मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या शासकीय बंगल्यावर सायंकाळी होणार बैठक
पणजीः फोंडा येथे आयोजित 'आदिवासी प्रेरणा दिन' कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर आणि पर्यायाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर केलेली टीका आणि त्यामुळे वादात सापडलेले कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे सध्या राज्यभर चर्चेत आहेत. त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी होत आहेत.
दरम्यान या सर्व प्रकरणानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आज मंत्री गोविंद गावडेंशी चर्चा करणार आहेत. आल्तिनो येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या शासकीय बंगल्यावर आज सायंकाळी बैठक होणार आहे. मंत्री गावडे यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल दामू नाईक पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर गावडे यांच्याबाबत 'फैसला' होणार आहे.
'अशा' उमटल्या होत्या प्रतिक्रिया
गावडेंच्या त्या वक्तव्याची भाजपच्या नेत्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली. 'उचलली जीभ लावली टाळ्याला असे होणार नाही. असला बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही', असे म्हणत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गावडेंबाबत खरमरीत प्रतिक्रिया दिली होती. तर 'सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे आणि बेजबाबदार वक्तव्ये टाळली पाहिजेत', असा इशारा वजा प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. याशिवाय खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकरांनीदेखील गावडेंचा खरपूस समाचार घेतला होता. दुसरीकडे मात्र 'गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळू नये', असे म्हणत 'उटा' संघटनेने सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याचेही दिसले.
आता लक्ष चर्चेकडे
असे असले तरी, मंत्री गावडे यांच्या वक्तव्यामुळे गोव्यातील भाजपा सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या सर्व घडोमोडींनंतर आता लक्ष मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मंत्री गावडे यांच्या चर्चेकडे लागून राहीले आहे.