कुख्यात ड्रग्ज डीलर अटाला विरोधात आरोपपत्र दाखल

आज सुनावणी : ८.७० लाखांचे ड्र‍ग्ज जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 07:00 am
कुख्यात ड्रग्ज डीलर अटाला विरोधात आरोपपत्र दाखल

पणजी : ड्रग्ज डीलर आणि इस्रायली नागरिक यानिव्ह बेनाईम उर्फ अटाला (५०, रा. शिवोली) याच्या विरोधात गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी ३ रोजी होणार आहे. 

एएनसीने ५ एप्रिल रोजी ड्रग्ज तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, अटाला हा इस्रायली नागरिक पुन्हा ड्रग्जमध्ये सक्रिय झाल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्याआधारे एएनसीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक टिकम सिंग आणि उपअधीक्षक नेर्लन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सजित पिल्लई, उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर आणि त्यांच्या पथकाने ४ एप्रिलच्या मध्यरात्री ११.२५ ते ५ एप्रिलच्या पहाटे ३.३० च्या दरम्यान शिवोलीतील अटाच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने त्याच्या खोलीची झडती घेतली असता, त्याच्याकडून ७.५० लाखांचे ५० ग्रॅम कोकेन व १.२० लाखांचा १२० ग्रॅम चरस असा एकूण ८.७० लाखांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.  या प्रकरणी उपनिरीक्षक रेडकर यांनी अटालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. दरम्यान, अटालाने दाखल केलेला जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यात त्याने जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला आहे.

पासपोर्ट, व्हिसा प्रकरणीही आरोपपत्र दाखल

तपासात अटालाकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याची माहिती उघड झाल्यानंतर हणजूण पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनीही गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.