मागच्या आठवड्यात जेव्हा आपण योनीतील विविध प्रकारच्या स्त्रावांबद्दल सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही जणींनी मासिक पाळीदरम्यानच्या रक्तस्त्रावावरही शंका दर्शविल्या. तर मग आज आपण याच विषयाबद्दल सखोल जाणण्याचा प्रयत्न करूयात.
मासिक पाळीतील रक्तस्त्रावामध्येही वेगळे रंग असू शकतात. विविध रंगांचे रक्तस्त्राव वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात, आणि हे समजून घेणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त ठरू शकते.
दर मासिक पाळीत साधारणपणे पहिले २ ते ३ दिवस जास्त रक्तस्त्राव होतो आणि त्यानंतर पुढील २ ते ४ दिवस हलका रक्तस्त्राव होतो. मासिक पाळीतील रक्तस्त्राव हे रक्त आणि ऊतींचे मिश्रण असते जे गर्भाशयाचे आतील अस्तर म्हणजे एंडोमेट्रियममधून बाहेर पडते. दर महिन्याला पाळी किती दिवस चालते यासोबत त्याचे प्रमाण, प्रवाह वेगवेगळे असू शकते.
काही महिलांमध्ये मासिक पाळीचा स्त्राव साधारणपणे ४ चमचे ते १२ चमचे इतका असू शकतो. सरासरी, एका महिलेचे मासिक पाळी दरम्यान सुमारे ३० ते ५० मिली रक्त कमी होते, व एकूण ८० मिली पर्यंत रक्त कमी होणे देखील सामान्य मानले जाते. मासिक पाळीच्या रक्ताचा रंग विविध घटकांवर अवलंबून असतो– जसे की रक्त किती वेळा शरीरात थांबले, ऑक्सिजनशी संपर्क, हार्मोनल स्थिती, संसर्ग, वय, आहार, व्यायाम व त्यानुसार स्त्रावातील रंगात बदल झालेला असतो.
पाळी स्त्रावाच्या रंगाचे प्रकार
चमकदार लाल रक्तस्त्राव
जेव्हा मासिक पाळीच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते तेव्हा रक्तस्त्रावाचा रंग चमकदार लाल असू शकते. या स्थितीत, गर्भाशयाच्या आतील आवरणाचा रंग जलद गतीने गळतो आणि प्रोस्टॅग्लॅंडिन होर्मोनचे उत्पादन वाढते. यामुळे महिलांना पोटात क्रॅम्प्स येण्याची शक्यता असते. हे क्रॅम्प्स ओटीपोटात जाणवतात. अश्या प्रकारचा रक्ताचा तीव्र प्रवाह गर्भपात, सबम्यूकोसल फायब्रॉइड, एक्टोपिक गर्भधारणा, डिम्बग्रंथि सिस्ट, एंडोमेट्रियल पॉलीप, गर्भाशय ग्रीवाचे पॉलीप, एंडोमेट्रियल कर्करोग किंवा गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
गडद लाल रंगाचा रक्तस्त्राव
सुरूवातीचे दिवस सरल्यानंतर जेव्हा पाळी सामान्य होते तेव्हा असा रक्तस्त्राव दिसतो व रक्तातील इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे येतो. यामध्ये गर्भाशयाचे अस्तर म्हणजे एंडोमेट्रियम जाड होते किंवा गर्भाशयाच्या अस्तरात घट होते व गर्भाशयाच्या अस्तराचा जुना थर शरीराबाहेर पडत असतो. चक्राच्या सुरुवातीला किंवा शेवटी गडद तपकिरी रक्त सामान्य असते. तसेच, जड दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या सामान्य असतात आणि ते गडद लाल, गडद तपकिरी किंवा अगदी काळा देखील दिसू शकतात.
गुलाबी रंगाचा रक्तस्त्राव
मासिक पाळी सुरू होण्याच्या काही काळापूर्वी किंवा ती सुरू होण्यापूर्वी, काही महिलांना हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे डाग दिसतात. जेव्हा थोडेसे रक्त गर्भाशयाच्या श्लेष्माच्या संपर्कात येते आणि मिसळते तेव्हा असे होते. यामुळे मासिक पाळीपूर्वी गुलाबी डाग पडू शकतात. तसेच रजोनिवृत्तीच्या जवळ असताना किंवा असामान्य हार्मोनल क्रिया दरम्यान हे दिसू शकते. या दरम्यान अनियमित मासिक पाळी आणि योनीतून कोरडेपणा येऊ शकतो. हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे डाग हे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी कमी असल्याचे लक्षण असू शकते.
तपकिरी किंवा काळ्या
रंगाचा रक्तस्त्राव
सुरुवातीला, मासिक पाळीच्या रक्ताचा रंग चमकदार लाल असतो. पण शरीरात जास्त काळ राहिल्यास ते गडद होते. जुने रक्त रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडताना हवेच्या संपर्कात आल्यावर रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोह हवेशी संवाद साधतात व रक्त ऑक्सिडेशन प्रक्रियेतून जाते. जर महिलेच्या शरीरातून गर्भाशयाचे अस्तर सामान्यपेक्षा कमी वेगाने बाहेर पडत असेल तर देखील असे होऊ शकते. ही स्थिती सामान्य आहे आणि त्यात आरोग्याला कोणताही धोका नाही.
मानसिक आरोग्याचा आणि जीवनशैलीचा पाळीतील स्त्रावावर परिणाम
तणाव, झोपेचा अभाव, अत्याधिक डाएटिंग किंवा व्यायाम, अनियमित जीवनशैली यामुळे हार्मोन्स बिघडू शकतात, आणि त्याचा परिणाम मासिक स्त्रावावर होतो: एस्ट्रोजेन कमी झाल्यास गुलाबी किंवा हलका रंग येऊ शकतो व प्रोजेस्टेरोन वाढल्यास गडद रंग व गाठी होतात.
वयोगटानुसार बदल
किशोरवयात (१२-१८ वर्षे): हार्मोनल स्थिरता अजून येत नसल्याने स्त्रावाचा रंग बदलता असतो. काही वेळा पाळी अनियमितही होते.
प्रजननक्षम वयात (१९-४० वर्षे): रंग सामान्यतः लालसर ते गडद असतो. जीवनशैलीचा प्रभाव दिसतो.
पूर्व-रजोनिवृत्ती (४०-५० वर्षे): हार्मोनल घडामोडीमुळे स्त्रावाच्या रंगात आणि स्वरूपात अधिक बदल दिसतात. अनियमितता देखील सामान्य.
खालीलपैकी काही लक्षणं दिसल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा:
पाळीचे रक्त काळसर, हिरवे किंवा दुर्गंधीयुक्त येणे.
रक्तात खूप मोठ्या गाठी (coin-size पेक्षा मोठ्या)
प्रत्येक तासाला सॅनिटरी नॅपकिन पूर्ण भिजणे.
पाळी ७ दिवसांहून जास्त चालणे.
वेदना असह्य होणे.
पाळीमधून रक्त येत नाही, पण सातत्याने तपकिरी स्त्राव होणे.
मासिक स्त्रावाचा रंग हा आपल्या शरीराची “भाषा” आहे – जो आपल्या अंतर्गत आरोग्याची माहिती देतो. हा रंग कधी कधी बदलू शकतो, पण सतत असामान्य बदल हा आपल्या आरोग्या संदर्भातील इशारा असू शकतो. त्यामुळे जागरूक राहणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर