राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना हवी

Story: अंतरंग |
11th June, 11:22 pm
राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना हवी

पाऊस सुरू झाल्याने काजू व आंब्यांचा हंगाम संपला आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे... हे वाक्य गोव्याचे वैशिष्ट्य सांगते. नारळाची झाडे, पोफळी, आंबे, फणस व अधूनमधून कोकमाच्या झाडांमुळे निसर्गसौंदर्याने नटलेले आमचे छोटेसे राज्य समृद्ध बनले आहे. शेती हा गोमंतकीयांचा मुख्य व्यवसाय आहेच, तसेच इथली बहुसंख्य कुटुंबे बागायतीवर अवलंबून आहेत. सुपारी, नारळ व काजूची बागायती ही शेतीपेक्षाही अधिक उत्पन्न देते.

गोव्याचे काजू हे चवीसाठी अवघ्या जगात प्रसिद्ध आहेत. इथल्या रसाळ फणस व आंब्यांची चवही न्यारीच आहे. गोव्याचा मानकूर आंबा हा सर्वांनाच भुरळ घालतो. गोव्यात फणसाची झाडे असंख्य आहेत. बागायती तसेच काजूच्या मळांमध्ये फणसाची झाडे हमखास असतात. आंब्यांबाबतही असेच म्हणता येईल. मानकूर, पायरी, केसर या जाती सोडून साध्या आंब्यांची झाडेही ठिकठिकाणी आहेत. या झाडांच्या फळांना आंबाडी किंवा घोटे म्हणतात. सुपारी, नारळ तसेच काजूची विक्री होते. यामुळे या पिकांपासून बागायतदारांना चांगले उत्पन्न मिळते. फणस, कोकम वा आंब्याबाबत असे म्हणता येणार नाही. फणस तर वाया जाण्याचे प्रमाण बरेच आहे. बहुतांशी फणस उशिरा पिकतात. मेच्या अखेरीस ते पडून वाया जातात. तसेच फणसाला बाजारपेठ मिळत नाही. 

सामान्य बागायतदाराला फणस काढून ते बाजारात विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही. मानकूर, केसर या सारख्या आंब्यांना चांगली मागणी असते. मात्र लहान घोटे ही पडून फुकट जातात. घोटे उशिरा लागत असल्याने ती झाडावरून खाली काढणेही अशक्य बनते. पिकण्यापूर्वी फणस काढून ते तळले तर चिप्स म्हणून विकणे शक्य असते. फणसाच्या गऱ्यांचा रस काढून साठे बनवली तर चांगले उत्पन्न मिळणे शक्य आहे. यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मनुष्यबळ मिळणे ही सुद्धा गोव्यात समस्याच आहे. फुकट जाणाऱ्या घोटांचा रस काढून साठे बनविणे किंवा जॅम बनविणे शक्य आहे.

सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमात प्रक्रिया उद्योगांना विशेष स्थान देण्यात आले आहे. कोकम सरबत व सोलकडी भर उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी फारच उपयुक्त असते. कोकम सोले तयार करण्यासाठी सुद्धा बरेच परिश्रम घ्यावे लागतात. जुने गोवे येथील कृषी महाविद्यालयात आता अन्न प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. हे केंद्र शेतकरी, बागायतदार तसेच स्वयंसाहाय्य गटांसाठी वरदान ठरणार आहे. 

राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाला बराच वाव आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर रोजगार उपलब्ध होईल.

-गणेश जावडेकर, गोवन वार्ता