सोळावं वरीस धोक्याचं गं बाई...!

अशावेळी, त्यांना फक्त हवी असते, ती एक “सपोर्टिव्ह” नजर, शांत ऐकणं आणि एक समजूतदार साथ, जी तुम्हीच त्यांचे आई-बाबा म्हणून त्यांना देणे गरजेचे होय... किशोरवयीन प्रेमाच्या गाठी-गुंत्यांचा हळुवार वेध घेणारा लेख.

Story: मनी मानसी |
13th June, 09:31 pm
सोळावं वरीस धोक्याचं गं बाई...!

“मॅडम, तुम्ही म्हणताय समजून घ्या... पण समजून घ्यायला हे कुठे हळदी कुंकू करतायत होय? अहो, काल आमच्या लेकीने एक मुलाला सेल्फी पाठवलाय म्हणे. त्याच्या ‘स्टोरी’ वर त्याला लाल हृदयाचा ईमोजी टाकलाय म्हणे. ही कार्टी चौदाव्या वर्षी प्रेमात वगैरे पडली की काय हो?”

पौगंडावस्थेतील मुलांच्या पालकांची अशी चर्चासत्रं आता नेहमीची झाली आहेत. हल्लीची मुलं शाळेत प्रेम करतात, ‘इंस्टा’वर ‘रिल’ बघताना एकमेकांना आवडतात आणि अगदी वॉट्स...पवर नावा पुढे दिलाचा ईमोजी येईपर्यंत त्यांचा हा ‘दिल का दर्द’ सुद्धा बळावत जातो. 

खरंतर, हे काही नवीन नाही. प्रेम, आकर्षण, मोह आणि त्याची गुंतवणूक ही प्रत्येक पिढीतली अपरिहार्य वाटचाल आहे. मात्र, आजच्या काळात याचं वेग आणि माध्यम बदललंय. आजच्या मुलांचं जग हे एकाचवेळी नेटफ्लिक्सवरचं आणि टिकटाॅकवरचं आहे. आजचा ‘आपला क्रश’ म्हणजे व्हर्च्युअल स्नेपचॅटच्या स्ट्रीक्सवर झळकणारा असतो. “माझा बॉयफ्रेंड मला स्ट्रीक्स देत नाही, म्हणजे तो सिरीयस नाही...” असं एका सोळा वर्षाच्या मुलीचं विधान मी ऐकलं आणि मला अगदी दिडमुढ व्हायला झाले!

ह्यात भर म्हणून, इंस्टा’वरचं “कौन है ये जिसने मुड़ के मुझे देखा?” आणि ओटीटीच्या किशोरवयीन लव्ह स्टोरीज हे दोन्ही पौगंडावस्थेतील मनांना फसवणाऱ्या मृगजळासारखे भासतात. त्यातल्या त्यात कोरियन ड्रामे पाहणाऱ्या मुलींच्या मनात oppa नावाचा एक सच्चा हिरो असतो जो आयुष्यात अजून भेटायचाच बाकी असतो. अहो, मोबाईलवर दोन वेळा स्क्रोल केलं तरी ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलतंय, आता बोला! 

आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यात बिचाऱ्या पालकांची अवस्था फार बिकट होते. 

अगं पण मानसी, हे काय वयं आहेत का ह्यांचं हे सगळं करायचं? कितीही म्हटलं तरी अजिबात ऐकत नाहीत बघ. आम्ही तर अगदी अमरीश पुरीच असतो हो ह्यांच्यासाठी! करावं काय नक्की?

आज, शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचं स्थान राहिलं नाही. उलट, आजच्या काळातली शाळा ही “पहिलं प्रेम”, “माझी बेस्ट फ्रेंड पण त्यालाच आवडते” अशा भावनांनी सुध्दा भरलेली असते. अहो, काही वेळा शिक्षकांपेक्षा कॉम्प्युटर लॅबच्या खालच्या बाकड्यांमध्ये जास्त गूढ गुपितं लपलेली असतात बरं! 

त्यात पौगंडावस्थेतील वय हे त्यांच्या कोवळ्या शरीरातले हार्मोन्सचे डिस्को नृत्य आणि मनातल्या कुतूहलाचे अवघड काँबिनेशनच्या अशक्य प्रश्नांनी भरलेलं! इतकं की, “ती मला का पहाते?” ह्या प्रश्नावर मुलगा रात्री तीनपर्यंत जागा असतो... आणि सकाळी परीक्षा विसरतो! 

