ॲप ॲग्रिगेटर : टॅक्सी मालकांच्या आमदारांना धमक्या!

लोबोंना घेरले : आगामी निवडणुकीत अस्तित्व धोक्यात आणण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th June, 01:04 am
ॲप ॲग्रिगेटर : टॅक्सी मालकांच्या आमदारांना धमक्या!

म्हापसा : राज्य सरकारच्या नियोजित ॲप अग्रिगेटर धोरणाला विरोध करीत असलेल्या स्थानिक टॅक्सी मालकांनी आता किनारी भागांतील आमदारांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. आमची मागणी मान्य न केल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत संबंधित आमदारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणू, असा इशाराही त्यांनी दिला.                      

सरकारने ॲप अग्रिगेटर धोरण तयार करून त्याचा मसुदा सूचना आणि हरकतींसाठी खुला केल्यानंतर टॅक्सी मालकांनी या धोरणाला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत बार्देश किनारी भागांतील टॅक्सी​ मालकांनी संघटितरीत्या आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यावेळी आमदार लोबो दाम्पत्य आणि टॅक्सी मालकांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.     

साथ न दिल्यास ‘राजकारण’ दाखवू!
ॲप अग्रिगेटर विषयासंदर्भात आमच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला अपेक्षित साथ न दिल्यास किंवा यावेळीही आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारण काय असते, हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा इशारा लोबो दाम्पत्याच्या भेटीनंतर टॅक्सी मालकांनी दिला.
ॲप अग्रिगेटरला विरोध कायम
ॲप अग्रिगेटरला आमचा विरोध कायम आहे. अग्रिगेटर धोरण हे पारंपरिक टॅक्सीवाल्यांची उपजिविका संपविण्यासाठी आहे. हे धोरण चालीस लागल्यास स्थानिक टॅक्सी मालकांचे अस्तित्व संपेल, असे टॅक्सी संघटनेचे नेते योगेश गोवेकर म्हणाले. आमदार मायकल लोबो आणि डिलायला लोबो यांनी या प्रकरणी आमच्या पाठिशी उभे रहावे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत गप्प बसणार नसल्याचेही आम्ही त्यांना सांगितले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार मायकल लोबो म्हणाले...
- पर्यटकांनी गोव्यातून माघारी परतताना गोव्याविषयी चांगल्या आठवणी घेऊन जाव्या, अशी सरकारची भावना आहे. त्यामुळे टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता महत्त्वाची आहे.
- स्थानिक टॅक्सी मालकांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठका घेऊन आम्ही योग्य तो तोडगा काढू.
- राज्यातील पर्यटन पुढे नेण्यासाठी आणि अधिकाधिक पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी ठिकाणावर घालणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवू!
ॲप अग्रिगेटरसंदर्भात आम्ही गेल्या दोन दिवसांत काही आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. सरकारच्या धोरणानुसार असे अग्रिगेटर गोव्यात आल्यास त्याचा स्थानिक टॅक्सी मालकांना मोठा फटका बसणार आहे. त्याची माहिती आम्ही आमदारांना दिली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घडवून आणण्याची हमी त्यांनी आम्हाला दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत जी भूमिका घेतील, त्यानुसारच आमची पुढील दिशा ठरेल, असे टॅक्सी मालक बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.