ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद शिगेला

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर त्याचे परिणाम अमेरिकेच्या राजकारणावर, उद्योगजगतातील धोरणांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडू शकतात. दोघांच्या समर्थकांमधील मतभेद आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात.

Story: संपादकीय |
08th June, 07:50 pm
ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद शिगेला

जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत गेली काही वर्षे प्रथम स्थानावर असलेले उद्योजक एलॉन मस्क आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाने वादळ निर्माण केले आहे. २०२४ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्र्म्प यांचे जोरदार समर्थन केलेले मस्क आता ट्रम्प यांच्या मर्जीतून उतरले असून, मैत्रीऐवजी शत्रुत्वाने जागा घेतली आहे. मस्क यांनी प्रचारादरम्यान कोट्यवधी डॉलर्स ट्रम्प यांना देऊन त्याचा विजय सोपा केला होता. मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्युटिफुल बिल या नावाने संबोधित केल्या जाणाऱ्या विधेयकावर तीव्र टीका केली, या विधेयकाचे त्यांनी घृणास्पद कृत्य असे वर्णन करून या विधेयकामुळे राष्ट्रीय कर्जात अडीच अब्ज डॉलर्सची वाढ होईल, अशी टीका केली. या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या ट्रम्प यांनी मस्क यांना अमली पदार्थांच्या आहारी जाऊन वाया गेलेली व्यक्ती अशी वैयक्तिक टीका केली. सरकारची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नव्याने निर्माण केलेल्या खास विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केलेले मस्क यांची टीका ट्रम्प यांना सहन झालेली नाही. ईव्ही क्रेडिट्सचे संरक्षण करणे, स्टारलिंकला हवाई वाहतूक प्रणालींमध्ये समाविष्ट करणे आणि स्वतःच्या सल्लागारपदाचा कालावधी वाढविणे अशा मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराज झालेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर चक्क तोफच डागली आहे. हा वाद दोन नेत्यांमधील राहिलेला नसून त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. या वादामुळे तंत्रज्ञान उद्योगातील राजकीय प्रभाव, सरकारी करार आणि मस्क यांच्या कंपन्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार रिपब्लिकन पक्षासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. 

ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांसोबतचे सरकारी करार रद्द केल्यास, नासा आणि संरक्षण विभागाच्या मिशनवर परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर त्याचे परिणाम अमेरिकेच्या राजकारणावर, उद्योगजगतातील धोरणांवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडू शकतात. या वादाच्या परिणामी, दोघांच्या समर्थकांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत, ज्याचा प्रभाव आगामी निवडणुकांवर दिसून येऊ शकतो. मस्क यांनी २०१५ मध्ये ओपनएआयची स्थापना केली, ज्याचे मुख्य उद्दिष्ट होते मानवतेच्या हितासाठी सुरक्षित आणि पारदर्शक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय विकसित करणे. मात्र, २०१९ मध्ये ओपनएआयने "कॅप्ड-प्रॉफिट" मॉडेल स्वीकारले आणि २०२४ मध्ये सार्वजनिक लाभ कंपनी बनण्याचा प्रस्ताव मांडला. संयुक्त मालक असलेल्या मस्क यांनी या बदलांना तीव्र विरोध केला, कारण त्यांना वाटले की हे संस्थेच्या मूळ ध्येयाशी प्रतारणा आहे. मस्क यांनी ओपनएआयवर आरोप केला की त्यांनी संस्थेच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाऊन व्यावसायिक फायद्यासाठी काम सुरू केले आहे. त्यांनी २०२४ मध्ये ओपनएआयवर खटला दाखल केला, ज्यात त्यांनी संस्थेच्या पुनर्रचनेला विरोध केला आणि दावा केला की हे त्यांच्या मूलभूत योगदानाच्या अटींचे उल्लंघन आहे. ओपनएआयने मस्क यांच्यावर अनधिकृत छळ आणि अवास्तविक खरेदी प्रस्ताव यांसारख्या आरोपांसह प्रत्युत्तर दिले. त्यांनी मस्क यांच्यावर खटला दाखल केला आणि दावा केला की मस्क यांचे वर्तन संस्थेच्या व्यावसायिक संबंधांना हानी पोहोचवत आहे. कंपनीच्या या दाव्याचे समर्थन डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने हा वाद चिघळला आहे.

या वादामुळे मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत अब्जावधी डॉलर्सची घट झाली. ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांना मिळणारे सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाचा तिसरा राजकीय पक्ष काढण्याचा इरादा व्यक्त करून सध्या अस्तित्वात असलेल्या दोन पक्षांत खळबळ माजवली आहे. पर्याय म्हणून मस्क यांच्या पक्षाकडे जनतेचा कल असल्याचे एका पाहणीत दिसून आल्याने हे पक्ष हादरले आहेत. आतापर्यंत मस्क यांचे समर्थन लाभलेला रिपब्लिकन पक्षाला फटका बसण्याची चिन्हे दिसतात. त्यातच मस्क यांनी ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याला अनुकूलता दाखविल्याने चलबिचलता वाढली असून कटुता वाढली आहे. याचा अंदाज आल्याने मस्क यांनी काही प्रमाणात आता मवाळ भूमिका घेतली असली तरी डेमोक्रेटिक पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्यास चांगलाच धडा शिकवू, असा इशारा ट्रम्प यांनी दिल्याने सारेच वातावरण बदलले आहे.  या वादाचा पुढील परिणाम काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.