दिवसभरात १,६०० पेक्षा अधिक जणांकडून आक्षेप; प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता
पणजी : राज्यात अॅपवर आधारित टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक खात्याने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेला विरोध करीत स्थानिक टॅक्सी मालकांनी पुन्हा एकदा ‘एल्गार’ पुकारला आहे. राज्यात ‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ नकोच, अशी भूमिका स्थानिक टॅक्सी चालकांनी कायम ठेवली असून, याबाबत मंत्री, आमदारांच्या गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक टॅक्सी मालकांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘टॅक्सी अॅग्रिगेटर’संदर्भात वाहतूक खात्याने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेला तीव्र विरोध करण्यासाठी सोमवारी राज्यभरातील टॅक्सी मालकांनी पणजीतील वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. या टॅक्सी मालकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत, वाहतूक खात्याकडून तातडीने सूचना आणि हरकती स्वीकारण्यासाठी पणजी येथील जुन्ता हाऊसबाहेरील कार्यालयासमोर पाच विशेष बूथची व्यवस्था करण्यात आली. शिवाय या परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. त्याआधीच पणजी पोलीस स्थानक परिसरात जमावबंदीही लागू करण्यात आली होती. त्यामुळे तणावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. पण, ‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ला सोमवारी दिवसभरात १,६०७ जणांनी आक्षेप घेतल्याची माहिती वाहतूक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
व्यवसाय हातातून गेल्यास रस्त्यावर उतरू!
‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ला विरोध करीत स्थानिक टॅक्सी मालकांच्या संघटनांनी सोमवारी काही मंत्री आणि आमदारांच्याही भेटी घेतल्या. गोव्यातील पारंपरिक व्यवसाय याआधीच स्थानिकांच्या हातून गेले आहेत. त्यापैकी टॅक्सी व्यवसाय गोमंतकीयांच्या हाती होता. पण, अॅपच्या माध्यमातून हा व्यवसायही खासगी कंपन्यांना देण्याचा डाव सरकारने आखला आहे. अॅपबेस टॅक्सी सेवेमुळे हा व्यवसायही स्थानिक टॅक्सी मालकांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी योगेश गोवेकर यांनी दिला.
रेंट अ बाईक-कार बंद केल्यास स्थानिकांना फायदा : बाबूश
रेंट अ बाईक, कारमुळे राज्यातील अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रेंट अ बाईक आणि कार बंद झाल्यास टॅक्सी व्यावसायिकांना निश्चितच फायदा होईल. पणजी पाटो परिसरातील जवळपास ९० टक्के पार्किंगमध्ये हीच वाहने असतात, हे वाहतूक खात्याचे अपयश असल्याचे म्हणत, मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रेंट अ बाईक, कारना कोणतीही मान्यता देऊ नये, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
सूचना, हरकतींचा विचार करून अंतिम निर्णय घेऊ : मॉविन
‘टॅक्सी अॅग्रिगेटर’संदर्भात केवळ मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यावर सूचना, हरकतींसाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली असून, सूचना आणि हरकती आल्यानंतर स्थानिक टॅक्सी मालकांना विश्वासात घेऊन यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. राज्यात अॅपवर आधारित अधिकाधिक सेवा येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.