पती-पत्नीतील भांडणामुळे मुलगा आईपासून झाला ‘पोरका’!

शिरोड्यातील धक्कादायक घटना : हेमा गावकरच्या खुनास पती-पत्नीतील भांडणच कारणीभूत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 12:57 am
पती-पत्नीतील भांडणामुळे मुलगा आईपासून झाला ‘पोरका’!

पणजी : शिक्षिका असलेली हेमा गावकर विविध कारणांमुळे किरकीर करीत असल्यामुळेच पती चेतन गावकरने तिचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आणि त्यानंतर स्वत:च पोलिसांसमोर आल्याचे शिरोड्यातील प्रकरणातून समोर आले आहे. पण, या घटनेमुळे आई-वडिलांच्या भांडणात बालवाडीत शिकणारा त्यांचा मुलगा मात्र आईपासून कायमचा पोरका झाला आहे.
सरकारी​ कर्मचारी असलेल्या शिरोडा येथील चेतन गावकर याने आपली शिक्षिका पत्नी हेमा गावकर हिचा गेल्या शनिवारी डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना, पती-पत्नीतील रोजच्या भांडणामुळेच शांत स्वभावाच्या चेतन गावकरचा स्वत:वरील तोल ढासळला आ​णि रागाच्या भरात त्याने डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याचे समोर आले.
सूत्रांनी ​दिलेल्या माहितीनुसार, मुळची बेतोडा येथील असलेल्या हेमाचा विवाह सहा वर्षांपूर्वी शिरोड्यातील चेतन गावकर याच्याशी झालेला होता. विवाहानंतर काहीच दिवसांनंतर हेमाने विविध कारणांवरून सासू-सासऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाला कंटाळून चेतनने स्वत:चे घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते तळपण-शिरोडा येथे राहू लागले. वेगळे राहू लागल्यानंतरही त्यांच्यातील वाद कायम राहिले. हेमाच्या रोजच्या कटकटीला कंटाळलेला चेतन वर्षभरातून पत्नीने बनवलेले जेवणही जेवत नव्हता. जेवणासाठी तो आई-वडिलांच्या घरी जात होता. तिथूनच तो कामावर जात होता. ज्या दिवशी खुनाची घटना घडली, त्या दिवशी त्यांचा मुलगा त्याच्या मामाच्या घरी होता. चेतनने त्याला तेथून आणले होते. तो समोर असतानाच चेतन आणि हेमात पुन्हा वाद पेटला. त्यामुळे संतापलेल्या चेतनने मुलाला तिच्यापासून बाजूला करीत, तिच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर हेमाने आरडाओरडा करू नये म्हणून त्याने बाहेरून घराला कुलूप लावले आणि मुलाला स्वत:च्या आई-वडिलांच्या घरी सोडून तो थेट फोंडा पोलिसांना शरण गेला. या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांना हेमाचा मृतदेह आढळून आला.
घटस्फोटासाठी हेमा नव्हती तयार
हेमाच्या रोजच्या भांडणामुळे कंटाळलेला चेतन गावकर तिच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने घटस्फोटासाठी अर्जही केलेला होता. परंतु, हेमा त्या अर्जावर सही करण्यास किंवा चेतनला घटस्फोट देण्यास तयार नव्हती, असेही पोलीस तपासातून समोर आले आहे.
चेतन नोकरीतून निलंबित!
चेतन गावकर हा फोंडा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला होता. पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली फोंडा पोलिसांकडून अटक झाल्यानंतर सरकारी नोकरीतूनही त्याला निलंबित करण्यात आले आहे.