गर्भावस्थेतील मधुमेहाचा बाळावर होणारा परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या आणि वेळेवर व्यवस्थापन केल्यास धोके कसे कमी करता येऊ शकतात याविषयी सविस्तरपणे माहिती देणारा लेख.
गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे रक्तातील उच्च साखर (ग्लुकोज), जी गर्भधारणेदरम्यान विकसित होते आणि सामान्यपणे बाळंतपणानंतर नियंत्रणात येते. हे गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत अधिक सामान्य असते. जेव्हा आपले शरीर गरोदरपणाच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन (रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारे हार्मोन) तयार करू शकत नाही तेव्हा असे होते. यामुळे गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणानंतर गरोदर महिलेला तसेच बाळाला समस्या निर्माण होऊ शकतात. पण जर ही स्थिती लवकर आढळून आल्यास व योग्य व्यवस्थापन झाल्यास याचे धोके कमी करणे शक्य असते.
गर्भावस्थेतील मधुमेहाचे बाळावर होणारे संभाव्य परिणाम:
बाळाचे वजन जास्त असणे (मॅक्रोसोमिया):
आईच्या रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज बाळाकडे प्लेसेंटाद्वारे पोहोचते.
बाळाची शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढते, ज्यामुळे साखर चरबीत रूपांतरित होते. ज्यामुळे बाळाची वाढ जास्त होऊ शकते.
बाळाच्या जन्मादरम्यान वजन ४ किलोपेक्षा जास्त होण्याची शक्यता असते.
मोठे बाळ जन्मताना प्रसूतीदरम्यान अडचणी निर्माण करू शकते.
प्रसवादरम्यान अडचणी:
खांदा अडकणे (डिस्टोसिया) सारख्या अडचणी होऊ शकतात.
सिझेरियन सेक्शनची शक्यता वाढते.
वेळेआधी प्रसूती किंवा स्टीलबर्थचा धोकाः
जास्त साखरेमुळे अम्नियोटिक फ्लूइड वाढू शकते, ज्यामुळे गर्भाशयावर ताण येतो.
यामुळे गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी प्रसव होण्याची शक्यता वाढते व गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
अति लवकर झालेल्या बाळांना श्वसन, तापमान नियंत्रण व प्रतिकारशक्तीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
नवजात मधुमेह किंवा हायपोग्लायसेमियाः
गर्भात असताना बाळाची पॅन्क्रियास जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करत असते.
जन्मानंतर आईकडून साखर मिळणे थांबते, पण इन्सुलिन पातळी उंचच राहते.
त्यामुळे रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते. यामुळे पुढील बाबी घडू शकतात.
झटके (फिट्स)
सुस्ती, दूध पिण्यात अडचण
बाळाची चेतासंस्थेवर परिणाम होऊ शकतो
श्वासोच्छवासाच्या अडचणी (रेस्पीरेटरी डिस्ट्रेस)
बाळाची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित न झाल्यास श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
कावीळ (जॉन्डिस):
जन्मानंतर बाळाच्या यकृताची कार्यक्षमता कमी असल्यास बिलीरुबिन वाढतो व कावीळ होण्याची शक्यता वाढते.
अशा बाळांमध्ये कावीळ जास्त वेळ टिकतो आणि त्यासाठी फोटोथेरपीची गरज लागू शकते.
टाइप २ मधुमेहाचा धोका:
अशा बाळांमध्ये पुढील आयुष्यात स्थूलता आणि टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या महिलांकडून जन्मलेले बाळ बहुतांश वेळा सामान्य बाळांप्रमाणेच निरोगी असू शकते, पण या बाळांमध्ये काही दीर्घकालीन आरोग्य धोके जास्त असू शकतात. यामुळे पुढील वाढीदरम्यानही काही गोष्टींवर विशेष लक्ष देत राहणे आवश्यक असते.
नियमित आरोग्य तपासण्या:
बाळाच्या वयात-वाढीत सातत्य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. काही बाळांमध्ये वाढ खूप झपाट्याने होऊ शकते.
आहार व पोषणावर लक्ष:
आईच्या दूधात नैसर्गिक साखर संतुलित असते, त्यामुळे स्तनपान सर्वाधिक फायदेशीर आहे. पुढे जाऊन बाळाचे वजन जास्त वाढू नये यासाठी साखरयुक्त पदार्थ टाळावेत. बाळ ६ महिने झाल्यानंतर पूरक आहार योग्य प्रकारे आणि टप्प्याटप्प्याने सुरू करावा.
लठ्ठपणाची लक्षणे आणि प्रतिबंध:
अशा बाळांमध्ये पुढे जाऊन लठ्ठपणा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बालवयापासून साखरयुक्त पेये, प्रोसेस्ड फूड टाळावे. बाहेर खेळणे, शारीरिक हालचाल यांना प्रोत्साहन द्यावे. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवावा.
इन्सुलिन रेसिस्टन्स व टाईप २ मधुमेह यावर लक्ष:
किशोरावस्थेत या मुलांमध्ये टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दर १-२ वर्षांनी रक्तातील साखरेची तपासणी करून ठेवावी. कुटुंबात टाईप २ मधुमेहाचा इतिहास असल्यास विशेष लक्ष द्यावे.
शैक्षणिक व बौद्धिक विकासः
गर्भावस्थेतील मधुमेहामुळे बाळाच्या न्यूरो डेव्हलपमेंटवर परिणाम होऊ शकतो. म्हणून बाळाच्या बोलण्यात, हालचालीत किंवा शिक्षणात काही अडचण जाणवली, तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
लसीकरण वेळेवर पूर्ण करा:
बाळाची प्रतिकारशक्ती व सिस्टिम सक्षम ठेवण्यासाठी सर्व नियोजित लसी वेळेवर द्या.
बाळासाठी एक आरोग्य डायरी ठेवाः
वजन, उंची, ताप, लसीकरण, आजार, साखर तपासणीचा इतिहास सहज नोंद ठेवता येतो. यामुळे डॉक्टरांना देखील योग्य मार्गदर्शन करण्यात मदत होते.
- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर