चिराग पासवान यांना पुढे आणण्याची योजना तर भाजपने आखलेली नाही ना, अशी चर्चा राष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे भाजपने आजपर्यंत जाहीर केलेले नाही.
बिहारमधील विधानसभा निवडणूक पाच महिन्यांवर येऊन पोचली असतानाच, तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पहलगाममधील दुर्दैवी घटनेनंतर सर्वपक्षीय बैठक घेतली जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी ती महत्त्वाची बैठक सोडून बिहारमधील जाहीर सभेसाठी जातात, यावरून भाजप बिहारच्या निवडणुकांना किती महत्त्व देतो, हेच दिसून येते. त्या राज्यात भाजपजवळ लोकप्रिय नेता नसणे, ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपला केंद्रीय नेत्यांना त्या राज्यात वातावरण निर्मितीसाठी पाठवावे लागत आहे. याच कारणास्तव नितीश कुमार यांच्या जनता दल (यू) पक्षाला मागच्यावेळी ४३ जागा मिळाल्या आणि भाजपला ७४ मतदारसंघ काबीज करता आले तरी अखेर नितीशकुमार यांनाच नेतेपदी अर्थात मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागले होते. यावेळी काहीसे वेगळे वातावरण असल्याचे जाणवत आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमधील जाहीर सभेत बोलताना आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असून, जागावाटप ठरेपर्यंत सर्व मतदारसंघांतील उमेदवारांबाबत विचार केला जाईल, अशी घोषणा केल्याने भाजप, जनता दल (यू) आदी एनडीएचे घटक पक्ष अचंबित झाले आहेत. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) या पक्षाच्या अध्यक्षपदी असलेले चिराग पासवान केंद्रातही मंत्री आहेत, त्यामुळे ते बिहारात का परतू पाहात आहेत, अशी चर्चा सुरू झाली असून खासदारकी सोडून आमदारकी मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नामागे नेमके कोणते कारण आहे, याचा अंदाज बांधला जात आहे. आपला पुत्र राजकारणात आपल्यापेक्षा पुढे जाणारा तारा ठरेल, अशी भविष्यवाणी ज्येष्ठ नेते स्व. रामविलास पासवान यांनी केली होती, त्यावेळी चिराग यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्याचे म्हटले गेले. ४२ वर्षीय चिराग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान मानले जातात, एवढे त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांना पुढे आणण्याची योजना तर भाजपने आखलेली नाही ना, अशी चर्चा बिहारातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे.
दुसरीकडे राजदचे तेजस्वी यादव हेच इंडी आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे म्हणायला काँग्रेसची तयारी नाही तर नितीश कुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे भाजपने आजपर्यंत जाहीर केलेले नाही. चिराग पासवान आता अनुभवी नेता म्हणून जनतेसमोर येत आहेत. ते तिसऱ्या वेळी खासदार म्हणून निवडून आले आहेत.
नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास ते यावेळी तयार नाहीत. चिराग पासवान यांनी भाजपला समर्थन देत असताना नितीश कुमार यांच्या जनता दलाच्या विरोधात आपल्या पक्षाचे उमेदवार लढवण्याचा विचित्र निर्णय घेतला होता. लोक जनशक्ती पक्षाने १३५ जागांवर निवडणूक लढवली व फक्त एक जागा जिंकली होती. पण नंतर पक्षबांधणीकडे लक्ष देत त्यांनी पाच खासदार, केंद्रीय मंत्रिपद आणि वास्तवात संपूर्ण पक्ष संघटन स्वतःकडे घेतले. पासवान यांना पक्षाला पुन्हा एकदा चालना द्यावी लागली, जी त्यांनी खूप चांगल्याप्रकारे केली आहे. हळूहळू मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षांना साध्य करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. जे पद त्यांच्या वडिलांच्या हातातून निसटले होते, ते त्यांना मिळवायचे आहे. बदलत्या स्थितीत नीतीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील याची कोणतीही हमी नाही आणि जर ते झाले तरी त्यांच्या आरोग्याची घसरण व जाहीर कार्यक्रमांत त्यांना वारंवार होणारे विस्मरण यामुळे ते पदावर किती काळ राहतील, याचीही खात्री नाही. एकच प्रश्न उरतो की, भाजप चिराग पासवान यांना मुख्यमंत्री बनू देतील का, कारण भाजप बिहारमध्ये आपला आधार मजबूत करण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. चिराग पासवानसारखा लोकप्रिय नेता भाजपजवळ नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. २०२० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सांगण्यावरून नितीश कुमार यांना दुर्बळ करणाऱ्या प्रयत्नात चिराग कार्यरत होते, हा त्यांच्यावर सतत आरोप होत असे. राजकीय विश्लेषण करता असे दिसून येते की, लोक जनशक्ती पक्षाने जनता दल (यू) पक्षाला २५ हून अधिक मतदारसंघांमध्ये दणका दिला होता.
या पक्षाने मिळवलेले मतांचे प्रमाण आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनातील विजयाच्या किमान प्रमाणापेक्षा जास्त होते. जर चिराग पासवान यांनी आगामी बिहार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना बिहारमध्ये चांगली संधी मिळू शकते. २०२५ च्या निवडणुकीत तीन तरुण नेत्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा होऊ शकेल. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (३५), चिराग पासवान (४२) आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर (४९) असे हे प्रमुख उमेदवार आहेत. चिराग आणि प्रशांत यांनी त्यांच्या मुख्य मंत्रिपदाच्या महत्वाकांक्षा खुल्या पद्धतीने जाहीर केलेल्या नाहीत, तरीही संधी मिळाल्यास ते ती घेण्यास मागेपुढे करणार नाहीत हे निश्चित. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीने गेल्या वर्षी शेवटी झालेल्या चार विधानसभा पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी केलेली नाही. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांना अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रशांत किशोर सहसा भाजपविरुद्ध बोलत नाहीत आणि त्यांनी आपल्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये चिराग पासवान यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएला गरज पडल्यास ते सरकार स्थापनेत भाजपला मदत करतील अशी चिन्हे दिसतात. राष्ट्रीय जनता दलाच्या राजवटीत जंगल राज ही प्रतिमा असलेल्या बिहारला त्या स्थितीतून बाहेर काढणारे नितीश कुमार सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदावर राहूनही ते राज्य अद्याप अविकसित आणि गरीब राहिले आहे, ही मतदारांची व्यथा आहे.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४