परंतु, एक पालक म्हणून तुम्ही ही ‘प्रेम परीक्षा’ कशी घ्यावी?

पहिला सुरुवात तर तीच, आपली भीती! 

“माझं मूल भरकटलंय का?” 

“मुलगी सेल्फी पाठवते म्हणजे पुढचं काय?”

खरंतर, ही लक्षणं तुमचं मूल ‘बिगडल्याची’ नाहीत. उलट, ह्यावरून हे लक्षात येतं की तुमचं मूल ह्या वयात एका भावनिक प्रयोगशाळेत आहे. आणि तुम्हीच त्याचे पहिले निरीक्षक आहात. 

तर, कळायचं कसं की आपलं मूल अशा अनुभवांतून जातंय? 

मुलाचं/मुलीचं फोनवर खूप वेळ घालवणं व फोनवरील गोष्टी लपवून ठेवणं. पासवर्ड इ. 

कोणाशी तरी गुपचूप खुसपुसत केलेल्या गप्पा.

कधी एकदम ‘स्माईली’ मूड, तर कधी एकदम अनाकलनीय चिडचिड. 

रात्री अपरात्री, फोनवर केलेली जागरणं.

कुठेतरी हरवल्यागत सतत वावरणं, एकटेच नटणं, हसणं इ. 

अभ्यासाकडे भयंकर दुर्लक्ष, मार्क कमी. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं, ‘ऐ आई, प्लीज मला स्पेस दे हं.’

अय्या! अगं आमच्याकडे अगदी हेच चालू आहे! आता गं काय करायचं?

घाबरू नका. कारण, आता इथे ‘दोन चमचे चविष्ट शहाणपण वरणात घालून खाल्ल्याने’ काही हा प्रश्न सुटणारा नव्हे. त्यामुळे आजचे माॅर्डन पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांचे डायरेक्टर नव्हे, तर गाइड होणे गरजेचे आहे. अलगद हळूवार पद्धतीने त्यांच्या मनाचा कौल घ्या. कुठे पाणी मुरतंय ते कळायला फार वेळ लागणार नाहीच पण ते कुठे कसं मुरतंय हे कळल्यावर त्याचा निचरा कसा कराल व मुलांना कसे मार्गदर्शन कराल ह्यासाठी काही स्मार्ट गोष्टी:

सवाल विचारायचा, आरोप नाही : “काय झालं रे, सगळं ठीक आहे ना?” > “हा कोण मुलगा/मुलगी? तू त्याला/तिला का रिप्लाय दिलास?”

त्यांची मतं ऐका : त्यातच त्यांच्या भावना दडलेल्या असतात.

ओटीटी, इंस्टाग्राम यावर चर्चा करा : “ती सीरिज तू पाहिलीस का? त्या मुलांमुलींचं रिलेशन तुला खरं वाटलं का?” या चर्चेतून तुम्ही त्यांची ह्या विषयावरील मतं, दृष्टिकोन व अनुभव हे नकळतपणे समजून घेऊ शकता. 

स्वतःचं किशोरवय शेअर करा : तुमच्या किशोरवयातल्या जुन्या गमतीजमती जर तुम्ही सांगितल्या, तर कदाचित मुलं देखील मनमुरादपणे आपली मनं तुमच्यापाशी मोकळी करू शकतील. 

शेवटी एक सांगु का? आजच्या मुलांची नजर भलेही सतत मोबाईलच्या स्क्रीनवर असो, पण त्यांचं मन अजूनही तेच जुनं प्रेम, आपुलकी, आणि समजून घेण्याच्या शोधात आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या पौगंडावस्थेतील फर्स्ट क्रश पेक्षा त्यांचं फर्स्ट कन्फ्यूजनच मोठं असतं.

अशावेळी, त्यांना फक्त हवी असते, ती एक “सपोर्टिव्ह” नजर, शांत ऐकणं आणि एक समजूतदार साथ, जी तुम्हीच त्यांचे आई-बाबा म्हणून त्यांना देणे गरजेचे होय...


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४