बाबांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या आठवणींनी मन भरून येते. त्यांचे प्रेम, हसतमुख स्वभाव आणि मुलांवरचे अपार प्रेम यांचे स्मरण होते. बाबांच्या जाण्याने आयुष्यात आलेली पोकळी आजही जाणवते.
आज वर्षश्राद्ध बाबांचे. अनंतात विलीन होऊन एक वर्ष झाले त्यांना. मागच्या वर्षी असाच पाऊस कोसळत होता, कुंद वातावरण आणि फोन वाजला. "बाबा गेले." दोनच शब्द पण एखाद्या बाणासारखे कानात घुसले ते. काही सुचत नव्हते. बधिर होणे म्हणजे काय, अक्षरशः अनुभवले मी त्या दिवशी.
शांतपणे सुरक्षितरीत्या आपल्या घरात आनंदात बसले असताना अचानक वादळवारा येतो आणि डोक्यावरचे छप्पर उडून जाते. उघडे पडतो आपण, तसेच झाले माझे. घरात सगळे असतानाही एक पोरकेपण सतावू लागले.
रोज सकाळी परसात फूलं काढणारे, मला सायकलवरून शाळेत सोडणारे, मला आवडती फाती बिस्किटे आणणारे, रात्री जेवल्यावर हक्काने माझ्याकडे सुपारी मागणारे माझे बाबा. लग्नाच्या वेळी मी लांब जाणार म्हणून रडणारे बाबा समोर दिसू लागले.
आमचे बाबा श्री. शंकर पावसकर ऊर्फ नाना ऊर्फ शशी भाटकर, किती नावे ती? मी एक पाहिलेय, एखादी व्यक्ती आपल्याला हक्काची, जवळची वाटते त्या वेळी बऱ्याचदा आपण त्या व्यक्तीला एखादी पदवी, उपनाव ठेवतो अगदी हक्काने, आपलेपणाने. त्यात टिंगलटवाळी नसते. आणि खरेच, अख्ख्या गावात बाबा लाडके होते म्हणा हवे तर.
दाभोळ गावात एका भाटकार कुटुंबात जन्मलेले आमचे बाबा लहानपणी तसे नाजूकच प्रकृतीने. आमच्या आजीने फुलासारखे जपले त्यांना. संसारात तशी कोणाची साथ नसलेल्या आमच्या आजीने परिस्थितीची झळ लागू दिली नाही त्यांना. खरंच, गोव्यात तसे धनवान कोणी नव्हते हो गावात. पैसा हा शहरात, तोही एका ठराविक वर्गाकडे. आम्ही आपले नावाला भाटकार. अहो, बाबांच्या लहानपणी एक मण सुपारीचा भाव तीन रुपये होता. आज हसाल तुम्ही, पण परिस्थिती खरोखर तशी होती. उकडा भात, पेज, परसात लावलेली लालमाठाची भाजी, वर्षभरासाठी साठवलेले आंब्याचे लोणचे आणि मासे बस्स!... ताजे बांगडे म्हणजे पर्वणीच जणू. अशी परिस्थिती पाहिलेले आमचे बाबा तसे अभ्यासात हुशार, एकपाठी. गावात तशा सोयी नसल्याने म्हणा, किंवा मुंबईची क्रेझ म्हणा, त्यांची रवानगी झाली मावशीकडे. शिक्षणाची आकांक्षा घेऊन मुंबईत आलेल्या लहानग्या शशीला या नगरीने मात्र जवळ आपलेसे केले नाही. चांगले शिक्षण दूरच, कष्टच अंगावर पडू लागले. शेवटी वर्षभराने परत गोव्यात.
पण खचून जातील तर बाबा कसले? मॅट्रिकला चांगल्या गुणांनी पास झालेल्या शशीला सरकारी नोकरी लगेच मिळाली. एका सुरळीत आयुष्याला सुरुवात झाली. अर्थात आम्ही पाच भावंडे. तशी ओढाताण होती. पण सतत हसतमुख चेहरा, कदाचित ताण-तणाव अंगणातच सोडून येत असावेत ते. मोठी मुलगी मी. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर. "बाय" म्हणायचे ते मला. कलाकार मनाचे आमचे बाबा चांगले गायकही होते. पण परिस्थितीनुसार त्यांना पुढे गाणे जमले नाही. म्हणूनच त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले. गायन स्पर्धा, गॅदरिंग, संमेलने यात मी सदा पुढे. आणि बाबा पहिल्या रांगेत कौतुकाने आपल्या लेकीला पाहायला.
आमच्या बाबांना तशी छान चौकसपणाची आवड. पैसे खर्चायला पुढे-मागे नाही. आम्हा सर्व भावंडांना कसलीच तोशीस नव्हती घरात. एक मस्त बिनधास्त आयुष्य मिळाले आम्हाला ते बाबांमुळेच. अहो, आमचे बाबा हे आमच्यासाठी वडील कमी, मित्रच जास्त होते.
लग्नानंतरही तसेच आयुष्य उपभोगले, पण काही झाले तर "आहेत बाबा, बघून घेतील" हीच भावना मनात ठेवून. माहेरी आल्यावर काय कौतुक माझे! मला आवडतात म्हणून तऱ्हेतऱ्हेचे मासे आणायचे, आंबे आणायचे चालू त्यांचे. अहो, मला मरून रंग आवडतो म्हणून लग्नाच्या बस्त्यात मरून रंगाची बॅग शोधायला पणजीला गेले ते. माझ्या लग्नात पहिल्यांदा रडताना पाहिले मी त्यांना. अर्थात खरे सांगू, त्या वेळी ते कॉमन वाटायचे. ते काय, सगळेच बाप करतात मुलांकरिता, त्यात काय? कधीकधी फोन यायचा त्यांचा. जायचे मी भेटायला. पण जास्त गप्पा आईबरोबर. बाबा हॉलमधून हाका मारायचे, त्या वेळी जायचे मी त्यांच्याकडे. आल्यावर अनेक गोष्टी सांगायचे. लहानपणीच्या, मुंबईच्या. ऐकतच राहावे असे वाटायचे मला.
आपल्या डोक्यावर कोणी सिनिअर असते त्या वेळी आपण बिनधास्त असतो बघा. काही झाले तरी आहे कोणीतरी, सांभाळेल ही भावना. पण ज्या वेळी आपल्याला आश्वस्त करणारा तो हात निघून जातो ना, बिथरल्यासारखे होते मग. "बाबा" ह्या दोन शब्दांची ताकद तेव्हा कळते आपल्याला. आज एक वर्ष झाले त्यांना. आयुष्यात आलेली पोकळी प्रकर्षाने जाणवते आता. बाबा असताना सगळ्यांवर ताईगिरी दाखवणारी मी, आज त्याच घरात परकी होणार नाही ना...
रेशम जयंत झारापकर
मडगाव