाला. आणि तेव्हापासून पंढरपूरच्या देवळात मूर्तीरूपाने विठ्ठल त्या विटेवर कमरेवर हात ठेवून पुंडलिकाची भेट घेण्यासाठी अजूनही तसाच उभा आहे. अशी मान्यता आहे.
“ नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला,
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी !
संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन बहिणाबाई
रखुमाई मंदिरी, एकली परि , तो पहा विटेवरी !...
विठ्ठल विठ्ठल जय हरी !...”
संत नामदेव, संत तुकाराम आदी संत पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्यासोबत वारकरी घेऊन निघत असत. आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ वाजवत भजन म्हणत, हाती दिंड्या, पताका घेऊन ते पंढरपूरात येत असत.
आजही या दिंडीची परंपरा कायम आहे. आजही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नावाच्या पालख्या अनेक वारकरी, भक्तजन घेऊन पंढरपुरात येतात. सर्वात आधी संत तुकाराम यांची पालखी पुण्यातील देहु गावातून निघते. त्याच पाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी येथून निघते आणि या दोन्ही पालख्यांची भेट शिवाजीनगर पुणे येथे होते. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे येथील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा देवस्थान भवानी पेठेतच असतो. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या दिंडीचा मार्ग हा आळंदी, पुणे, सासवड, जेजूरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपोते, माळशिरस, वेळापूर, भांडी शेगाव, वाखरी, पंढरपूर असा आहे तर तुकाराम महाराजांची पालखी ही सोलापूर मार्गे पंढरपुरात येते. या मार्गात असलेला दिवेघाट हा ४ कि.मी. चा घाट अत्यंत खडतर असा आहे. या दिवेघाट मधील दिंडीच्या मार्गक्रमणात ज्यांना पंढरपूरपर्यंत जाणे शक्य नसते, असे शेकडो वारकरी या दिवेघाटातील दिंडीत चालत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत “ ज्ञानबा तुकाराम “ च्या गजरात चालत आपली साथ देतात. संत जनाबाई, संत सखू, संत बहिणाबाई यांच्या ओव्यांत विठ्ठलाचा भाव असला, तरी विठ्ठलाची रखुमाबाई मात्र आपल्या मंदिरात आपल्या कंबरेवर हात ठेवून विठ्ठलाची वाट पाहत एकटीच उभी आहे...
- कविता आमोणकर